रणजित देशमुख यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट
By admin | Published: July 11, 2017 01:58 AM2017-07-11T01:58:24+5:302017-07-11T01:58:24+5:30
धनादेश अनादर प्रकरणाच्या विशेष न्यायालयाने परसेप्ट वेब सोल्युशन कंपनीचे संचालक माजी मंत्री रणजित देशमुख व अमित धुपे यांच्याविरुद्ध चार हजार रुपयांचा जामीनपात्र वॉरंट बजावला आहे.
विशेष न्यायालय : धनादेश अनादराचे प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धनादेश अनादर प्रकरणाच्या विशेष न्यायालयाने परसेप्ट वेब सोल्युशन कंपनीचे संचालक माजी मंत्री रणजित देशमुख व अमित धुपे यांच्याविरुद्ध चार हजार रुपयांचा जामीनपात्र वॉरंट बजावला आहे. त्यांना १९ जुलै रोजी व्यक्तिश: किंवा वकिलामार्फत न्यायालयात उपस्थित व्हायचे आहे.
परसेप्ट वेब सोल्युशन कंपनीने तक्रारकर्ते अतुल देवगडे यांच्याकडून कॉम्प्युटर नेटवर्किंगच्या वस्तू खरेदी केल्या होत्या. त्या मोबदल्यात कंपनीने ११ लाख रुपयांचे सहा धनादेश दिले होते; त्यापैकी पाच धनादेशांचा अनादर झाला. देशमुख व धुपे यांच्यासह भाविन पारेख व पल्लवी पारेख हे कंपनीचे संचालक आहेत. देवगडे यांनी चारही संचालकांविरुद्ध विशेष न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. नोटीस मिळाल्यानंतर भाविन व पल्लवी पारेख न्यायालयात उपस्थित झाले. परंतु देशमुख व धुपे यांनी न्यायालयाला प्रतिसाद दिला नाही.
त्यामुळे त्यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट बजावण्यात आला आहे. १९ जुलै रोजी व त्यानंतर पुढील निर्देशानुसार न्यायालयात उपस्थित होण्याची हमी दिल्यास त्यांना चार हजार रुपये भरल्यावर जामीन दिला जाईल. जामीनपात्र वॉरंटची दखल न घेतल्यास त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केला जाऊ शकतो. तक्रारकर्त्यातर्फे अॅड. इब्राहिम बख्श आझाद यांनी बाजू मांडली.