‘कबड्डी चॅम्पियन’ माधवीचे पूर्ण झाले स्वप्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 11:30 AM2019-08-01T11:30:25+5:302019-08-01T11:33:36+5:30
मलेशियाच्या मेलाका येथे नुक तीच वर्ल्डकप कबड्डी स्पर्धा पार पडली आणि या स्पर्धेत भारतीय महिला संघाने वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान पटकाविला आहे. या विश्वविजेता टीमचा भाग होती नागपूरची माधवी दिलीप वानखेडे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मलेशियाच्या मेलाका येथे नुक तीच वर्ल्डकप कबड्डी स्पर्धा पार पडली आणि या स्पर्धेत भारतीय महिला संघाने वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान पटकाविला आहे. या विश्वविजेता टीमचा भाग होती नागपूरची माधवी दिलीप वानखेडे. स्पर्धेच्या सर्व सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरीसह संघाच्या यशात माधवीचा मोलाचा वाटा राहिला आहे. वडिलांच्या अकाली निधनाने काही वर्षांपूर्वीच परिस्थितीशी संघर्ष करावा लागणाऱ्या या शेतमजुराच्या मुलीने जिद्द व समर्पणातून आपले स्वप्न पूर्ण केले.
माधवीला आधीपासूनच कबड्डी या देशी खेळाविषयी प्रचंड आवड. शालेयस्तरावर तिने आपल्या खेळाची चुणूक दाखवूनही दिली. या खेळात विशेष असे काहीतरी करण्याचे ध्येय तिने उराशी बाळगले होते. वडील दिलीप वानखेडे हे शेतमजूर. त्यामुळे आधीच परिस्थिती हलाखीची. अशातच २०११ साली वडिलांचे अकाली निधन झाल्याने या कुटुंबावर आभाळ कोसळले होते. अशावेळी बहीण लीनाने कुटुंबाची जबाबदारी घेत शिकत असताना जीममध्ये नोकरी स्वीकारली. यादरम्यान माधवीनेही जॉब सुरू केला होता. मात्र कबड्डीकडे दुर्लक्ष होत असल्याने तिने तो सोडला. अशा परीक्षा घेणाºया परिस्थितीत त्यांच्या मामांनी या कुटुंबाला भक्कम आधार दिला. त्यामुळे माधवीने तालुका, जिल्हा व राज्यस्तराची एकेक पायरी चढत नॅशनल स्तरापर्यंत धडक दिली. यादरम्यान क्रीडा कोट्यातून तिने पंजाब विद्यापीठ, पतियाळा येथे बीएची पदवी पूर्ण केली. ज्युनियर नॅशनल व पुढे चारदा ज्युनियर इंडिया कॅम्पमध्ये उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर माधवीने राष्ट्रीय संघात स्थान मिळविले. विशेष म्हणजे राष्ट्रीय कबड्डी टीममध्ये ती एकमेव महाराष्ट्रीयन आहे. तिच्या शैलीमुळे वर्ल्डकपसाठी निवडलेल्या टीममध्येही तिचा नंबर लागला. वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान भारतीय संघाने साखळी फेरीत तायवान, हाँगकाँग व यजमान मलेशियाला नमविले. सेमिफायनलमध्ये पुन्हा मलेशियाचे आव्हान मोडित काढले. अटीतटीच्या झालेल्या फायनलमध्ये भारतीयांनी तायवानला पुन्हा धूळ चारत विश्वविजेता पदाला गवसणी घातली. विशेष म्हणजे या प्रत्येक सामन्यात माधवीने आपल्या दमदार खेळाने सर्वांचे लक्ष वेधले होते. कबड्डी खेळामध्ये आंतरराष्ट्रीयस्तरापर्यंत मजल मारणे हे वैदर्भीय खेळाडूंसाठी दिवास्वप्न राहिले होते. मात्र माधवीने ते शक्य करून दाखविले. ती केवळ आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचली नाही तर संघाला विश्वविजेता बनवूनच परतली आहे. या यशात आई, बहीण, तिचे मामा आणि नेहरू क्रीडा मंडळाचे प्रशिक्षक रमण खरे यांचा वाटा असल्याचे ती मानते.
वर्ल्ड चॅम्पियन संघाची सदस्य म्हणून माधवीने नागपूरकरांचीही मान गौरवाने उंचावली आहे. एक स्वप्न तिने पूर्ण केले. आता क्रीडा कोट्यातून नोकरी मिळवून कुटुंबाला स्थैर्य मिळावे, ही भावना तिने व्यक्त
केली आहे.
वर्ल्ड चॅम्पियन टीमचा भाग असणे यापेक्षा दुसरा आनंद नाही. आई व ताईने उपसलेले कष्ट, त्यांचा त्याग आणि मामांनी दिलेला आधार यामुळे मी या यशापर्यंत पोहचू शकली आहे. आता स्पोर्टस् कोट्यातून एखादी नोकरी मिळवून त्यांचे ऋण फेडायचे आहे. हेच आता माझे स्वप्न आहे.
- माधवी वानखेडे,
आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू