दीपक बजाजसाठी कारागृहच योग्य ठिकाण
By admin | Published: December 23, 2015 03:46 AM2015-12-23T03:46:49+5:302015-12-23T03:46:49+5:30
भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा ओलांडणाऱ्या व नैतिकता पायदळी तुडविणाऱ्या दीपक बजाजसाठी कारागृह हेच योग्य ठिकाण आहे.
हायकोर्टाचे निरीक्षण : भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा ओलांडल्या
नागपूर : भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा ओलांडणाऱ्या व नैतिकता पायदळी तुडविणाऱ्या दीपक बजाजसाठी कारागृह हेच योग्य ठिकाण आहे. तो जामिनावर सोडण्याच्या लायकीचा नाही असे परखड निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बजाजचा जामीन अर्ज फेटाळताना नोंदविले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागानुसार बजाजकडे ४१४ कोटी रुपयांवर बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे. एका शाळेचे मुख्याध्यापक म्हणून कार्य करीत असताना एवढी मोठी मालमत्ता कोठून आली यावर बजाजकडे काहीच स्पष्टीकरण नाही. परिणामी तो जामिनावर सोडण्यास पात्र नाही. त्याच्यासाठी कारागृह हेच योग्य ठिकाण आहे. किमान खटल्यावरील सुनावणी पूर्ण होतपर्यंत त्याला कारागृहातच ठेवायला पाहिजे असे न्यायालयाने म्हटले आहे.
चौकशी पूर्ण होऊन दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर खटल्यावर वेगात सुनावणी करण्यासाठी बजाज हा विशेष न्यायाधीशांकडे अर्ज सादर करू शकतो. विशेष न्यायाधीशांनी त्याच्या विनंतीवर विचार करावा. तसेच, या प्रकरणावर प्राधान्यक्रमाने सुनावणी पूर्ण करावी असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.(प्रतिनिधी)
जामिनावर सोडणे धोकादायक
शासनाने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून प्रकरणाचा तपास अजून अपूर्ण असल्याचे सांगितले होते. याबाबतचे सबळ पुरावे लक्षात घेता न्यायालयाने बजाजला सध्याच्या परिस्थितीत जामिनावर सोडणे धोकादायक होईल व नागपूरबाहेर राहण्यास सांगितले तरी, तो तपास कार्याला प्रभावित करू शकतो असे स्पष्ट केले आहे. त्याने गरिबांची पिळवणूक करून व गरजूंकडून नोकरी देण्याकरिता मोठी रक्कम गोळा केली आहे. एवढेच नाही तर, मागणीनुसार रक्कम न देणाऱ्यांना त्याने नोकरीवरून काढून टाकले आहे. त्यापैकी अनेक जणांनी आधी दिलेले काही लाख रुपये गमावले आहेत. ही रक्कम दिल्यानंतरसुद्धा आज ते बेरोजगार झाले आहेत असे तथ्य न्यायालयाने आदेशात नोंदविले आहे.