जंगल सफारी खासगी वाहनाने
By admin | Published: June 19, 2017 02:25 AM2017-06-19T02:25:36+5:302017-06-19T02:25:36+5:30
उपराजधानीला ‘टायगर कॅपिटल’ म्हणून प्रसिद्धी मिळत असली, तरी नागपूरपासून काहीच अंतरावर असलेल्या बोर अभयारण्यात
बोर अभयारण्यात सोईसुविधांचा अभाव : पर्यटकांना आनंदाऐवजी मनस्ताप
योगेंद्र शंभरकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीला ‘टायगर कॅपिटल’ म्हणून प्रसिद्धी मिळत असली, तरी नागपूरपासून काहीच अंतरावर असलेल्या बोर अभयारण्यात पर्यटकांना जंगल सफारी दरम्यान कोणत्याही सोईसुविधा मिळत नसल्याची घटना पुढे आली आहे. यामुळे हजारो रुपये खर्च करून जंगल सफारीसाठी जाणाऱ्या पर्यटकांना मौज आणि आनंदाऐवजी समस्यांचा सामना करावा लागत आहे.
या अभयारण्यातील प्रवेशासाठी मागील सहा महिन्यापूर्वी अडेगाव येथे नवीन गेट सुरू करण्यात आले आहे. परंतु येथे पर्यटकांसाठी अजूनपर्यंत कोणत्याही सोईसुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या नाहीत. पर्यटकांच्या मते, येथील जंगल सफारीसाठी आॅनलाईन बुकिंग करताना जिप्सी उपलब्ध असल्याचा पर्याय दाखविला जातो.
त्यानुसार अनेकजण जिप्सीची निवड करतात. शिवाय त्यानुसार पर्यटक गेटवर जिप्सी उपलब्ध होणार, असे गृहित धरू न तेथे पोहोचतात. परंतु तेथे गेल्यानंतर कोणतीही जिप्सी मिळत नाही, कारण वन विभागाने अजूनपर्यंत तशी कोणतीही सोय उपलब्ध केलेली नाही. एवढेच नव्हे, तर या गेटवर पर्यटकांना साधे पिण्यासाठी पाणी सुद्धा मिळत नाही. मग महिलांसाठी शौचालय आणि इतर सोईसुविधांचा विचार न केलेलाच बरा. यामुळे विशेषत: महिलांना फार मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो.
महिला पर्यटक नीलिमा महात्मे यांच्या मते, अडेगाव गेटवरील वन विभागाच्या कार्यालयात एक शौचालय आहे. परंतु ते कार्यालय सुरू झाल्यानंतर उघडल्या जाते. तसेच शहरातील देशपांडे परिवार आपल्या खासगी वाहनाने अडेगाव गेटवर जंगल सफारीसाठी पोहोचला होता. त्यांना गेटवर जंगल सफारीसाठी जिप्सी मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु त्यांना कोणतीही जिप्सी मिळाली नाही. शिवाय त्यांनी प्रवेश शुल्क भरल्यानंतर त्यांच्यासोबत एक महिला गाईड देण्यात आली.
मात्र जंगलातील रस्त्यांवरू न छोटी खासगी कार चालविणे फारच कठीण झाले होते. कारच्या चालकाला फार मोठी कसरत करावी लागत होती. यामुळे त्यांना जंगल सफारीचा आनंद मिळण्याऐवजी समस्यांचाच अधिक सामना करावा लागला.