झट् मंगनी...पट् जेल

By admin | Published: March 11, 2016 03:09 AM2016-03-11T03:09:23+5:302016-03-11T03:09:23+5:30

‘चट मंगनी, पट् ब्याह’ ही म्हण सुपरिचित आहे. या उलट ‘चट् मंगनी अन् पट जेल’ चा प्रकार ना कुठे घडला, ना कुणी ऐकवला. कळमन्यात मात्र ही घटना घडली.

Jumbo matchmaking ... prison bars | झट् मंगनी...पट् जेल

झट् मंगनी...पट् जेल

Next

सडकछाप मजनूची जेलयात्रा : २४ तासात कोर्टात दोषारोपपत्र
नरेश डोंगरे नागपूर
‘चट मंगनी, पट् ब्याह’ ही म्हण सुपरिचित आहे. या उलट ‘चट् मंगनी अन् पट जेल’ चा प्रकार ना कुठे घडला, ना कुणी ऐकवला. कळमन्यात मात्र ही घटना घडली. एकतर्फी प्रेमातून आधी मजनूगिरी आणि नंतर भाईगिरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी तातडीने अटकच केली नाही तर त्याला कारागृहात पाठवून या गुन्ह्यासंबंधीचे दोषारोपपत्रही अवघ्या २४ तासात पोलिसांनी कोर्टात सादर केले. महिला-मुलींवरील अत्याचाराच्या गुन्ह्याची प्रकरणे तातडीने मार्गी लागत नसल्याची ओरड असताना कळमना पोलिसांनी हाताळलेले हे प्रकरण ‘मॉडेल’ ठरावे. मंगळवारी देशविदेशात महिला दिनाचा कार्यक्रम धडाक्यात साजरा झाला. याच दिवशी कळमन्यातील गुलमोहर नगरात राहणाऱ्या शाळकरी मुलीशी (वय १५) आरोपी दातऱ्या ऊर्फ पंकज गंगाधर टेकन (वय २०) याने एकतर्फी प्रेमातून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. गेल्या सात दिवसांपासून दातऱ्या मुलीच्या मागे लागला होता. शाळेला जाताना तो तिचा पाठलाग करायचा. फिल्मी स्टाईलमध्ये तिला ‘ए... पलट...!’ म्हणायचा. दोन तीन दिवस त्याचा त्रास सहन केल्यानंतर मुलीने आपल्या आईवडिलांना सांगितले. एकदम पोलिसांकडे जाण्याऐवजी त्याला समजावून सांगू‘, अशी भूमिका आईवडिलांनी घेतली अन् त्याच्याकडे दुर्लक्ष केले. दातऱ्या निर्ढावला.

भाईगिरीमुळे मुलगी दहशतीत
नागपूर : महिला दिनी पीडित मुलगी शाळेतील कार्यक्रम आटोपून घरी परतली अन् सायंकाळी ५.३० ला आपल्या लहान बहिणीसोबत सोफ्यावर टीव्ही बघत बसली. तिची आई अन् आजी गच्चीवर धान्य साफ करीत होत्या. तेवढ्यात दातऱ्या घरी आला. त्याने मुलीचा हात हातात घेतला अन् ‘तू माझ्यावर प्रेम करतेस की नाही’, अशी विचारणा केली. लहान बहीण बाजूला असताना दातऱ्याने विचारलेल्या प्रश्नाने ती गोंधळली. तिने हात झटकला अन् दातऱ्याला निघून जाण्यास सांगितले. दातऱ्याने तिचा पुन्हा हात पकडला अन् पिरगळला तसेच ‘तू माझ्यावर प्रेम करतेस की नाही’, अशी पुन्हा-पुन्हा विचारणा करू लागला. दातऱ्याच्या भाईगिरीमुळे मुलगी अन् तिची बहीण आरडाओरड करू लागली. ती ऐकून मुलीची आई अन् आजी धावत खाली आल्या. त्यांना पाहून दातऱ्या पळून गेला. या प्रकारामुळे मुलगी दहशतीत आली. वडील घरी आल्यानंतर त्यांना हा प्रकार कळला. त्यानंतर त्यांनी पीडित मुलीसह कळमना ठाण्यात धाव घेतली.
मान उंचावणारा प्रकार
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शहरातील सर्व पोलीस ठाण्याची धुरा मंगळवारी महिला अधिकाऱ्यांनी सांभाळली होती. पोलीस उपनिरीक्षक छाया गुजर यांच्याकडे हे प्रकरण येताच त्यांनी मुलीची तक्रार लिहून घेतली. लगेच पोलिसांचा ताफा आरोपीच्या शोधार्थ रवाना केला. त्याला तासाभरातच अटक करण्यात आली. बुधवारी त्याला कोर्टात हजर करायचे होते. ठाणेदार सुनील बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गुजर यांनी पुराव्यासह कागदपत्रे बनविली अन् घटनेच्या दुसऱ्याच दिवशी अर्थात् २४ तासाच्या आतच दातऱ्याविरुद्ध कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. हा प्रकार नागपूर शहर पोलिसांची मान उंचावणारा तसेच पोलिसांच्या आजवरच्या इतिहासात मैलाचा दगड ठरला आहे. (प्रतिनिधी)

मर्दानी, गंगाजल इफेक्ट
मर्दानी, गंगाजल सारख्या चित्रपटातून महिला पोलीस अधिकाऱ्यांचा दबंगपणा बघायला मिळाला. या चित्रपटात दबंग भूमिका साकारणाऱ्या राणी मुखर्जी, प्रियंका चोप्राच्या अभिनयाचीही जोरदार प्रशंसा झाली. प्रत्यक्षात असा प्रकार कुठे बघायला मिळत नाही. मात्र, कळमन्यात महिला दिनाच्या औचित्याने का होईना एका मुलीवरील अत्याचाराचे प्रकरण एवढ्या झटपट मार्गी लावून कळमना पोलिसांनी तपासाची वेळखाऊ प्रक्रिया बाद केली अन् सिनेमासारखी तत्परता वास्तवात आणली.

Web Title: Jumbo matchmaking ... prison bars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.