ज्योती पटेल पहिल्या महिला ‘सुपर रॅन्डोनियर’

By admin | Published: April 25, 2017 01:50 AM2017-04-25T01:50:23+5:302017-04-25T01:50:23+5:30

वास्तुविशारद असलेल्या ज्योती पटेल या मध्य भारतातील पहिल्याच महिला ‘सुपर रॅन्डोनियर’ बनल्या आहेत.

Jyoti Patel First Lady 'Super Rondonier' | ज्योती पटेल पहिल्या महिला ‘सुपर रॅन्डोनियर’

ज्योती पटेल पहिल्या महिला ‘सुपर रॅन्डोनियर’

Next

ब्रेव्हेट : १९ तास ३३ मिनिटांत सायकलने गाठले ३०० किमी अंतर!
नागपूर : वास्तुविशारद असलेल्या ज्योती पटेल या मध्य भारतातील पहिल्याच महिला ‘सुपर रॅन्डोनियर’ बनल्या आहेत. रविवारी संपलेल्या ब्रेव्हेटमध्ये त्यांनी ३०० किमी अंतर १९ तास ३३ मिनिटांत पूर्ण केले.
लांब पल्ल्याच्या सायकल शर्यतीला ब्रेव्हेट संबोधतात. पॅरिसमधील(फ्रान्स) आॅडक्स क्लबच्या अधिपत्याखाली ही शर्यत आयोजित केली जाते. नोव्हेंबर ते आॅक्टोबर या कॅलेंडर वर्षांत २००, ३००, ४०० व ६०० किमी ब्रेव्हेट पूर्ण करणाऱ्या स्पर्धकास ‘सुपर रॅन्डोनियर’चा मान मिळतो.
ब्रेव्हेटची सुरुवात शनिवारी सायंकाळी ४.३० वाजता झीरो माईल येथून झाली. संपूर्ण रात्र तसेच रविवारच्या उकाड्याचा त्रास सहन करीत ब्रेव्हेट पुढे सरकली. ज्योती यांच्यासह नागपूरचे सुदर्शन वर्मा तसेच विजयवाडा येथील जगदीश आणि डॉ. मणिसेकरन हे ‘सुपर रॅन्डोनियर’ ठरले.
दोन मुलांची आई असलेल्या ज्योती यांनी १३ नोव्हेंबर २०१६ रोजी २०० किमी, १७ डिसेंबर रोजी ६०० किमी, १५ जानेवारी २०१७ ला ४०० किमी आणि काल ३०० किमी असा टप्पा गाठला. त्या एकमेव महिला स्पर्धक होत्या. तरीही निर्धारपूर्वक लक्ष्य गाठण्यात यशस्वी ठरल्या. ब्रेव्हेटसाठी २० तासांचा अवधी निर्धारित होता. २६ जणांनी १८ पैकी अधिक तासांत हे आव्हान सर केले. सात जणांनी मात्र माघार घेतली.याचवेळी २०० किमी ब्रेव्हेटचे देखील आयोजन करण्यात आले. यामध्ये १४ सायकलस्वार सहभागी झाले होते. १३ जणांनी रेस पूर्ण केली. नागपूर-तिगाव(पांढुर्णा)आणि परत असा मार्ग होता. ३०० किमी ब्रेव्हेटसाठी या मार्गाशिवाय नागपूर- कोंढाळी (कामत हॉटेल) आणि परत असा अतिरिक्त मार्ग ठेवण्यात आला होता.(क्रीडा प्रतिनिधी)

कामगिरीवर मी समाधानी : ज्योती
कामगिरीबद्दल आनंद व्यक्त करीत इंटेरियर डिझायनिंगचा पेशा सांभाळणाऱ्या ज्योती म्हणाल्या,‘वर्षभरापासून मी रेससाठी सज्ज होते. स्वप्न साकार झाल्याचे समाधान लाभले आहे. आधी मी बॅडमिंटन खेळत होते. गुडघ्याला इजा झाल्याने आवडता गेम सोडावा लागला. फिटनेससाठी मी सायकलिंग सुरू केले. सध्या आठवड्यातून चार दिवस ५० किमी सायकलिंग करते. आगामी डिसेंबरमध्ये ‘इंडिया गेट ते गेट वे आॅफ इंडिया’ असे १४५० किमी अंतराचे ब्रेव्हेट पूर्ण करण्याचा निर्धार आहे. या उपक्रमाला नेहमी पाठिंबा देणाऱ्या कुटुंबीयांचा आपल्या यशात सिंहाचा वाटा असल्याचे ज्योती यांनी आवर्जून सांगितले.

Web Title: Jyoti Patel First Lady 'Super Rondonier'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.