जलसाठ्यात फक्त एक टक्कावाढ
By admin | Published: June 30, 2017 02:27 AM2017-06-30T02:27:51+5:302017-06-30T02:27:51+5:30
जून महिना संपत आला तरी पाहिजे तसा पाऊस अजूनही पडलेला नाही. मान्सूनची चाल सुस्तावल्याने एकीकडे उकाडा वाढला आहे
विभागातील जलाशयात केवळ ११ टक्के साठा : जूनमध्ये मान्सूनची चाल संथ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जून महिना संपत आला तरी पाहिजे तसा पाऊस अजूनही पडलेला नाही. मान्सूनची चाल सुस्तावल्याने एकीकडे उकाडा वाढला आहे तर दुसरीकडे जलाशयेसुद्धा कोरडी पडली आहेत. जून महिन्याच्या सुरुवातीला नागपूर विभागातील मोठ्या जलाशयांमध्ये केवळ १० टक्के जलसाठा शिल्लक होता. आता महिना संपत आला तरी जलसाठ्यात केवळ एक टक्काच भर पडली आहे. नागपूर विभागातील १८ मोठ्या धरणांमध्ये आजच्या तारखेला केवळ ३२८ दलघमी (११ टक्के) इतका जलसाठा शिल्लक आहे. आजच्या तारखेचाच विचार केला असता गेल्या पाच वर्षात सर्वात कमी जलसाठा याच वर्षी असल्याचे दिसून येते.
जलसंपदा विभागाअंतर्गत नागपूर विभागात पाटबंधारे प्रकल्पांचे १८ मोठे तलाव आहेत. यातील एकूण पाणीसंचयनाची क्षमता २९६४.४ दलघमी इतकी आहे. यापैकी आजच्या तारखेला केवळ ३२८ दलघमी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये सर्वात मोठे धरण असलेल्या तोतलाडोह धरणात केवळ ३४ दलघमी (३ टक्के) इतका पाणीसाठा आहे. कामठी खैरी ३८ टक्के, रामटेक ११ टक्के, लोवर वडगाव १८ टक्के, इडियाडोह १४ टक्के, सिरपूर १ टक्के, पूजारी टोला २३ टक्के, असोलामेंढा ४० टक्के, दिना १३ टक्के, बोर १४ टक्के, धाम १६ टक्के, पोथरा २५ टक्के, लोवर वर्धा टप्पा -१ येथे १६ टक्के, बावनथडी १२ आणि धापेवाडा बॅरेज टप्पा २ येथे केवळ १ टक्का इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. भंडारा येथील गोसीखुर्द टप्पा-१, नागपुरातील गोंदिया येथील कालीसरार या तलावातील पाणीसाठा संपलेला आहे.
गेल्यावर्षी आजच्याच तारखेला १९ टक्के साठा
गेल्या वर्षी आजच्याच तारखेला या १८ ही तलावात एकूम पाणीसाठा ६३२ दलघमी (१९ टक्के) इतका होता. तसेच २०१२ मध्ये ७४५ दलघमी, २०१३ मध्ये १२१५ दलघमी, २०१४ मध्ये १४३१ दलघमी आणि २०१५ मध्ये ९३० दलघमी इतका पाणीसाठी आजच्या तारखेला २९ जून) रोजी होता.