सुट्यांमध्ये जंगल सफारीची धूम!
By admin | Published: November 2, 2016 02:29 AM2016-11-02T02:29:13+5:302016-11-02T02:29:13+5:30
सध्या शाळांना दिवाळीच्या सुट्या सुरू असून, अनेकांनी जंगल सफारीसाठी जंगलांकडे मोर्चा वळविला आहे.
ताडोबा फुल्ल : दिवाळी सुट्यांचा आनंद
नागपूर : सध्या शाळांना दिवाळीच्या सुट्या सुरू असून, अनेकांनी जंगल सफारीसाठी जंगलांकडे मोर्चा वळविला आहे. यामुळे बहुतांश जंगलात पर्यटकांनी धूम केली आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबाला प्रथम पसंती मिळत असून, येथील पुढील ७ नोव्हेंबरपर्यंत जंगल सफारीचे आॅनलाईन बुकिंग फुल झाले आहे. त्या तुलनेत पेंच, उमरेड-कऱ्हांडला, बोर व नवेगाव-नागझीरा व्याघ्र प्रकल्पाला पर्यटकांचा कमी प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. ताडोबाचा अपवाद वगळता या सर्व ठिकाणी आॅनलाईन बुकिंग उपलब्ध आहे.
ताडोबा-अंधेरी येथील प्रवेशासाठी एकूण सहा गेट तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार खुटंडा, कोलर, मोहुर्ली, नवेगाव, पांगली व झरी या सर्व गेटवर पर्यटकांच्या रांगा लागत आहे. पावसाने विदर्भातून निरोप घेताच वन विभागाने पर्यटनासाठी या सर्व जंगलांची दारे उघडली आहेत. दरवर्षी साधारण १६ आॅक्टोबरपासून जंगल पर्यटनाला सुरुवात होते. परंतु यंदा उशिरापर्यंत पाऊस सुरू राहिल्याने १९ आॅक्टोबरपासून सर्व जंगलांची दारे उघडण्यात आली आहे.
विदर्भातील या घनदाट जंगलातील रानवाटावरून जाताना केवळ समृद्ध वनांचीच नाही, तर त्यामध्ये अधिवास करणाऱ्या विविध प्राणी, पशु-पक्षी आणि फुलांचीही माहिती मिळते. ही निसर्गसंपदा आपल्याला सुखावून टाकते. आपल्या अशांत मनाला शांत करते. येथील जंगलात रंगीबेरंगी फुलपाखरे आहेत, पट्टेदार वाघोबा आहे, तसेच इथे गवा आणि हरणाचेही दर्शन घडते. शिवाय चिवचिवाट करणाऱ्या असंख्य पक्ष्यांसह सरपटणारे प्राणीही आपले लक्ष वेधून घेतात. एवढेच नव्हे, तर या नैसर्गिक सौंदर्याच्या साथीला खळखळाट करणाऱ्या नद्या सुद्धा आहेत. नागपूर हा असा जिल्हा आहे की, जेथे घनदाट जंगलासोबतच गडकिल्ल्यांचा एक वैभवशाली इतिहास आहे. शिवाय येथे जगविख्यात दीक्षाभूमी आहे. डॉ. हेडगेवार स्मारक, टेकडी गणपती मंदिर, रमण विज्ञान केंद्र, अंबाझरी तलाव व फुटाळा चौपाटी आहे. तसेच जिल्ह्यात विदर्भाचे पंढरपूर म्हणून प्रख्यात धापेवाडा येथील विठ्ठलाचे मंदिर, आदासा येथील गणपती मंदिर, रामटेक येथील श्रीरामाचे गडमंदिर, कामठी येथील ड्रॅगन पॅलेस, खिंडसी येथील तलाव, कुवारा भिवसेन, कोराडी येथील जगदंबा मंदिर व पारडसिंगा येथील अनसूया मातेचे मंदिर या धार्मिक पर्यटनासह नगरधनचा किल्ला, गाविलगडचा किल्ला, सीताबर्डीचा किल्ला असे अनेक ऐतिहासिक किल्ले आहेत. मागील काही वर्षांत पर्यटकांमध्ये जंगल पर्यटनाचे चांगलेच ‘बूम’ वाढले आहे.(प्रतिनिधी)
गोरेवाडाचे वाढतेय आकर्षण
मागील काही दिवसांत गोरेवाडा पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. त्यामुळे येथे पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. वन विभागाने मागील वर्षी येथे प्रथमच ‘सायकल सफारी’चा प्रयोग राबविला होता. त्याला पर्यटकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. याशिवाय येथे ‘नाईट सफारी’ सुद्धा सुरू करण्यात आली आहे. या सफारीसाठी येथे प्रति वाहन २०० रुपये व १०० रुपये गाईड शुल्क आकारले जातात. येथील घनदाट जंगलात बिबट, चितळ, मोर, सांबर व नीलगाय यासारख्या अनेक वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. याशिवाय येथे विविध प्रजातींचे दुर्मिळ पक्षीसुद्धा पाहायला मिळतात. त्यामुळे शहरापासून काहीच अंतरावर असलेले हे जंगल नेहमीच नागपूरकरांच्या आकर्षणाचे केंद्र राहिले आहे.
वाघासाठी जंगल सफारी
पर्यटकांमध्ये वाघाचे नेहमीच आकर्षण राहिले आहे. त्यामुळे अनेकजण केवळ वाघ पाहण्यासाठी जंगल सफारीला जातात. त्याच वेळी मागील काही वर्षांत विदर्भातील जंगलात वाघांची प्रचंड संख्या वाढली आहे. त्यामुळे ताडोबा, उमरेड-कऱ्हांडला व पेंचसारख्या जंगलात सहज व्याघ्र दर्शन घडून येत आहे. मागील काही वर्षांत वन विभागाने जंगल पर्यटनाकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यातून जंगलात पर्यटकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध केल्या जात आहे. ताडोबा, पेंच व बोर येथे निवासाची सुंदर व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय आता उमरेड-कऱ्हांडला येथे सुद्धा अनेक विकासाची कामे केली जात आहे.