कारागृह की रेस्ट हाऊस?
By admin | Published: April 1, 2015 02:28 AM2015-04-01T02:28:27+5:302015-04-01T02:28:27+5:30
एखाद्या हॉटेलमध्ये बसल्यानंतर कडक नोट दाखवणाऱ्या ग्राहकाला वेटर ज्याप्रमाणे मटन, चिकन, साबण, सेंट, सिगारेट किंवा मागेल ते आणून देतो.
नरेश डोंगरे नागपूर
एखाद्या हॉटेलमध्ये बसल्यानंतर कडक नोट दाखवणाऱ्या ग्राहकाला वेटर ज्याप्रमाणे मटन, चिकन, साबण, सेंट, सिगारेट किंवा मागेल ते आणून देतो. अगदी त्याचप्रमाणे काही अधिकाऱ्यांचे खिसे गरम केल्यास नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात संबंधित कैद्याला मटन, चिकन, साबण, सेंट, मिठाईच नव्हे तर दारू, गांजा, गर्द, चरस, सिगारेट, अन् गुटखा मिळतो. प्रतिबंध असून मोबाईल मिळतो झोपायला गद्दाही (गादी) मिळतो. होय, ही वास्तविकता आहे. पैशासाठी चटावलेल्या नागपूर मध्यवर्ती कारागृहातील काही खाबूगिरी वृत्तीच्या अधिकाऱ्यांनी मध्यवर्ती कारागृहाला रेस्ट हाऊस बनवले. त्याचमुळे अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून चक्क पाच खतरनाक कैदी पळून गेले. राज्य कारागृह प्रशासनाचे या घटनेमुळे नाक कापल्यासारखे झाले आहे.
इंग्रज राजवटीत मध्य भारतात एकाच वेळी दोन मध्यवर्ती कारागृह बांधले गेले. त्यातील एक म्हणजे नागपूरचे कारागृह. राज्यात सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या या कारागृहांमध्ये दहशतवादी, नक्षलवादी, अंडरवर्ल्ड डॉन आणि विदेशी कैद्यांनाही ठेवण्यात येतात. आज घडीलाही येथे दहशतवादी, याकूब मेमन, हिमायत बेग, अनेक कडवे नक्षलवादी, अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी, एक पाकिस्तानी कैदी आणि राज्यातील अनेक खतरनाक कैदी बंदिस्त आहेत. त्यामुळे येथील सुरक्षा व्यवस्था अधिकच कडक असण्याची गरज आहे. मात्र गेल्या दीड-दोन वर्षांपासून या कारागृहातील कारभार चर्चाच नव्हे तर चिंतेचाही विषय ठरला होता.
प्रारंभी निवडक कैद्यांना अधिकाऱ्यांच्या मर्जीने मोबाईल उपलब्ध करून दिल्या जात असल्याची ओरड होती. आता मात्र मोबाईलच नव्हे तर दारू, मटन, गांजा, चरस, गर्द,महागड्या साबण, गाद्या, प्रेसचे कपडे, मिठाई, सेंट असे सारेच उपलब्ध करून दिले जाते. आजघडीला कारागृहात ५०० पेक्षा जास्त मोबाईल आणि एक हजारांपेक्षा जास्त सीमकार्ड असल्याचे सूत्र सांगतात. मोबाईलची बॅटरी चार्ज करण्याचा फंडाही एका ‘टेक्नोसॅव्ही’ कैद्याने शोधला असून, रात्रभर अनेक कैदी या कारागृहातून आपल्या आप्तांशी, मित्रांशी गप्पा मारतात. कारागृहातून बाहेरची हवा खायची असेल, तर मेडिकलच्या नावाखाली त्या कैद्याला पाहिजे त्यावेळी बाहेर काढले जाते. बाहेरच्या सफरीत त्याला बिर्याणी, चिकन, मटन, दारूचा आस्वाद घेता येतो. पैसे दिल्यास बडी गोलमध्ये जागा मिळते.
नुकत्याच खुनाच्या आरोपात आत गेलेल्या एका कैद्याने मागणी केल्यामुळे चार दिवसांपूर्वी त्या कैद्याला मिठाईचे भलेमोठे पॅकेट पाठविण्यात आल्याची चर्चा होती. पैसे दिल्यास काहीही उपलब्ध होत असल्यामुळे अनेक गुन्हेगारांना येथील मध्यवर्ती कारागृह ‘रेस्ट हाऊस’सारखेच वाटू लागले आहे.
विशेष म्हणजे, या गैरप्रकाराचे अनेकदा प्रसार माध्यमांनी वाभाडे काढले. मात्र स्थानिकच काय, पुण्या-मुंबईतील वरिष्ठांनाही त्याकडे लक्ष देण्याची गरज भासली नाही. त्यामुळे कारागृहातील कारभार बोकाळला. अधिकारी अन् कैदीही निर्ढावले. परिणामी कैद्यांच्या आपसातील हाणामाऱ्या, परस्परांवरील हल्ले वाढले. दीड-दोन वर्षांपूर्वी एका तरुण कैद्याला आतमधील काही कैद्यांनी गळा दाबून ठार मारले. दोन महिन्यांपूर्वी एका कैद्याला काही कैद्यांनी एवढे बदडले की तो डबलरोटीसारखा सुजला. या गैरप्रकाराचे वृत्त वेळोवेळी लोकमतने प्रकाशित केले होते. कारागृह महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांच्याही कानावर हा प्रकार घालण्यात आला; मात्र त्यांनी त्याची गंभीर दखल घेतली नाही. त्यामुळेच आज कारागृह प्रशासनाची नाचक्की करणारा हा खळबळजनक प्रकार घडला.
