काचूरवाही-हमलापुरी मार्ग खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:12 AM2021-08-23T04:12:00+5:302021-08-23T04:12:00+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : तालुक्यातील काचूरवाही-हाताेडी-नगरधन मार्गावर तयार झालेले खड्डे व त्यात साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे रुग्णांसह नागरिकांचे हाल ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : तालुक्यातील काचूरवाही-हाताेडी-नगरधन मार्गावर तयार झालेले खड्डे व त्यात साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे रुग्णांसह नागरिकांचे हाल हाेत आहेत. या मार्गाच्या दुरुस्तीला प्रशासनाने मंजुरी दिली असल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली आहे. मात्र, काम सुरू करण्याला मुहूर्त मिळत नसल्याचा आराेप नागरिकांनी केला आहे.
या आठ किमीच्या खड्डेमय मार्गावरून गराेदर मातांसह इतर रुग्णांना नगरधन येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात उपचाराला नेण्यासाठी तसेच बाळांच्या लसीकरणासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागताे. काचूरवाही, हाताेडी, संग्रामपूर येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी या मार्गाने नागपूरला ये-जा करावी लागते. दुरुस्तीअभावी हा मार्ग खड्ड्यात गेला असून, पावसामुळे त्याला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यातूनच शेतकऱ्यांसह इतर नागरिक, रुग्ण व विद्यार्थ्यांना राेज मार्गक्रमण करावे लागते.
या मार्गाच्या दुरुस्तीला मंजुरी मिळाल्याची माहिती या भागातील लाेकप्रतिनिधी वारंवार देत असून, निविदा प्रक्रिया पूर्ण केल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात आहे. मात्र, दुरुस्तीला अद्यापही सुरुवात करण्यात आली नाही, अशी माहिती नागरिकांनी दिली. काचुरवाही, मसला, वडेगाव, चोखाळा, किरणापूर, खंडाळा, लोहडाेंगरी या आदिवासीबहुल गावांमधील गराेदर माता व बाळांना उपचारासाठी या मार्गाने रुग्णवाहिकेद्वारे नगरधन येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात ने-आण करावी लागत असून, खड्ड्यांमुळे त्यांना त्रास हाेत असल्याची माहिती काचुरवाही येथील शुभम कामडे यांनी दिली.
महिलांसह छाेटी मुले व नागरिकांना हाेणारा त्रास व अपघाताची शक्यता लक्षात घेता या मार्गाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी सरपंच शैलेश राऊत, शिशुपाल अतकरे, अजय सहारे, मनोज देशमुख, किशोर चौधरी, मंगेश बावनकुळे, विनोद केळवदे, धनराज लिल्हारे, धनिराम श्याम, देवीदास सहारे, आशिष लिल्हारे यांच्यासह हातोडी, लोहडाेंगरी, हमलापुरी येथील नागरिकांनी केली आहे.
...
गाैण खनिजाची ओव्हरलाेड वाहतूक
हा मार्ग नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गाला जाेडला असल्याने नागपूर, कामठी व कन्हानकडे जाणारे रेती, मुरूम व इतर गाैण खनिजांचे ओव्हरलाेड ट्रक या मार्गावरून २४ तास धावतात. त्यामुळे या मार्गाची दैन्यावस्था झाली आहे. या मार्गावर महलापुरी शिवारातील नदीवर असलेला पूल कमी उंचीचा असल्याने त्यावरून पुराचे पाणी वाहते. त्यामुळे शेतकऱ्यांसह काॅटन मिलमधील कामगारांना तासनतास अडकून पडावे लागत असल्याने या पुलाची उंची वाढविण्याचीही मागणी केली जात आहे. सांड नदीवरील पुलाच्या सळया उघड्या पडल्या असून, त्या धाेकादायक ठरत आहेत.