रेल्वेगाड्यांची लेटलतिफी जैसे थेच, तेलंगणा एक्सप्रेससह डझनभर गाड्या लेट
By नरेश डोंगरे | Published: February 4, 2024 09:10 PM2024-02-04T21:10:17+5:302024-02-04T21:10:30+5:30
अनेक गाड्या रद्द : प्रवाशांना प्रचंड मनस्ताप
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गारठा आणि धुक्याची समस्या कमी होऊनही रेल्वेगाड्यांची लेटलतिफी जैसे थेच आहे. रविवारीसुद्धा सुमारे एक डझन गाड्या विलंबाने नागपुरात पोहचल्या.
विकास कामांच्या नावाने नागपूर मार्गे दिल्ली आणि दक्षिण भारतात धावणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या. परिणामी नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. वेळापत्रक बिघडल्याने अनेकांनी आजचा प्रवासाचा बेत रद्द करून दुसऱ्या दिवशीचे तिकिट काढले.
प्राप्त माहितीनुसार, रविवारी कोचीवेल्ली इंदोर एक्सप्रेस ४ तास, दिल्ली हैदराबाद तेलंगणा एक्सप्रेस १३ तास, दानापूर स्पेशल एक्सप्रेस१०.३० तास, सिकंदराबाद दानापूर एक्सप्रेस ३.३० तास, हैदराबाद नवी दिल्ली तेलंगणा एक्सप्रेस १० तास, नवी दिल्ली मद्रास जीटी एक्सप्रेस ३ तास, शालीमार पोरंबदर एक्सप्रेस ३.३० तास, नवी दिल्ली चेन्नई तामिळनाडू एक्सप्रेस ७.४० तास, निजामुद्दीन हैदराबाद दक्षिण एक्सप्रेस ५ तास, चेन्नई नवी दिल्ली तामिळनाडू एक्सप्रेस ३ तास आणि हावडा पुणे आझाद हिंद एक्सप्रेस वृत्तलिहस्तोवर २.५० तास विलंबाने धावत असल्याची माहिती मिळाली होती.