‘वॉटर इमेज स्टाईल रायटिंग’मध्ये जुईने रोवला झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 09:24 PM2019-08-31T21:24:03+5:302019-08-31T21:36:37+5:30
वॉटर इमेज स्टाईल रायटिंग म्हणजे उलटी लिहिलेली अक्षरे पाण्यात सरळ दिसतात. यात जुईने इंग्रजी, हिंदी, मराठी अन् संस्कृतमध्ये सरळ अक्षरे उलटी लिहून विदर्भासह भारताचा नावलौकिक वाढविला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एखाद्या विषयाचा अभ्यास करून त्यावर प्रभुत्व मिळविणे अवघड बाब असते. परंतु नव्या विषयाचा शोध घेऊन चार भाषांमध्ये त्यात प्राविण्य मिळवून जर कुणी भारतासह आशियात आपला झेंडा रोवला तर ती नक्कीच मोठी उपलब्धी आहे. होय, नागपूरची कन्या जुई मुकेश लिलाडिया हिने आपल्या कर्तबगारीने ही बाब शक्य केली आहे. वॉटर इमेज स्टाईल रायटिंग म्हणजे उलटी लिहिलेली अक्षरे पाण्यात सरळ दिसतात. यात जुईने इंग्रजी, हिंदी, मराठी अन् संस्कृतमध्ये सरळ अक्षरे उलटी लिहून विदर्भासह भारताचा नावलौकिक वाढविला आहे. तिच्या या अनोख्या कामगिरीची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.
नागपूरची जुई लिलाडिया ही वर्धमाननगरच्या सेंटर पॉईंट स्कूलमध्ये पाचव्या वर्गात शिकते. जुईला दुसऱ्या वर्गात असताना एकदा मॅथ ऑलिम्पियाडच्या परीक्षेमध्ये एक प्रश्न देण्यात आला. त्यात वॉटर इमेजमध्ये लिहिलेला शब्द सरळ लिहायचा होता, त्याच्या बाजूला सरळ लिहिलेला शब्द वॉटर इमेजमध्ये लिहावयास सांगण्यात आले. एकच शब्द असल्यामुळे जुईने तो सहज लिहिलाही. परंतु त्यानंतर जुईला सरळ अक्षरे उलट लिहिण्याचा छंदच लागला. ती धडाधड मोठमोठे परिच्छेद उलट लिहू लागली. केवळ इंग्रजी भाषेतच नव्हे तर मराठी, हिंदी आणि संस्कृत भाषेतील शब्दही ती सराव करून उलट लिहिण्यात पारंगत झाली. याचा रेकॉर्ड होऊ शकतो ही बाब लक्षात आल्यानंतर जुईने तीन वर्षे सरळ अक्षरे उलट लिहिण्याचा सराव केला. यात ती चांगलीच तरबेज झाली. त्यानंतर जुईने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ ऑफ रेकॉर्डमध्ये आपल्या नावाची नोंद केली. जुई या विषयात पीएच.डी. करणार आहे. त्यासाठी एक मोठे थिसिस लिहून ती युनायटेड किंग्डममध्ये सादर करणार आहे. त्यानंतर परीक्षा होऊन जुईला त्यात पीएच.डी. मिळेल. कमी वयात पीएच.डी. मिळविण्याचा रेकॉर्डही भविष्यात तिच्या नावावर नोंदविला जाणार आहे. या आगळ्यावेगळ्या विषयावर प्रभुत्व मिळवून विदर्भ अन् भारताचा झेंडा जुईने आशियात रोवला आहे. तिने केलेली ही असामान्य कामगिरी नक्कीच नागपूरकरांसाठी गौरवाची बाब आहे.
‘गॉड गिफ्ट’मुळेच जुईची कामगिरी शक्य : गडकरी
उलट लिहिण्याचे गॉड गिफ्ट मिळाल्यामुळेच जुईने ही कामगिरी सहज शक्य केली असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविनगर येथील अग्रसेन भवनात जुईच्या सत्कार समारंभात केले. ते म्हणाले, अग्रसेन महाराजांची कृपा असल्यामुळे जुईने रेकॉर्ड केला आहे. वॉटर इमेज या प्रकारात जुई पीएच.डी. करीत असून तिच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. व्यासपीठावर अग्रसेन मंडळाच्या अध्यक्षा उर्मिला अग्रवाल, नगरसेवक सुनील अग्रवाल, प्रकाश मेहाडिया, बी. सी. भरतीया, कैलाश लिलाडिया, मुकेश लिलाडिया, राधेशाम लिलाडिया, कैलाश जोगानी, दीपेन अग्रवाल, अशोक गोयल उपस्थित होते.