'उघड्यावरील शौच संपले तसे शिक्षणातून महिलांचे ड्रॉप आऊटही संपेल!'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2023 09:53 PM2023-01-02T21:53:33+5:302023-01-02T21:54:32+5:30
Nagpur News येत्या दहा वर्षात स्त्रियांच्या शिक्षण ड्रॉप आऊटपासून मुक्ती मिळेल असा विश्वास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी येथे व्यक्त केला.
नागपूर : आपण परिवर्तनाच्या अशा टर्निंग पॉइंटवर उभे आहोत, जेथून सभ्यता पुनरूज्जीवनाच्या आशेची किरणे दिसू लागली आहेत. २०१४ मध्ये लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर शौचालय’चा नारा दिला आणि महिलांना उघड्यावरील शौचालयाकडे जाण्यापासून मुक्ती मिळाली. अशीच मुक्ती शिक्षणाच्या क्षेत्रात ड्रॉप आऊटपासून (अर्ध्यात शिक्षण सोडून देणे) येत्या दहा वर्षात मिळेल आणि नव्या राष्ट्रीय शिक्षण नितीची त्यात मोलाची भूमिका राहील, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
सोमवारी सेवा सदन शिक्षण संस्थेच्या ९६व्या वर्धापनदिनानिमित्त अकोला जिल्ह्यातील एन्करेज एज्युकेशनल फाउंडेशनच्या प्रांजली जयस्वाल यांना ‘रमाबाई रानडे स्मृती शिक्षण - प्रबोधन पुरस्कार’ प्रदान करताना ते बोलत होते. शिक्षण संस्थेच्या पटांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रा. स्व. संघाच्या अ. भा. कार्यकारिणीचे सदस्य अनिरूद्ध देशपांडे, भारतीय संगणक विज्ञान क्षेत्रातील प्रसिद्ध लेखक यशवंत कानेटकर, माजी आमदार नागो गाणार, संस्थेच्या अध्यक्ष कांचन गडकरी, सचिव वासंती भागवत उपस्थित होते.
भारतीयत्त्वाच्या दिशेने राबविण्यात येणारी राष्ट्रीय शिक्षण नीती आता आली असली तरी भारतीय विद्या भारती, रामकृष्ण मिशनसारख्या संघटनांनी गेल्या ७० वर्षांत त्याच दिशेने कार्य केले. याच कार्याच्या प्रेरणेने ही नीती कार्यरत राहणार आहे. या नीतीमध्ये संस्काराला महत्त्व असून, चुकीच्या पद्धतीने शिक्षण दिले गेले तर ‘साक्षर’च्या उलट ‘राक्षस’ घडणार ही जाणीव यात आहे. भारताला संपविण्यासाठी आलेले स्वत: समाप्त झाले आणि आताही जे अशी स्वप्न बघत आहेत, तेही स्वत:च संपणार आहेत. भारत एव्हरेस्टप्रमाणे निधडी छाती दाखवत उभा राहणार असल्याची भावना भगतसिंह कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन अमर कुळकर्णी यांनी केले. प्रास्ताविक कांचन गडकरी यांनी केले, तर मानपत्राचे वाचन वासंती भागवत यांनी केले. एकल गीत बाळकृष्ण गड्डमवार यांनी गायले.
शिक्षणात आता स्वदेश - अनिरूद्ध देशपांडे
- आजही साडेतीन कोटी मुले शिक्षणापासून वंचित आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून ही उणीव भरून काढली जाणार आहे. शिक्षणात आता स्वदेश असणार आहे. आता आर्य चाणक्य, महात्मा गांधी, विवेकानंद हे शिकविले जाणार आहेत. सर्वांना शिक्षण, सर्वांना संधी या घोषवाक्याद्वारे शिक्षणातील हे परिवर्तन साधले जाणार असल्याचे अनिरूद्ध देशपांडे यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी बोलताना यशवंत कानेटकर यांनी भाषा कोणतीही असो, मांडण्यात येणारा मुद्दा प्रखर असेल तर तो महत्त्वाचा असल्याची भावना व्यक्त केली.
.....................