प्रभाग पद्धतीवर रंगली जुगलबंदी
By admin | Published: May 26, 2016 03:02 AM2016-05-26T03:02:16+5:302016-05-26T03:02:16+5:30
महापालिका निवडणुकीत सध्या अस्तित्वात असलेल्या एक सदस्यीय प्रभाग पद्धती ऐवजी चार सदस्यीय प्रभाग पद्धती ...
परिसंवाद : एक सदस्यीय की बहुसदस्यीय पद्धतीवर मांडली भूमिका
नागपूर : महापालिका निवडणुकीत सध्या अस्तित्वात असलेल्या एक सदस्यीय प्रभाग पद्धती ऐवजी चार सदस्यीय प्रभाग पद्धती अमलात आणण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. परंतु एक सदस्यीय की बहुसदस्यीय प्रभाग पद्धती हिताची आहे यावरून राजकीय वादळ निर्माण झाले आहे. यावर व्यापक चर्चा व्हावी. या हेतूने ‘प्रयास’ फाऊंडेशनतर्फे मोरभवन येथे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश विकास सिरपूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. यात प्रभाग पद्धतीवरून वक्त्यात चांगलीच जुगलबंदी रंगली. व्यासपीठावर प्रयासचे अध्यक्ष अनिल अहिरकर व सचिव शेखर आदमने उपस्थित होते.
भाजप समर्थित वक्त्यांनी चार सदस्यीय प्रभाग पद्धतीचे समर्थन केले तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा, मनसे व विदर्भवादी संघटनांनी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीला जोरदार विरोध दर्शवून हा निर्णय लोकशाही विरोधी असल्याची भूमिका मांडली. महापालिकेतील सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, रुपा रॉय यांनी बहुसदस्यीय प्रभाग पद्धती जनतेच्या हिताची असून विकासाला चालना देणारी असल्याची भूमिका मांडली. काँग्रेसच्या कार्यकाळातच प्रभाग पद्धत आणली होती. त्यामुळे भाजपने ही पद्धत आणली नसल्याचे तिवारी यांनी निदर्शनास आणले.
मनसेचे प्रशांत पवार, काँग्रेसचे नगसेवक प्रफुल्ल गुडधे, विदर्भ कनेक्टचे अधयक्ष अॅड. मुकेश समर्थ, राष्ट्रवादी काँग्रेसचे वेदप्रकाश आर्य, शब्बीर विद्रोही, दुनेश्वर पेठे,माजी उपमहापौर शेखर सावरबांधे, नगरसेवक दीपक पटेल, बसपाचे नगरसेवक मुरलीधर मेश्राम आदींनी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीला विरोध दर्शविला. राजकीय स्वार्थासाठी भाजप बहुसदस्यीय प्रभाग पद्धती आणण्याचा विचारात आहे. यामुळे अपक्ष व लहान पक्षांना फटका बसेल. ही पद्धती लोकशाही विरोधी असून विकासाला बाधा ठरणारी असल्याचा आरोप त्यांनी केला. संचालन महेश तिवारी यांनी केले. (प्रतिनिधी)