न्या. अरुण चौधरी चंदीगड ज्युडिशियल अकॅडमीचे अध्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 01:37 AM2017-09-09T01:37:05+5:302017-09-09T01:37:24+5:30
मुंबई उच्च न्यायालयातून पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयात बदली होऊन गेलेले न्यायमूर्ती अरुण चौधरी यांची देशातील प्रसिद्ध चंदीगड ज्युडिशियल अकॅडमीचे अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयातून पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयात बदली होऊन गेलेले न्यायमूर्ती अरुण चौधरी यांची देशातील प्रसिद्ध चंदीगड ज्युडिशियल अकॅडमीचे अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य न्यायमूर्ती एस. जे. वझीफदार यांनी यासंदर्भात आदेश जारी केला आहे.
चंदीगड ज्युडिशियल अकॅडमीमध्ये भारतासह श्रीलंका व बांगलादेश येथील न्यायाधीशांनाही त्यांच्या विनंतीवरून प्रशिक्षण दिले जाते. या ख्यातनाम संस्थेचे अध्यक्षपद भूषविण्याचा सन्मान न्यायमूर्ती चौधरी यांना मिळाला आहे. २ एप्रिल १९५७ रोजी वर्धा येथे जन्मलेले न्या. चौधरी यांनी मुंबईतील शासकीय विधी विद्यालयातून एलएल. बी. पदवी प्राप्त केली आहे. त्यांची ८ सप्टेंबर २००६ रोजी मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ५ सप्टेंबर २००८ रोजी त्यांना न्यायमूर्तिपदी कायम करण्यात आले. नागपूर खंडपीठात कार्यरत असताना त्यांचे अनेक निर्णय गाजले. एका प्रकरणात त्यांना आर्थिक गुन्ह्याशी संबंधित भादंविच्या कलम ४०९ व ४६७ मध्ये जन्मठेपेची तरतूद असली तरी या गुन्ह्यांचा खटला जेएमएफसी न्यायालयात चालवला जात असल्याचे आढळून आले. जेएमएफसी न्यायालयाला ३ वर्षापेक्षा जास्त कारावासाची शिक्षा देण्याचा अधिकार नाही. त्यामुळे त्यांनी या गुन्ह्यांचा खटला सत्र न्यायालयात चालविण्याची शिफारस विधी आयोगाला केली होती. त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळ्याची व्यापक दखल घेऊन नागरिक कर भरण्यास नकार देऊ शकतात असे निरीक्षण नोंदविले होते.