नुसते पाहणी दौरे, कोविड रुग्णालय सुरू होईना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:07 AM2021-04-26T04:07:31+5:302021-04-26T04:07:31+5:30
केटीनगर, पाचपावली, पक्वासा, आयुर्वेदिक कॉलेज येथे ऑक्सिजन उपचार कधी होणार? लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एप्रिल महिन्यात कोरोना संक्रमणाचा ...
केटीनगर, पाचपावली, पक्वासा, आयुर्वेदिक कॉलेज येथे ऑक्सिजन उपचार कधी होणार?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एप्रिल महिन्यात कोरोना संक्रमणाचा प्रकोप सुरू आहे. केटीनगर, पाचपावली रुग्णालय, आयुर्वेदिक महाविद्यालय व पक्वासा, मुळक आयुर्वेदिक कॉलेज या ठिकाणी कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी ऑक्सिजनसह संपूर्ण व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. मागील दोन आठवड्यात मनपातील पदाधिकाऱ्यांनी अनेकदा या ठिकाणी पाहणी दौरे केले. रविवारी पुन्हा केटीनगर येथील रुग्णालयाचा दौरा करून येथील १०० खाटांचे रुग्णालय लवकरच सुरू करण्यात येणाार असून, २५ ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. मागील दोन-तीन आठवड्यापासून नुसते पाहणी दौरे सुरू असल्याने कोविड रुग्णांना ऑक्सिजनसह उपचार कधी होणार, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.
वास्तविक कोरोनाची पहिली लाट आली तेव्हाच मनपाचे इंदिरा गांधी रुग्णालय, पाचपावली, केटीनगर व आयसोलेशन रुग्णालय अपग्रेड करण्यात आले होते. दुसरी लाट येणार असल्याची शक्यताही वर्तविली होती. मात्र मागील सात-आठ महिन्यात पदाधिकारी व प्रशासनाने पाचपावली, केटीनगर येथे ऑक्सिजन बेड निर्माण करण्याच्या दृष्टीने फारसे लक्ष दिले नाही. एप्रिल महिन्यात संक्रमणाचा प्रकोप वाढल्याने शासकीय व खासगी रुग्णालयात रुग्णांना बेड मिळत नसल्याने मनपा प्रशासनाबाबत नागरिकात रोष निर्माण झाल्यानंतर पदाधिकारी कामाला लागले. आधीच यादृष्टीने प्रयत्न केले असते तर आज ३०० ते ४०० कोविड रुग्णांवर उपचार सुरू झाले असते.
....
केटीनगर रुग्णालयाची पाहणी
केटीनगर रुग्णालयामधे या आठवड्यापासून कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. १०० खाटांच्या रुग्णालयासाठी २५ ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था करण्यात आली आहे. लवकरच येथे उपचार सुरू होणार असल्याचे रविवारी पदाधिकाऱ्यांनी पाहणीप्रसंगी सांगितले. यात महापौर दयाशंकर तिवारी, आमदार प्रवीण दटके, परिणय फुके, उपमहापौर मनीषा धावडे, सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे, आरोग्य समिती सभापती महेश महाजन, माजी सभापती वीरेंद्र कुकरेजा, धरमपेठ झोनचे सभापती सुनील हिरणवार, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त मिलिंद मेश्राम, सहायक आयुक्त प्रकाश वराडे आदींचा समावेश होता.