कनिष्ठ अभियंता बोरकरला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी
By admin | Published: January 3, 2016 03:39 AM2016-01-03T03:39:16+5:302016-01-03T03:39:16+5:30
नगर परिषद दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत झालेल्या बांधकामात गैरव्यवहारप्रकरणी कनिष्ठ अभियंता सुरेश बोरकर यांना कामठी पोलिसांनी अटक केली.
कामठी : नगर परिषद दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत झालेल्या बांधकामात गैरव्यवहारप्रकरणी कनिष्ठ अभियंता सुरेश बोरकर यांना कामठी पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी आरोपीस कामठी न्यायालयातील सत्र न्यायाधीश पी. एस. इंगळे यांच्या न्यायालयात हजर करून आरोपीची ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळविली.
स्थानिक नगर परिषदेच्या दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत प्रभाग ७ मधील सिमेंट रोड बांधकामात कनिष्ठ अभियंता सुरेश बोरकर यांनी कंत्राटदाराशी संगनमत करून बनावट बिले सादर केली. सदर बांधकामाचे दुसऱ्यांदा बिल सादर करून सहा लाखांची उचल करून गैरप्रकार केल्याची तक्रार मुख्याधिकारी रवींद्र पांढरे यांनी ३ डिसेंबर रोजी नवीन कामठी पोलीस ठाण्यात केली होती.
या प्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी कनिष्ठ अभियंता बोरकर यांच्याविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७७, १६६ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. गुन्हा दाखल होताच आरोपीने अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी जिल्हा सत्र व उच्च न्यायालयात धाव घेतली. दोन्ही न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर बोरकर यांनी सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी प्रयत्न चालविले होते.
दरम्यान, शुक्रवारी (दि.१) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तहसील कार्यालय परिसरात बोरकर यांना अटक केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीस शनिवारी कामठी सत्र न्यायालयात न्यायाधीश पी.एस. इंगळे यांच्या न्यायालयात हजर करून आरोपीची ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळविली.
या बांधकाम गैरप्रकरणी महिला कंत्राटदारास चार दिवसांपूर्वी गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली होती. सदर महिला कंत्राटदाराची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.
या बांधकाम गैरप्रकारात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून अजूनही काही मोठे मासे अडकणार असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात चर्चिली जात आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश गोवेकर, सहायक पोलीस निरीक्षक अमरसिंग जायवार करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)