जरा हटके! अपंगत्वावर मात करून बनला स्वाभिमानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 10:07 AM2019-11-26T10:07:14+5:302019-11-26T10:08:16+5:30

आयुष्यात आलेल्या आपत्तीने अनेकजण खचतात. नशिबाला दोष देत हताशपणे बसतात. मात्र शंकरनगरात राहणारे नितीन सोमकुवर याला अपवाद ठरले आहेत.

Just different! Overcoming disability became self-esteem | जरा हटके! अपंगत्वावर मात करून बनला स्वाभिमानी

जरा हटके! अपंगत्वावर मात करून बनला स्वाभिमानी

Next
ठळक मुद्देएकाच हाताने काढतो पंक्चरशंकरनगरातील नितीनच्या परिश्रमाची चर्चा

दयानंद पाईकराव।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आयुष्यात आलेल्या आपत्तीने अनेकजण खचतात. नशिबाला दोष देत हताशपणे बसतात. मात्र शंकरनगरात राहणारे नितीन सोमकुवर याला अपवाद ठरले आहेत. लहानपणी अर्धांगवायुमुळे एक हात आणि पाय लुळा पडला. परंतु या अपंगत्वावर अश्रु न ढाळता ते परिस्थितीला सामोरे गेले. आजोबांच्या दुकानात बसून एकाच हाताने चाक उतरविण्यापासून तर पक्चंर काढून चाक बसविण्यापर्यंतचे कसब अंगी बाणवले. ही जीद्दच आता त्यांचा जगण्याचा आधार आणि इतरांसाठी प्रेरणा ठरली आहे.
नितीन सोमकुवर (३८) असे या व्यक्तीचे नाव आहे. नितीन आठ वर्षांचे असताना त्यांना अर्धांगवायु (पॅरालिसीस) झाला. यात त्यांचा उजवा हात आणि पाय निकामी झाला. त्यांना लहान बहीण असून तिचे लग्न झाले आहे.
तर मोठा भाऊ त्याच्या कुटुंबीयांसोबत राहतो. मोठ्या भावावर अवलंबून राहण्यापेक्षा नितीनने स्वयंरोजगाराची कास धरली. त्यांच्या आजोबांचे पंक्चरचे दुकान होते. तेथेच नितीनने पंक्चर काढण्याचे काम शिकले. १९९५ पासून शंकरनगर पेट्रोल पंपाच्या शेजारी ते पंक्चरचे दुकान लावतात.
सायकल, दुचाकी, कार आणि ट्रकचे मोठमोठे टायर ते सराईतपणे काढून पंक्चर काढतात. या कामातून त्यांना दिवसाकाठी २०० ते ३०० रुपये मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
शंकरनगर पेट्रोल पंपावरच त्यांची राहण्याची जागा आहे. सकाळी उठून फ्रेश झाले की ते आपल्या व्यवसायाला सुरुवात करतात. मागील २४ वर्षांपासून आपल्या हिमतीच्या भरवशावर इतरांपुढे हात न पसरता ते आयुष्य जगत आहेत. समाजात अनेकजण हात किंवा पाय निकामी झाल्यानंतर भीक मागतात किंवा इतरांवर अवलंबून राहतात. अशा व्यक्तींना नितीन यांचे काम नक्कीच प्रेरणा देणारे आहे.
हिमतीने जगायला हवे!
अपंगत्व आले तरी प्रत्येकाने आपला काहीतरी व्यवसाय करण्याची गरज आहे. इतरांवर अवलंबून न राहता आणि कुणापुढे हात न पसरता आपल्या हिमतीने स्वाभिमानाने जीवन जगले पाहिजेत, असे मत नितीन सोमकुवर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

 

Web Title: Just different! Overcoming disability became self-esteem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.