जरा हटके! हरवलेली आजी ४१ वर्षानंतर भेटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 10:43 AM2020-06-26T10:43:33+5:302020-06-26T10:48:20+5:30
सोशल मिडियामुळे ४१ वर्षांपूर्वी हरवलेली आजी अचानक सापडल्याची चित्रपटात शोभावी अशी घटना येथे घडली.
लोकमत न्यूृज नेटवर्क
नागपूर : नागपुरातील एका व्यक्तीची हरवलेली आजी ४१ वर्षांनंतर भेटली. एवढे दिवस एक मुस्लिम कुटुंब आजीचा सांभाळ करीत होते. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केल्यामुळे आजीला स्वत:च्या घरी परतता आले. परंतु, या सकारात्मक प्रसंगासोबत एक नकारात्मक गोष्टही पुढे आली ती म्हणजे, शहर पोलिसांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळे आजीचा लवकर शोध लागू शकला नाही.
पृथ्वी शिंगणे असे नातूचे तर, पंचूबाई (९४) असे आजीचे नाव आहे. पंचूबाई २२ जानेवारी १९७९ रोजी हरवली होती. तिचा मुलगा भैयालाल यांनी लकडगंज पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर ट्रक चालक नूर खान यांना पंचूबाई दमोह बसस्थानकापुढे बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. त्यांनी तिला उचलून घरी नेले व तिचा सांभाळ सुरू केला. दरम्यान, त्यांनी १९८२ मध्ये सीताबर्डी पोलीस ठाण्यात पंचूबाईची माहिती दिली होती. परंतु, कोणत्याही पोलिसांनी एकमेकांशी संपर्क करून चौकशी केली नाही. त्यामुळे पंचूबाईला स्वत:च्या घरी पोहचण्याकरिता ४१ वर्षे लागली.
नूर खान यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी पंचूबाईचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले. परंतु, अनेक दिवस कुणीच पंचूबाईसोबत ओळख दाखवली नाही. एक दिवस पंचूबाईने तिच्या गावाचे नाव परसापूर सांगितले. नूर खान यांचा मुलगा इसरार यांनी गुगलवर शोध घेतला असता हे गाव अमरावती जिल्ह्यात असल्याचे आढळून आले. त्यानंतर गावातील स्वयंसेवी संस्थेच्या साहाय्याने पंचूबाईची माहिती व्हायरल करण्यात आली. दरम्यान, एक व्हिडिओ नागपुरातील डिप्टी सिग्नल येथे राहणारे पंचूबाईचे नातू पृथ्वी शिंगणे यांच्यापर्यंत पोहचला. त्यांची आई सुमनबाई यांनी पंचूबाईला ओळखले. त्यानंतर पृथ्वी यांनी तात्काळ इसरार यांच्याशी संपर्क साधून पंचूबाईला घरी आणले.