जस्टीन बीबरच्या ‘रामसे हंट सिंड्रोम’ या आजाराचे एक लाखात पाच रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2022 08:00 AM2022-06-15T08:00:00+5:302022-06-15T08:00:12+5:30
Nagpur News हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक जस्टीन बीबरला ‘रामसे हंट सिंड्रोम’ नावाचा आजार झाला असून, त्याच्या अर्ध्या चेहऱ्याला अर्धांगवायू झाला आहे. यामुळे सामान्यांमध्येही या आजाराविषयी काळजी वाढली आहे.
सुमेध वाघमारे
नागपूर : हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक जस्टीन बीबरला ‘रामसे हंट सिंड्रोम’ नावाचा आजार झाला असून, त्याच्या अर्ध्या चेहऱ्याला अर्धांगवायू झाला आहे. यामुळे सामान्यांमध्येही या आजाराविषयी काळजी वाढली आहे. तज्ज्ञाच्या मते विषाणूमुळे होणारा हा आजार दुर्मीळ आहे. दरवर्षी एक लाख लोकसंख्येत पाच जणांना हा आजार होतो.
-काय आहे ‘रामसे हंट सिंड्रोम’
प्रसिद्ध मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी ‘लोकमत’ला सांगितले, ‘रामसे हंट सिंड्रोम’ हा एक विषाणूजन्य आजार आहे. ‘व्हेरिसेल्ला - झोस्टर’ या विषाणूमुळे आजाराचा संसर्ग होतो. चेहऱ्याच्या ७व्या मज्जातंतूच्या इन्फेक्शनमुळे हा संसर्ग उद्भवतो.
-कानाच्या बाहेरच्या बाजुला पुरळ येण्यापासून सुरूवात
‘रामसे हंट सिंड्रोम’ आजारात सुरुवातीला कानाच्या बाहेरील बाजूस कांजण्यासारखे पुरळ येतात. कांजण्यांसाठी जबाबदार असलेला विषाणूच या आजाराला जबाबदार ठरतो. ‘व्हेरिसेल्ला - झोस्टर’ हा विषाणू रुग्णाच्या शरीरात निष्क्रिय स्वरुपात राहून नंतर तो सक्रिय होतो.
...ही आहेत लक्षणे
कानाच्या बाहेरील भागात कांजण्यासारखे पुरळ येणे, कान दुखणे, चेहऱ्याच्या एका भागात अर्धांगवायू येणे, यामुळे एक डोळा बंद न होणे, डोळे कोरडे पडणे, तोंडाच्या एका भागात चावता न येणे, चवीमध्ये बदल होणे, गोंधळाची स्थिती निर्माण होणे, चालणे किंवा संतुलन राखणे कठीण होणे आदी लक्षणे दिसून येतात.
-दीड महिन्यात रुग्ण होतो बरा
डॉ. मेश्राम म्हणाले, ‘रामसे हंट सिंड्रोम’ या आजाराचा रुग्ण दीड ते तीन महिन्यात बरा होतो. यासाठी अँटिव्हायरल, स्टेरॉईड्स व फिजिओथेरपी दिली जातात. लहानपणी चिकनपॉक्स होतो, त्यांच्यात या आजाराचा धोका अधिक असतो. याशिवाय, एचआयव्हीबाधित किंवा रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असलेल्या लोकांनाही होण्याची शक्यता असते. हा आजार कोणत्याही वयोगटातील व्यक्तिंना होऊ शकतो. जवळपास ९९ टक्के हा आजार बरा होतो.
-संसर्ग एकापासून दुसऱ्याला होऊ शकतो
या आजाराच्या रुग्णाच्या शरीरावर फोड आले असतील व त्यातील द्रवाच्या संपर्कात जर कोणी आले तर त्यांनाही रामसे हंट सिंड्रोम होण्याचा धोका वाढतो. या आजाराच्या प्रतिबंधासाठी कांजण्याची लस प्रभावी ठरते. या आजाराच्या सुरुवातीच्या लक्षणात उपचार झाल्यास गंभीरता टाळता येते, असेही डॉ. मेश्राम म्हणाले.