जरा हटके! तब्बल ७३६९ शब्दांनी रचली निसर्गपूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 10:14 AM2018-11-16T10:14:20+5:302018-11-16T10:17:17+5:30
नागपुरातील अॅड. श्रीपाद वैद्य यांनी निसर्गाची पूजा लिखित स्वरूपात रचली आहे. त्यांच्या या पूजेची नोंद ‘मिरॅकल्स वर्ल्ड रेकॉर्ड’ ने ‘लॉँगेस्ट हॅण्डरिटन मॅन्युस्क्रीप्ट आॅफ गॉड निसर्गदत्त इकोवर्शिप’ म्हणून केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निसर्गसंवर्धन ही काळाची गरज आहे. पर्यावरण संरक्षणाच्या सत्कार्याला भगवंताच्या अधिष्ठानाची जोड मिळाल्यास ते कार्य नक्कीच सफल होऊ शकते, या भावनेतून नागपुरातील अॅड. श्रीपाद वैद्य यांनी आजवर निर्गुण स्वरूपात असलेल्या निसर्गाची पूजा लिखित स्वरूपात रचली आहे. त्यांच्या या पूजेची नोंद ‘मिरॅकल्स वर्ल्ड रेकॉर्ड’ ने ‘लॉँगेस्ट हॅण्डरिटन मॅन्युस्क्रीप्ट आॅफ गॉड निसर्गदत्त इकोवर्शिप’ म्हणून केली आहे.
हिंदू संस्कृतीतील पूजनामध्ये निसर्गाचे अस्तित्व समाविष्ट आहे. पण ते एका मर्यादित स्वरूपात आणि त्याकडेही आपण डोळेझाक करतो आहे. एवढेच नाही तर पूजेच्या स्वरूपात म्हणा की धार्मिक परंपरेच्या रूपात निसर्गाचे दोहनसुद्धा करतो. जसे चौरंगावर पूजा मांडताना आंब्याच्या डाहाळी तोडणे, केळीचे खांब चौरंगाला बांधणे, दसऱ्याच्या सणाला आपट्याच्या झाडाची कत्तल करणे, पोळ्याला मेढ्या म्हणून झाड तोडणे, होळीला वृक्षांचे दहन करणे. वेगवेगळ्या सणांच्या माध्यमातून निसर्गाचे दोहन आपण करतो. श्रीपाद यांनी रचलेली पूजा निसर्गाच्या दोहनाची नाही तर निसर्गाच्या रक्षणाच्या हेतूने लिहिली आहे. त्यांनी ७३६९ शब्दांची निसर्गपूजा ही स्वहस्ताक्षरात लिहिली आहे. यात घेतलेले संदर्भ हे श्रीमद्भगवत गीता, दत्तगुरूचरित्र, पंचांग व विविध धार्मिक ग्रंथातून घेतले आहे. श्रीपाद यांच्यामते निसर्ग हा देव आहे आणि तो दृष्य स्वरूपात आहे. श्रीदत्तांनी सुद्धा निसर्गातील २४ घटकांना गुरू मानले होते. श्रीपाद यांनी श्रीदत्त चरित्रातून काही संदर्भ घेतले आहेत. निसर्गाच्या या २४ घटकावर त्यांनी जीवनाचे तत्त्वज्ञान मांडणाऱ्या कथा रचल्या आहेत. निसर्गाच्या प्रत्येक घटकाचे महत्त्व विषद केले आहे. पूजेच्या माध्यमातून काही संकल्प मांडले आहेत. ते संकल्प निसर्ग संवर्धनासाठी मानवाला प्रेरित करणारे आहे. विशेष म्हणजे शास्त्रानुसार जी पूजा पद्धती आहे, त्याला जराही धक्का न लावता, कर्मकांडाचा समावेश नसलेली निव्वळ निसर्गाचे अस्तित्व अनुभव करून देणारी ही निसर्गदत्त पूजा आहे. ही पूजा लिहिताना पूजेसाठी वापरण्यात येणारे साहित्य, मंत्र आणि कथांचाही समावेश केला आहे.
निसर्गदत्त पूजा म्हणजे काय?
श्रीपाद यांच्या मते निसर्ग हा या सृष्टीचा खरा ईश्वर आहे. निसर्गातील वेगवेगळ्या घटकांच्या महत्त्वाला धार्मिकतेशी जोडून आणि वैज्ञानिक संदर्भ देऊन मानवी कल्याणाचा संदेश त्यातून दिला आहे. निसर्गदत्त पूजा ही साधी पूजापद्धती आहे. फक्त निसर्ग हा घटक श्रद्धेय ठेवून तयार केलेली पूजा आहे.
परस्पर स्नेह, वृक्ष व प्राण्यांप्रति आपुलकीची भावना असलेली निसर्गभक्ती वाढीस लागल्याने पर्यावरण समतोल राखला जाऊ शकेल. याच जाणिवेतून निसर्गदत्त ईश्वराप्रति म्हणजेच निसर्गाप्रति आदर व्यक्त व्हावा म्हणून ही निसर्गपूजा महत्त्वाची ठरते. निसर्गपूजेच्या अनुकरणातून व प्रसारातून निसर्गसंवर्धनाला हातभार लागेल हाच उद्देश आहे.
-अॅड. श्रीपाद वैद्य,
निसर्गपूजेचे लेखक