जीवघेणे मॅनहोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 12:51 AM2017-09-05T00:51:42+5:302017-09-05T00:53:21+5:30
मुंबईत नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे जलमय झालेल्या रस्त्यावर चालताना एका डॉक्टरचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यु झाला.
निशांत वानखेडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबईत नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे जलमय झालेल्या रस्त्यावर चालताना एका डॉक्टरचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यु झाला. नागपुरातील अवस्थाही जवळपास सारखीच आहे. विशेष म्हणजे नागपुरातही याआधी खुल्या मॅनहोलमध्ये पडून दोघांचा बळी गेला असून, अनेक अपघात झाले आहेत. असे असताना महापालिका प्रशासनाला जाग आलेली दिसत नाही. शहरात सर्वच भागात हजारोच्या संख्येने मॅनहोल आणि गटारीचे खड्डे उघडे पडलेले आहेत. मात्र याबाबतची स्पष्ट आकडेवारी आरोग्य विभाग आणि लोककर्म विभागाकडे नसल्याचे दिसून येत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून दीक्षाभूमीपासून नीरी मार्गाच्या रस्त्याचे सिमेंटीकरण सुरू आहे. नीरी भागाचे काम अपूर्ण असून, वसाहतीच्या भागाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक वसाहतीच्या भागाने होत आहे. नेमके वसाहतीच्याच भागातील फुटपाथवरील गटारीचे मॅनहोल उघडे पडलेले आहेत. हे मॅनहोल अपघाताला कारणीभूत आहेतच, शिवाय दीक्षाभूमीवर येणाºया अनुयायांसाठीही धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. शहरातील सर्वच भागात ही अवस्था आहे. वर्षभरापूर्वीच्या आकडेवारीनुसार शहरात ९०० किलोमीटरची स्टार्म लाईन असून, त्याचे प्रत्येक २० मीटरवर एक असे एका किलोमीटरवर ५० मॅनहोल आहेत. सोबतच ९५० किलोमीटरची सिवरेज लाईन असून, त्याचे एका किलोमीटरमागे १०० मॅनहोल आहेत.
शहर वाढत असल्याने यामध्ये आणखी वाढ झाल्याची शक्यता आहे. अशाप्रकारे शहरभर जवळपास दीड लाखांच्यावर मॅनहोल आहेत. यापैकी २५ ते ३० टक्के म्हणजे ३० हजारांवर मॅनहोल उघडे असल्याचे सांगितले जात आहे. मुसळधार पाऊस झाला तर हे मॅनहोल दिसेनासे होतात व त्यामुळे मोठा अपघात किंवा मृत्यूही होण्याची शक्यता असते. पाऊस नसतानाही खुल्या मॅनहोल आणि गटारीच्या खड्ड्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. २०१३ मध्ये अशाचप्रकारे मॅनहोलमध्ये पडून हर्षल मेश्राम या चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. याशिवाय गड्डीगोदाम भागातील अॅन्थोनी पॉल नामक व्यक्ती खुल्या मॅनहोलमुळे झालेल्या अपघातात जखमी होऊन मरण पावले होते. यासोबतच दररोज लहान-मोठे अपघात होत असल्याने ही समस्या गंभीर आहे. मनपा प्रशासन मात्र एखादा मोठा अपघात होण्याची प्रतीक्षा करीत असल्यासारखे या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे.
मॅनहोलवरील झाकणे कधी नगरसेवकांच्या निधीतून तर कधी प्रशासनाकडून लावले जातात. अनेकदा मॅनहोलची झाकणे चोरी जाण्याचा प्रकारही होत असतो.
गटारी आणि सिवरेज सफाईची जबाबदारी असलेल्या आरोग्य विभागाने खुल्या मॅनहोलची माहिती प्रशासनाला देणे आवश्यक असते. मात्र शहरात एकूण मॅनहोलची संख्या किती आणि त्यापैकी कितीवर झाकणे लागली आहेत, याबाबत आरोग्य विभाग आणि लोककर्म विभागाकडेही माहिती नाही. शहरातील मॅनहोलबाबत सुरक्षेची स्थिती काय, यावरूनही प्रशासनात संभ्रमाची अवस्था आहे. त्यामुळे सुरक्षेची हमी कशी मिळणार, हा सामान्य नागपूरकरांना पडणारा प्रश्न आहे.
खुल्या गटारी आणि मॅनहोलची माहिती करून त्यांना व्यवस्थित करण्याचे काम विभागाकडून नियमितपणे करण्यात येते. मात्र शहरातील एकूण मॅनहोलची स्पष्ट आकडेवारी विभागाकडे उपलब्ध नाही आणि मॅनहोल खुले असल्याची कुठलीही माहिती सध्या तरी विभागाकडे नाही.
- दीपक सोनटक्के,
अधीक्षक अभियंता, महापालिका