जरा हटके! गणेशमूर्तीच्या विसर्जनानंतर तेथेच अंकुरेल रोपटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 12:08 PM2019-08-30T12:08:39+5:302019-08-30T12:09:01+5:30

लाल माती, सेंद्रिय खत, नैसर्गिक रंग व बियांचा उपयोग करून गणेशमूर्ती तयार करण्यात आली आहे.

Just different! After the immersion of Ganesh idol there was a seedling plant | जरा हटके! गणेशमूर्तीच्या विसर्जनानंतर तेथेच अंकुरेल रोपटे

जरा हटके! गणेशमूर्तीच्या विसर्जनानंतर तेथेच अंकुरेल रोपटे

Next
ठळक मुद्देलाल माती, सेंद्रिय खत, बियांपासून निर्मिती

अंकिता देशकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गणेशोत्सवामुळे पर्यावरणाचे नुकसान होऊ नये यासाठी मुंबई येथील मूर्तिकार दत्ताद्री कोथूर यांनी अनोखा उपाय शोधून काढला आहे. लाल माती, सेंद्रिय खत, नैसर्गिक रंग व बियांचा उपयोग करून गणेशमूर्ती तयार करण्याचा हा उपाय असून ही मूर्ती विसर्जित केल्यानंतर तेथेच रोपटे अंकुरेल व पर्यावरणाचे रक्षण होण्यास हातभार लागेल. या मूर्तीला ‘ट्री गणेशा’ हे नाव देण्यात आले आहे. नागरिकांनी ‘ट्री गणेशा’ला स्वीकारल्यास पर्यावरण संवर्धनाच्या प्रयत्नांना मोठे बळ मिळू शकते.
सुरुवातीला गणेशमूर्ती तयार करण्यासाठी माती वापरली जात होती. मातीच्या मूर्तींमुळे पर्यावरण, जलस्रोत व जलचर प्राण्यांना कोणताही धोका पोहचत नव्हता. काळाच्या ओघात गणेशमूर्ती तयार करण्यासाठी पीओपीचा उपयोग व्हायला लागला. पीओपीची गणेशमूर्ती दिसायला आकर्षक असते. त्यामुळे तिचा उपयोग मोठ्या प्रमाणात वाढला. पीओपी सहज नष्ट होत नाही.
परिणामी, त्याचा पर्यावरण, जलस्रोत व जलचर प्राण्यांवर अतिशय गंभीर परिणाम होतो. हे चित्र बदलण्यासाठी ‘ट्री गणेशा’ प्रभावी उपाय ठरू शकतो.
कोथूर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधल्यानंतर त्यांनी यासंदर्भात विस्ताराने माहिती दिली. पर्यावरण संवर्धन काळाची गरज आहे. त्यामुळे गणेशोत्सव नैसर्गिक पद्धतीने साजरा व्हावा, असे नेहमी वाटत होते. त्यातून ‘ट्री गणेशा’चा विचार मनात आला. त्याला हळूहळू प्रतिसाद मिळत आहे. गेल्यावर्षी नागपुरातून अनेकांनी ‘ट्री गणेशा’ची मागणी केली होती. परंतु, समन्वयक नसल्यामुळे ‘ट्री गणेशा’ नागपूरपर्यंत पोहचवता आला नाही. यावर्षी नमन बेठारिया यांनी ही जबाबदारी घेतली असून, ते नागपुरात ‘ट्री गणेशा’चा प्रचार करीत आहेत, असे कोथूर यांनी सांगितले.
त्यांनी ‘ट्री गणेशा’ तयार करण्याची पद्धतही सांगितली. ‘ट्री गणेशा’ तयार करण्यासाठी गुजरातमधील लाल माती वापरली जाते. एक मूर्ती तयार करण्यासाठी संपूर्ण दिवस लागतो तर, ती मूर्ती वाळण्यासाठी १० दिवस लागतात. मूर्ती तयार करताना मातीत विविध झाडांच्या ७-८ बिया टाकल्या जातात. याशिवाय अन्य वस्तूही नैसर्गिक असतात, अशी माहिती त्यांनी दिली. बेठारिया यांनी नागपूरमध्ये ‘ट्री गणेशा’ला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले.

Web Title: Just different! After the immersion of Ganesh idol there was a seedling plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.