बस ‘हायजॅक’ दाम्पत्य निर्दोष
By admin | Published: September 13, 2015 02:39 AM2015-09-13T02:39:03+5:302015-09-13T02:39:03+5:30
बसचालकासह सारेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फितूर झाल्याने संशयाचा लाभ मिळून बहुचर्चित बस ‘हायजॅक’ प्रकरणातील आरोपी दाम्पत्याची सहायक ...
न्यायालय : सारेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार झाले फितूर
नागपूर : बसचालकासह सारेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फितूर झाल्याने संशयाचा लाभ मिळून बहुचर्चित बस ‘हायजॅक’ प्रकरणातील आरोपी दाम्पत्याची सहायक सत्र न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांच्या न्यायालयाने निर्दोष सुटका केली.
सतीश फत्तेसिंग अडमाची (३३) आणि संगीता सतीश अडमाची (२३) रा. बुटीबोरी, असे आरोपी दाम्पत्याचे नाव आहे.
सरकार पक्षानुसार खटल्याची पार्श्वभूमी अशी, इम्रानखान मोबीनखान हा इंडोरामा कंपनीच्या कामगारांची ने-आण करण्यासाठी एमएच-४०-एन-८८४ क्रमांकाची हंसा ट्रॅव्हल्सची बस झाशी राणी चौक (सोया मिल्क कंपनी नाला) ते बुटीबोरी, अशी चालवीत होता. २० आॅगस्ट २००९ रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास हंसा ट्रॅव्हल्सचाच एक चालक राजा याने बस थांबवून तो बसमध्ये बसला होता. पुन्हा बस पुढील प्रवासासाठी सुरू झाली असता अचानक सतीश अडमाची हा जबरदस्तीने बसमध्ये शिरला होता. त्याने चाकू काढून प्रवाशांना दाखवीत बस हायजॅक केल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्याने बसचालकाला बसमधील दिवे बंद करण्यास सांगून बस झाशी राणी चौकाकडे वळवण्यास फर्मावले होते. बस पंचशील चौकातून वळण घेऊन गर्ल्स हायस्कूलसमोर आली असता सतीशची पत्नी संगीता ही बसमध्ये शिरली होती. या दोघांनीही बस हायजॅक केली होती. दरम्यान प्रवाशांपैकीच कोणी तरी मोबाईलने ही माहिती पोलिसांना दिल्याने पोलिसांना बस अडवण्यास यश मिळाले होते. प्रवाशांसह ही बस धंतोली पोलीस ठाण्यात नेण्यात आली होती. चालक इम्रानखान याच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंविच्या ३९२, ३६४-ए, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करून अडमाची दाम्पत्यास अटक केली होती. त्यांच्याकडून चाकू जप्त करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
न्यायालयात प्रत्यक्ष साक्षीपुराव्याच्या वेळी फिर्यादीसह सरकार पक्षाच्या कोणत्याही साक्षीदाराने सरकार पक्षाला मदत केली नाही. सरकार पक्षाने घेतलेल्या उलट तपासणीतही त्यांनी हायजॅकची घटना घडल्याचा इन्कार केला. सरकार पक्षाने जप्त चाकू न्यायालयात सादर केला नव्हता. शस्त्र कायद्याबाबतच्या अधिसूचनेची प्रतही प्रकरणासोबत जोडली नव्हती. या सर्व बाबींचा आरोपींना लाभ मिळून न्यायालयाने त्यांची निर्दोष सुटका केली. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील ए. एम. नायर तर आरोपीच्या वतीने अॅड. ए. टी. सुखदेवे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)