न्या. भूषण धर्माधिकारी जन्मभूमीतून सेवानिवृत्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 09:15 PM2020-04-27T21:15:14+5:302020-04-27T21:16:04+5:30
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी हे त्यांची कर्मभूमी व जन्मभूमी असलेल्या नागपूरमधून सोमवारी सेवानिवृत्त झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी हे त्यांची कर्मभूमी व जन्मभूमी असलेल्या नागपूरमधून सोमवारी सेवानिवृत्त झाले. शेवटच्या दिवशी त्यांनी नागपूर खंडपीठात कार्य केले. दरम्यान, त्यांच्या नेतृत्वातील पूर्णपीठाने पब्लिक ट्रस्ट मालमत्तेसंदर्भातील प्रकरणावर महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला.
हायकोर्ट प्रशासन, न्यायमूर्ती, हायकोर्ट बार असोसिएशन आणि अनेक ज्येष्ठ वकिलांनी न्या. धर्माधिकारी यांना भावणिक वातावरणात निरोप दिला. याप्रसंगी सोशल डिस्टन्सिंग व अन्य नियमांचे तंतोतंत पालन करण्यात आले. न्यायमूर्तीपदी नियुक्ती होण्यापूर्वी न्या. धर्माधिकारी यांनी नागपूर खंडपीठासह विविध न्यायालयांत अनेक वर्षे वकिली केली. १५ मार्च २००४ रोजी त्यांची न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली. वरिष्ठतेनुसार ते अनेक महिने नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती होते. दरम्यान, त्यांना मुंबईत बोलावून घेण्यात आले. तेथून त्यांची २० मार्च २०२० रोजी मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, त्याच महिन्यात लॉकडाऊन लागू झाल्यामुळे त्यांना विविध खंडपीठांना भेट देण्यास वेळ मिळाला नाही. या काळात त्यांनी प्रशासकीय सुत्रे सक्षमपणे सांभाळली. न्यायालयांतून कोरोनाचा प्रसार होऊ नये याकरिता त्यांनी केवळ अत्यावश्यक प्रकरणांवर सुनावणी घेणे, सुनावणीसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा उपयोग करणे, कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी करणे, सोशल डिस्टन्सिंगचे सक्तीने पालन करणे इत्यादी अनेक कठोर निर्णय घेतले.
लॉकडाऊननंतर भव्य सत्कार
हायकोर्ट बार असोसिएशन व अन्य वकील संघटना मिळून न्या. धर्माधिकारी यांच्या सत्कारासाठी भव्य कार्यक्रम आयोजित करणार होते. परंतु, लॉकडाऊनमुळे ते शक्य झाले नाही. हा कार्यक्रम लॉकडाऊन संपल्यानंतर आयोजित केला जाणार आहे. कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय व गुरुतुल्य असलेले न्या. धर्माधिकारी यांच्याबद्दल सर्वांच्या मनात अतिशय आदर आहे. त्यामुळे त्यांचा सत्कार कार्यक्रम व्हावा ही सर्वांची इच्छा आहे. निरोप कार्यक्रमात हायकोर्ट बार असोसिएशनच्या वतीने अध्यक्षा अॅड. गौरी वेंकटरमन, उपाध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम पाटील, सहसचिव भूषण मोहता उपस्थित होते अशी माहिती सचिव अॅड. प्रफुल्ल खुबाळकर यांनी दिली.