चार वर्षांत स्पर्धा परीक्षा न झाल्याने कनिष्ठ सहायकांची वरिष्ठ होण्याची संधी हुकली
By गणेश हुड | Published: November 29, 2023 02:22 PM2023-11-29T14:22:14+5:302023-11-29T14:22:21+5:30
कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांना दिले निवेदन
नागपूर : शासन निर्णयानुसार वरिष्ठ सहायक पदासाठी मर्यादित स्पर्धा परीक्षा घेतली जाते; परंतु जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत कनिष्ठ सहायकांची मागील चार वर्षांत ही परीक्षाच न झाल्याने त्यांची वरिष्ठ सहायक होण्याची संधी हुकली आहे. ही परीक्षा तातडीने घेण्यात यावी. अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने सोमवारी विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून केली.
आयुक्तांच्या वतीने आस्थापना शाखेचे बीडीओ उमेश निकम यांनी निवेदन स्वीकारले. शिष्टमंडळात राज्य कार्याध्यक्ष संजय धोटे, राज्य उपाध्यक्ष पंकज गुल्हाणे, जिल्हा अध्यक्ष सत्येंद्र अत्रे, जिल्हा उपाध्यक्ष नरेश इटनकर, उपाध्यक्ष अनिल बालपांडे, सरचिटणीस वैभव तांबेकर, उपाध्यक्ष चंद्रमणी मनवर, कोषाध्यक्ष मिथिलेश देशमुख यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
मागील चार वर्षांत नागपूर विभागात परीक्षा घेण्यात आलेली नाही. त्यामुळे नागपूर विभागातील जिल्हा परिषदेतील वरिष्ठ सहायक स्पर्धा परीक्षेची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. दुसरीकडे कनिष्ठ सहायक लिपिकपदावर मागील सात वर्षांपासून कार्यरत असल्याची पात्रता पूर्ण करून व सेवा प्रवेश परीक्षा उत्तीर्ण असताना सुद्धा अनेक जण परीक्षा देण्यापासून वंचित असल्याने वरिष्ठ सहायक पदावर संधी मिळालेली नाही. दुसरीकडे पुणे, अमरावती व अन्य विभागात अशा स्वरुपाच्या स्पर्धा परीक्षा नियमित सुरू असल्याचे शिष्टमंडळाने उमेश निकम यांच्या निदर्शनास आणले.