गस्तीच्या नावाखाली जंगल पर्यटन!
By Admin | Published: January 8, 2016 03:55 AM2016-01-08T03:55:39+5:302016-01-08T03:55:39+5:30
सध्या वन विभाग जंगल पर्यटनाच्या चांगल्याच मोहात पडला आहे. त्यामुळे वरिष्ठ वन अधिकारी पर्यटन वाढविण्यासाठी नव नवीन क्लृप्त्या शोधत आहेत.
वन विभागाची नवी क्लृप्ती : सीसीएफने जारी केले पत्र
नागपूर : सध्या वन विभाग जंगल पर्यटनाच्या चांगल्याच मोहात पडला आहे. त्यामुळे वरिष्ठ वन अधिकारी पर्यटन वाढविण्यासाठी नव नवीन क्लृप्त्या शोधत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वन विभागाने पर्यटकांच्या माध्यमातून आपल्या पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील नागलवाडी वन परिक्षेत्रात रात्र गस्त, पायदळ गस्त व मचान गस्त सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधी पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तथा मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांनी अलीकडेच एक पत्र जारी केले आहे. त्या पत्रात बफर क्षेत्रातील अवैध वृक्षतोड, शिकार व अवैध चराई यासारख्या गोष्टी रोखण्यासाठी ही गस्त सुरू करण्यात येत असल्याचे सांगितले आहे. परंतु त्यासोबतच रात्रीच्या गस्तीसाठी प्रतिवाहन २ हजार रुपये, पायदळ गस्तीसाठी प्रति व्यक्ती ५०० रुपये व मचान गस्तीसाठी प्रत्येकी (चमूसाठी) दोन हजार रुपये आकारले जातील, असेही स्पष्ट केले आहे. यावरू न गस्तीच्या नावाखाली जंगलात ‘नाईट सफारी’ सुरू करण्याबाबत मानस स्पष्ट होत आहे. त्यामुळे वन विभागाची ही रात्र गस्ती सध्या चांगलाच चर्चेचा विषय बनली आहे.
वन विभागाच्या त्या पत्रानुसार पर्यटकांना सामुदायिक रात्र गस्त, पायदळ गस्त किंवा मचान गस्तीकरिता चार दिवस पूर्वी पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालक कार्यालयातील सहायक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव) यांच्याकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. यात वन्यजीव प्रेमी व वन्यजीव संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.(प्रतिनिधी)