न्या. नितीन सांबरे यांचा कुलगुरू सुभाष चाैधरी यांची याचिका ऐकण्यास नकार
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: June 21, 2024 05:48 PM2024-06-21T17:48:40+5:302024-06-21T17:49:49+5:30
आता दुसऱ्या न्यायपीठासमक्ष होईल सुनावणी : सोमवारची तारीख मिळाली
राकेश घानोडे, नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील प्रमुख न्यायपीठाचे वरिष्ठ न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी शुक्रवारी काही वैयक्तिक कारणांमुळे राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. सुभाष चाैधरी यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यामुळे चौधरी यांच्या याचिकेवर न्यायमूर्तिद्वय विभा कंकणवाडी व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी होणार आहे. त्याकरिता त्यांना सोमवारची तारीख मिळाली आहे.
चौधरी यांनी त्यांना निलंबनाच्या कारवाईसाठी बजावण्यात आलेल्या नवीन कारणे दाखवा नोटीसच्या वैधतेला या याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. त्यांच्यावर विविध प्रकारची अनियमितता केल्याचा आरोप आहे. यापूर्वी कुलपती रमेश बैस यांनी चौधरी यांना २१ फेब्रुवारी २०२४ रोजी निलंबित केले होते. चौधरी यांनी त्याविरुद्धही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. १४ मार्च २०२४ रोजी न्यायालयाने बैस यांचा तो वादग्रस्त आदेश अवैध ठरवून रद्द केला होता. चौधरी यांना निलंबित करताना कुलगुरू सेवाशर्ती कायद्यातील बंधनकारक तरतुदींचे काटेकोर पालनच केले गेले नाही, असा निष्कर्ष त्या निर्णयात नोंदविण्यात आला होता. या कायद्यानुसार कुलगुरुंविरुद्धच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी कुलपतींनी निर्देश देणे आवश्यक आहे.
परंतु, चौधरी यांच्या प्रकरणात राज्य सरकारने चौकशी करून घेतली होती. यावेळी बैस यांनी ती चूक सुधारली. त्यांनी स्वत: उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे यांच्यामार्फत प्राथमिक चौकशी करून घेतली. तसेच, मांडे यांच्या अहवालाची दखल घेऊन चौधरी यांना निलंबन कारवाईसाठी कारणे दाखवा नोटीस बजावली आणि येत्या सोमवारी सुनावणीकरिता हजर होण्याचे निर्देश दिले. त्यावर चौधरी यांचा आक्षेप आहे. ही नोटीस अवैध असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. चाैधरी यांच्यातर्फे ॲड. फिरदौस मिर्झा यांनी कामकाज पाहिले.