काचूरवाही-किरणापूर राेड निकृष्ट कामाचा उत्कृष्ट नमुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:08 AM2021-07-21T04:08:12+5:302021-07-21T04:08:12+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : तालुक्यातील काचूरवाही-किरणापूर राेड निकृष्ट कामाचा उत्कृष्ट नमुना ठरला आहे. कारण, या मार्गाची वर्षभरापूर्वीच दुरुस्ती ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : तालुक्यातील काचूरवाही-किरणापूर राेड निकृष्ट कामाचा उत्कृष्ट नमुना ठरला आहे. कारण, या मार्गाची वर्षभरापूर्वीच दुरुस्ती करण्यात आली हाेती. मात्र, पावसाळा सुरू हाेताच या राेडवर खड्डे पडायला व डांबरी कडा खचायला सुरुवात झाली आहे.
पावसाळा सुरू हाेताच त्याआधी दुरुस्त केलेल्या राेडच्या कामाचे पितळ उघडे पडले. रामटेक तालुक्यातील काचूरवाही-किरणापूर हा मार्ग १.७५० किमीचा आहे. या मार्गाच्या दुरुस्तीसाठी पंतप्रधान सडक याेजनेंतर्गत राज्य सरकारने १०१.८० लाख रुपयांचा निधी मंजूर केला. कार्यादेश काढण्यात आल्यानंतर ३१ मे २०१९ पासून कंत्राटदाराने राेड दुरुस्ती कामाला सुरुवात केली. हे काम २९ फेब्रुवारी २०२० राेजी पूर्ण करण्यात आले.
त्यानंतर या राेडवरील डांबराचा थर हळूहळू उखडायला सुरुवात झाली. पावसाळा सुरू हाेताच त्याचे प्रमाणही वाढले. या परिसरात यावर्षी अद्याप दमदार पाऊस बरसला नाही. मुसळधार पाऊस काेसळल्यास या राेडची अवस्था दयनीय हाेणार आहे. शेतकरी या राेडचा वापर शेतीच्या वहिवाटीसाठी तर नागरिक व विद्यार्थी रामटेक या तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी करतात.
वर्षभरात हा मार्ग खराब व्हायला लागल्याने त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खड्ड्यांमुळे शेतकरी व नागरिकांना या राेडवरून रहदारी करताना नानाविध अडचणींना सामाेरे जावे लागते. त्यामुळे या राेडच्या दुरुस्ती कामाची गुणवत्ता तपासून दाेषी असणाऱ्यांवर कारवाई करावी तसेच या राेडची पावसाळा संपताच पुन्हा दर्जेदार दुरुस्ती करावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.
...
देखभाल, दुरुस्तीचा पाच वर्षाचा कंत्राट
काचूरवाही-किरणापूर राेडच्या दुरुस्ती कामाचे कंत्राट साईबाबा कस्ट्रक्शन या कंपनीला दिले हाेते. दुरुस्तीनंतरची पाच वर्षे या राेडची देखभाल व दुरुस्ती देखील याच कन्स्ट्रक्शन कंपनीला करावयाची आहे. या देखभाल व दुरुस्ती किंमत ८.३४ लाख रुपये ठरविण्यात आली आहे. ही जबाबदारी राज्य सरकारच्या महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, नागपूर कार्यालयाकडे साेपविण्यात आली आहे.