जूनमध्ये संसर्गाचा दर केवळ ०.९१ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:06 AM2021-07-02T04:06:57+5:302021-07-02T04:06:57+5:30
नागपूर : कोरोनाचा रुग्ण व मृत्यूच्या संख्येने एप्रिल महिन्यात जुने सर्व विक्रम मोडले असताना व संसर्गाचा दर सर्वात वर ...
नागपूर : कोरोनाचा रुग्ण व मृत्यूच्या संख्येने एप्रिल महिन्यात जुने सर्व विक्रम मोडले असताना व संसर्गाचा दर सर्वात वर असताना दोन महिन्यांतच तो खाली आला. जून महिन्यात हा दर ०.९१ टक्क्यावर आल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. मागील महिन्यात झालेल्या २६६८६१ नमुन्यांच्या तपासणीत २४४७ रुग्ण पॉझिटिव्ह आले तर, ८२४९ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले.
कोरोनाचा प्रादुर्भावाला मार्च २०२०पासून सुरुवात झाली. या महिन्यात संसर्गाचा दर २.४० टक्के होता. हाच दर जून २०२१मध्ये सर्वात कमी नोंदविला गेला. मागील वर्षी एप्रिलमध्ये ५.४१ टक्के, मेमध्ये ४.२७ टक्के, जूनमध्ये ७.८४ टक्के, जुलैमध्ये ७.०५ टक्के दर होता. त्यानंतर ऑगस्ट महिन्यापासून संसर्गाचा फैलाव गतीने झाला. ऑगस्टमध्ये १३.६५ टक्के, सप्टेंबरमध्ये २४.६३ टक्के, ऑक्टोबरमध्ये १३.६५ टक्के, नोव्हेंबरमध्ये ५.९३ टक्के तर डिसेंबरमध्ये ८.२२ टक्के दर होता. यावर्षी जानेवारीमध्ये ७.८६ टक्के होता तो नंतर वाढून फेब्रुवारी महिन्यात ८.५५ टक्क्यांवर गेला. मार्च महिन्यात २०.११ टक्के, एप्रिल महिन्यात २७.८९ टक्के तर मे महिन्यात १२.७४ टक्क्यांवर पोहचला. कोरोनाचा या दीड वर्षाच्या काळात संसर्गाचा सर्वात कमी दर जून महिन्यात आढळून आला.
-एप्रिल महिन्यात सर्वाधिक, २२९० मृत्यू
कोरोनाचा पहिला मृत्यू एप्रिल २०२०मध्ये झाला. त्यानंतर ही संख्या वाढत गेली. पहिल्या लाटेत सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक मृत्यू झाले. या महिन्यात १४०६ मृत्यूची नोंद झाली. दुसऱ्या लाटेत एप्रिल २०२१मध्ये सर्वाधिक, २२९० मृत्यू झाले.
-जूनच्या शेवटच्या दिवशी २५ रुग्ण, शून्य मृत्यू
जूनच्या शेवटच्या दिवशीही नागपूर जिल्ह्यात शून्य मृत्यूची नोंद झाली. बुधवारी २५ रुग्ण आढळून आले. यात शहरातील १६ तर ग्रामीणमधील ९ रुग्ण होते. ९१ रुग्ण बरे झाल्याने कोरोनामुक्त होण्याचा दर ९८.०४ टक्के झाला. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ४७७०५२ झाली असून मृतांची संख्या ९०२५वर पोहचली आहे. कोरोनाचे ३३६ रुग्ण सक्रिय आहेत.