जरा हटके ! आपला बाप्पा आपणच घडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 11:25 AM2019-08-29T11:25:11+5:302019-08-29T11:27:43+5:30
पर्यावरण पोषक मूर्ती तयार करण्यासाठी एका आयटी इंजिनीअर दाम्पत्यांनी ‘आपला बाप्पा आपणच घडवा’ एक छोटी चळवळ सुरू केली आहे. त्यासाठी कार्यशाळेच्या माध्यमातून ते मुलांना, युवकांना, महिलांना मूर्ती घडविण्याचे नि:शुल्क प्रशिक्षण देत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे पर्यावरणाला धोका होत असल्यामुळे प्रत्येकजण मातीच्या मूर्ती कशा मिळतील याचा शोध घेतात. पण उत्सवाला व्यवसायाचे रूप आल्याने मोठ्या संख्येने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बाजारात विकल्या जातात. मूर्ती घरी आणल्यानंतर ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसची असल्याचे कळल्यावर निराशा होते. उत्सवाचे पावित्र्य कायम ठेवण्यासाठी आणि पर्यावरण पोषक मूर्ती तयार करण्यासाठी एका आयटी इंजिनीअर दाम्पत्यांनी ‘आपला बाप्पा आपणच घडवा’ एक छोटी चळवळ सुरू केली आहे. त्यासाठी कार्यशाळेच्या माध्यमातून ते मुलांना, युवकांना, महिलांना मूर्ती घडविण्याचे नि:शुल्क प्रशिक्षण देत आहे.
गेले अनेक वर्षे हाताने बाप्पा घडवून आगळावेगळा गणेशोत्सव वाडी येथील प्रफुल्ल लिचडे व नीलिमा लिचडे हे दाम्पत्य साजरा करीत आहे. दोघेही आयटी इंजिनीअर आहे. त्यांनी स्वत: पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबरोबरच इतरांनाही त्यासाठी प्रेरित केले आहे. गणेश उत्सवाच्या पूर्वी हे दाम्पत्य ‘आपले बाप्पा आपणच घडवा ’ यासाठी नि:शुल्क कार्यशाळा घेतात. विशेष म्हणजे दोघेही त्यासाठी खास सुटी काढतात. प्रफुल लिचडे यांना लहानपणापासून मूर्तिकलेची आवड आहे. ते मातीची मूर्ती हाताने घडवून कुठल्याही नैसर्गिक रंगाचा वापर करून मूर्ती सजावट करतात. अनेकांनी त्यांच्याकडे मूर्ती साकारण्याची कला आम्हालाही शिकविण्याचा आग्रह धरला. त्यांनी उत्साहाने कार्यशाळा घेऊन बाप्पा कसे घडविता येईल, याचे प्रशिक्षण दिले . ओबडधोबड मातीला आकार देत अनेकांनी पहिल्यांदाच मातीतून बाप्पा साकारण्याचे प्रयत्न केले. काही अपयशी झाले तर काहींनी आपले कलागुण दाखवत चौसष्ट कलेचा देव मानला जाणारा बाप्पा साकारण्यात यश मिळविले. यापैकी अनेकांनी भविष्यात त्यांच्या घरी अशाच पद्धतीने स्वत:च्या हाताने साकारलेले गणपती बाप्पा बसवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.