अधीक्षक नव्हे राजाबाबू!
कारागृह अधीक्षक वैभव कांबळे यांना कारागृहातील अधिकारी, कर्मचारी अन् कैदीही ‘राजाबाबू’ असे संबोधतात. कारागृहातील सुरक्षेला प्राधान्य देण्याऐवजी ते ‘अर्थपूर्ण सोयीसुविधा’ उपलब्ध करून देण्याला प्राधान्य देतात. स्वत:च्या सुरक्षेवर त्यांचे खास लक्ष आहे. कारागृहातील सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या अनेक रक्षकांना कांबळे यांनी आपल्या बंगल्यावर तैनात केल्याची माहिती काही रक्षक आज पत्रकारांना देत होते. त्यांच्या बंगल्याची सुरक्षा अन् खासगी कामे ते रक्षकांकडून काढून घेतात. नकार दिल्यास कारवाईचा धाक दाखवतात, अशीही त्यांनी ओरड केली. कारागृहात एक अॅम्बुलन्स (टाटा सुमो) आहे. मात्र, तिचा वापर आजारी कैद्याच्या नेण्या-आणण्यासाठी होत नाही. कांबळे ही सुमो स्वत: वापरतात, असे एका कर्मचाऱ्याने सांगितले. एवढ्या मोठ्या घटनेची कुणालाच कशी कुणकुण लागली नाही, असा प्रश्न केला असता साहेब केवळ ‘हिशेब’ बघतात, असे काही अधिकाऱ्यांनी खासगीत सांगितले.
पहिलीच घटना
१थेट कारागृहाच्या आतून कच्च्या कैद्यांनी (न्यायाधीन बंदी) पळून जाण्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहाच्या अलिकडच्या इतिहासातील ही पहिलीच घटना होय. आजवर कामानिमित्त बाहेर काढण्यात आलेले कैदी पळून जाण्याच्या घटना घडलेल्या आहेत. १९९४ मध्ये बल्लारपूर रोड रॉबरी कांडातील शिक्षा झालेले तीन कैदी पळून गेले होते. अद्यापही ते गवसलेले नाहीत.
कुख्यात राजा गौसचे ‘नंबरकारी’
२टोळी प्रमुखाच्या सोबत राहून गुन्हे करणाऱ्यांना ‘नंबरकारी’ म्हटले जाते. पळून गेलेल्यांपैकी शोएबखान ऊर्फ शिबू, बिसेनसिंग आणि सत्येंद्र गुप्ता हे कुख्यात राजा गौसचे नंबरकारी आहेत. ते राजा गौस याच्यासोबत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) चे आरोपी आहेत.
चादरींचा दोरीसारखा वापर
३पलायनाच्या घटनेनंतर कारागृहातील एका कैद्याने थेट प्रस्तुत प्रतिनिधीशी संपर्क करून माहिती दिली. हे कच्चे कैदी बडी गोलमधील बराक क्रमांक ६ च्या खिडकीचे गज कापून बाहेर आल्यानंतर त्यांनी चादरींचा दोरीसारखा वापर करून आधी छोटी भिंत पार केली. त्यानंतर त्यांनी मोठी उत्तुंग भिंत पार केली. एकमेकांच्या खांद्यावर उभे राहून पहिला माणूस भिंतीच्या टोकापर्यंत पोहोचला त्यानंतर चादरींचा वापर करण्यात आला. ते बडी गोलच्या मागच्या भागाला असलेल्या प्रेस गेटमधून पळाले होते. पलायन नाट्य घडत असताना राजा गौस हा छोट्या गोलमध्ये झोपलेला होता.
अधीक्षकाची नव्हती संचारफेरी
४वैभव कांबळे हे दोन वर्षांपासून कारागृह अधीक्षक आहेत. त्यांनी कधीही कारागृहात संचारफेरी केलीच नाही. संचारफेरी केल्याची कारागृहातील १३ क्रमांकाच्या रजिस्टरमध्ये कोणतीही नोंद नाही, ही माहिती सूत्रांकडून समजली. आठवड्यातून एक दिवस रात्री आणि सोमवार, मंगळवार आणि शुक्रवार या तीन दिवसी सकाळची संचारफेरी कांबळे यांना नेमून देण्यात आलेली होती. संचारफेरीत सर्वच बराकींची तपासणी केली जाते.
टॉवर ठरले कुचकामी
५कारागृहातील बडी गोलच्या मागे, दवाखान्याच्या मागे आणि उत्तरेकडे असे एकूण तीन टेहाळणी मनोरे आहेत. या मनोऱ्यांमध्ये २४ तास पहारेकरी असतो. या शिवाय दोन भिंतीच्या मध्ये वॉर्डर असतात. एक नव्हे तर चक्क पाच जण पळून जातात आणि ते कुणाच्याही लक्षात येत नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.