ज्याची वेदना तोची जाणे, म्हणोनी पराक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 12:14 AM2019-12-07T00:14:52+5:302019-12-07T00:21:22+5:30
ज्याची वेदना तोची जाणे, म्हणोनी घडितो पराक्रम. ‘डॉ. भीमराव’ या हिंदी महानाट्यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाची कथा उलगडण्यात आली आणि त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या पराक्रमाला अभिवादन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जाज्वल्य अभिमान जागवणाऱ्या आणि अस्तित्त्वाला काळिमा फासणाऱ्याही, अशा परस्परविरोधी घटनांनी इतिहास घडतो आणि म्हणूनच काय करावे व काय करू नये, याचे धडे इतिहासातून प्राप्त होतात. इतिहास हा सदैव प्रेरणादायी असतो. फक्त प्रेरणा कोण कशी घेतो, हे ज्याचे त्याचे ठायी. पराक्रम गाजवायला वेदनेची जाणीव होणे आणि त्यासाठी संवेदना जागृत असणे गरजेचे असते. म्हणूनच म्हटले जाते... ज्याची वेदना तोची जाणे, म्हणोनी घडितो पराक्रम. ‘डॉ. भीमराव’ या हिंदी महानाट्यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाची कथा उलगडण्यात आली आणि त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या पराक्रमाला अभिवादन करण्यात आले.
ईश्वर देशमुख शारिरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर सुरू असलेल्या तिसऱ्या खासदार सांस्कृतिक महोत्सवात शुक्रवारी किरण गभणे लिखित व शैलेंद्र बागडे दिग्दर्शित ‘डॉ. भीमराव’ या हिंदी महानाट्याचे सादरीकरण झाले. दीपप्रज्वलन भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, नाना श्यामकुळे, संदीप जाधव, प्रा. केशव भगत, पुरण मेश्राम, भूपेश थुलकर, आमदार नागो गाणार, डॉ. मिलिंद माने, भाजपा शहराध्यक्ष प्रवीण दटके, आमदार अनिल सोले, सुभाष पारधी, आ. मोहन मते, नगरसेवक संदीप गवई, धर्मपाल मेश्राम, अभय गोटेकर उपस्थित होते. श्याम देशपांडे यांनी गायलेल्या ‘निर्माणो के पावन युग में हम चरित्र निर्माण ना भुले’ हे प्रेरणा गीत सादर झाले.
महानाट्यात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मापासून ते वाचन, अभ्यास, समाजाकडून त्यांना झालेला त्रास, सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रातील त्यांचे कार्य, दीन, दलितांच्या, श्रमिकांच्या विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधक्कारमय जीवनाला नवी ऊर्जा देणाऱ्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका सुधीर पाटील यांनी, त्यांचे वडील रामजी यांची भूमिका मिलिंद रामटेके यांनी साकारली. अशोक गवळी, माया मंडले, बशीर खान, अशोक वचनेकर, सम्राट गोटेकर, महेश कसलीकर आदींच्या यात भूमिका होत्या. प्रकाश योजना मंगेश विजयकर, संगीत भूपेश सवाई यांची तर मेकअप नकुल श्रीवास यांचे होते.
गडकरींचे कामच मोठे - चंद्रकांत पाटील
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कामच मोठे असून, ते कायम भव्यदिव्य विचार करतात आणि ते वास्तवात उतरवूनही दाखवतात. या १७ दिवसाच्या महोत्सवरून ते सिद्ध होते. गडकरी हे ३० दिवसाचा महोत्सवही करू शकतात. नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीसांसारखे नेते लाभले हे नागपूरकरांचे भाग्य असल्याची भावना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.