सणासुदीच्या कालावधीतील रेल्वेच्या बुकिंगवर आतापासूनच उड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2023 07:59 PM2023-06-22T19:59:49+5:302023-06-22T20:00:49+5:30

Nagpur News सणासुदीच्या कालावधीत भाविकांची विशिष्ट ठिकाणी देवदर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन दलालांनी त्यांची आर्थिक लूट करण्यासाठी आतापासूनच कारस्थान सुरू केले आहे.

Jump now on railway bookings for the festive period | सणासुदीच्या कालावधीतील रेल्वेच्या बुकिंगवर आतापासूनच उड्या

सणासुदीच्या कालावधीतील रेल्वेच्या बुकिंगवर आतापासूनच उड्या

googlenewsNext

नागपूर : सणासुदीच्या कालावधीत भाविकांची विशिष्ट ठिकाणी देवदर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन दलालांनी त्यांची आर्थिक लूट करण्यासाठी आतापासूनच कारस्थान सुरू केले आहे. त्यानुसार, गणेशोत्सवाच्या निमित्ताने मध्य रेल्वेने सुरू केलेल्या अग्रिम आरक्षणासाठी ऑनलाईन बुकिंग काऊंटरवर आतापासूनच उड्या पडत आहेत. दरम्यान, अशा प्रकारच्या तक्रारी वाढत असल्याने रेल्वे प्रशासनाने दलालांकडे नजर रोखली आहे.

गणेशोत्सवाच्या काळात कोकणात भाविकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्येही प्रवाशांची गर्दी वाढते. त्या काळात रिझर्वेशनही मिळत नाही. ते ध्यानात घेता यंदाच्या गणेशोत्सवात भाविकांना सोयीचे व्हावे म्हणून मध्य रेल्वेने १५ ते २१ सप्टेंबर २०२३ या कालावधीत कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांसाठी अग्रिम आरक्षणाची सुविधा (एआरपी) मे २०२३ पासून उपलब्ध करून दिली आहे. दरदिवशी वेगवेगळ्या ट्रेनमध्ये एकूण ५०५८ बर्थची सोय आहे. अर्थात या सात दिवसांत ३५,४०६ सिटस् उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, सकाळी ८ वाजता ऑनलाईन बुकिंग सुरू होताच पहिल्या चार मिनिटांत (सकाळी ८.५९ वाजेपर्यंत) ५४, ४०१ तिकिटांची मागणी नोंदविण्यात आली. यात ५८७५ प्रवाशांनी प्रत्यक्ष काउंटरवर तर ४८,५२६ प्रवाशांकडून ऑनलाईन बुकिंग नोंदविण्यात आली. त्यासंबंधाने मोठ्या प्रमाणात प्रवाशांकडून तक्रारी झाल्यानंतर भारतीय रेल्वे प्रशासनाने त्या तक्रारीची दखल घेऊन बुकिंग प्रक्रिया तपासली असता दलालांचा संशयास्पद सहभाग अधोरेखित झाला आहे. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने तिकिटांची काळाबाजारी करणाऱ्या दलालांकडे नजर रोखली आहे.
 

पहिल्या मिनिटातच अनेक तिकिटे बुक
रेल्वेच्या कोणत्याही अधिकृत एजंटला बुकिंग काऊंटर सुरू झाल्यापासून पहिल्या १५ मिनिटांपर्यंत तिकिट बुक करण्याची परवानगी नसते. तरीसुद्धा पहिल्या एकाच मिनिटात अनेक तिकिटे बुक होतात. अशाच काही तिकिटांचे रेल्वे अधिकाऱ्यांनी विश्लेषण केले असता १८१ पीएनआर तिकिटांपैकी १०२ संशयास्पद दिसून आल्या. शिवाय १६४ जणांची आयडीही संशयास्पद वाटत असल्याने रेल्वे अधिकाऱ्यांनी त्याची वरिष्ठ पातळीवरून चाैकशी सुरू केली आहे.


दलालांकडून आर्थिक लूट

वेगवेगळ्या जणाच्या नावावर तिकिटे बुक करून दलाल नंतर त्या अव्वाच्या सव्वा किंमतीत विकतात. अशा प्रकारे रेल्वे प्रवाशांची दलालांकडून आर्थिक लूट केली जाते.

Web Title: Jump now on railway bookings for the festive period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.