अल्पसंख्यकांना मिळवून देणार न्याय
By admin | Published: June 14, 2017 01:22 AM2017-06-14T01:22:33+5:302017-06-14T01:22:33+5:30
अल्पसंख्यक समाजातील शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विकासासाठी शासन कटिबद्ध असून शेवटच्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी
केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी व सुलेखा कुंभारे यांच्यात चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अल्पसंख्यक समाजातील शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विकासासाठी शासन कटिबद्ध असून शेवटच्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असे आश्वासन केंद्रीय अल्पसंख्यक राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) मुख्तार अब्बास नकवी यांनी दिले. राष्ट्रीय अल्पसंख्यक आयोगाच्या सदस्य अॅड. सुलेखा कुंभारे यांनी पदभार ग्रहण केल्यानंतर पहिल्यांदाच केंद्रीय मंत्री नकवी यांची भेट घेतली. या दोघांमध्ये अल्पसंख्यक समाजाच्या विविध प्रश्नांवर प्रदीर्घ चर्चा झाली. त्यावेळी अल्पसंख्यक समाजाचे प्रश्न तातडीने सोडविण्यावर उभयतांनी एकमेकांना आश्वासित केले.
यावेळी बहुजन रिपब्लिकन एकता मंचचे जिल्हाध्यक्ष अजय कदम, विवेक मंगतानी, विदर्भ अध्यक्ष भीमराव फुसे, नागपूर शहर अध्यक्ष नगरसेविका वंदना भगत, कामठीच्या नगरसेविका सावला सिंगाडे, सरोज रंगारी, दीपक सिरिया, दीपंकर गणवीर, अशफाक कुरैशी, आदिल विद्रोही, सिद्धार्थ रंगारी, उदास बंसोड, मोरेश्वर पाटील आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
ड्रॅगन पॅलेसवरही चर्चा
केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांच्याशी चर्चा करताना सुलेखा कुंभारे यांनी त्यांना जगविख्यात ड्रॅगन पॅलेसबाबतही माहिती दिली. ड्रॅगन पॅलेस व परिसरात सुरू असलेल्या विविध कामांबाबत एक पुस्तिका त्यांना सादर केली.