अमली पदार्थाच्या विळख्यात तरुणाई
By Admin | Published: June 26, 2016 02:51 AM2016-06-26T02:51:50+5:302016-06-26T02:51:50+5:30
क्षणिक सुखासाठी तरुणाई व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकली असल्याचे चित्र आहे.
अमली पदार्थ सेवनविरोधी दिन : जनजागृतीची गरज
नागपूर : क्षणिक सुखासाठी तरुणाई व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकली असल्याचे चित्र आहे. या विळख्यातून तरुणाईला बाहेर काढणे कठीण असून, यासाठी व्यापक जनजागृतीची गरज आहे. अपघातात बळी पडणारे, गंभीर गुन्ह्यात अटक झालेल्यांमध्ये २० ते ३० वयोगटातील तरुणांचे प्रमाण अधिक असल्याचे पोलिसांच्या रेकॉर्डवरून दिसून येते.
आॅनलाईनद्वारे औषधांची मागणी
अमली पदार्थांच्या तस्करीसाठी विविध मार्ग अवलंबिले जातात. आता आॅनलाईन फार्मसी वा इंटरनेट फार्मसी हा नवा मार्ग विकसित झाला आहे. यातून एखादी व्यक्ती घरबसल्या जगातील कुठल्याही कोपऱ्यातून हे पदार्थ खरेदी करू शकतो. हे सगळे सार्वजनिक स्तरावर होत आहे. अमली पदार्थांचे सेवनाने स्मरणशक्ती वाढते, असा गैरसमज पसरवला जात आहे. त्यामुळे मुले नवनवीन पदार्थांच्या व्यसनाच्या अधीन होत आहेत. आज ही मोठी सामाजिक समस्या बनली आहे.आज अमली पदार्थांचे सेवन आणि तस्करीला आळा घालण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोसारख्या संस्था एक महत्त्वपूर्ण संस्था म्हणून झटत आहे. जगजागृती अभियान आणि प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले जाते. आपले जीवन सुंदर बनवा, अमली पदार्थांना नव्हे तर आरोग्याला महत्त्व द्या, असा संदेश युवकांपर्यंत पोहोचवला जातो.
दुष्परिणामाविषयी जनजागृती आवश्यक
केवळ जिज्ञासेपोटी अमली पदार्थांची चव चाखणारे आज या गर्तेत सापडले आहेत. २६ जूनला जगभरात अमली पदार्थ सेवनविरोधी दिन पाळण्यात येतो. या विळख्यात गटांगळ्या खाणाऱ्यांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामाविषयी जागृती करण्यासंबंधी या दिवसाचे महत्त्व आहे. अनेक कार्यक्रमातून याविषयी जनजागृती आणि या पदार्थांपासून दूर कसे राहावे, तसेच आपल्या प्रकृतीविषयी गंभीर राहण्याविषयी सावध केले जाते. शैक्षणिक संस्थांबरोबरच इतर सेवाभावी संस्थाही या कामात पुढाकार घेत आहेत. यात आता सामान्य माणसांचाही सहभाग असणे अपरिहार्य बनले आहे. इतकी ही समस्या जटील बनली आहे.
पुनर्वसन कठीण, पण प्रयत्नांनी शक्य
अमली पदार्थ हा बहुचर्चित विषय बनला आहे. आज पालकांच्या मनात एक विलक्षण भय सामावले आहे, कारण भावी पिढी नशेच्या गर्तेत आहे. तेव्हा पालक आणि शिक्षकांनी दक्षता बाळगणे आवश्यक आहे. अमली पदार्थांचे शिकार झालेल्यांना समाज एका वेगळ्याच नजरेने पाहत असतो. त्यांचा तिरस्कार करीत असतो. पण त्यांचे पुनर्वसन केले तर समस्यांचा नायनाट होऊ शकतो. पुनर्वसनाच्या उपचारादरम्यान अनेक कठीण समस्यांना तोंड द्यावे लागते. तसेच पालक आणि समुपदेशकांना भरपूर मेहनत घ्यावी लागते. नशेच्या अधीन झालेल्यांचे पुनर्वसन कठीण असले तरी प्रयत्नाने ते शक्य आहे.