कोरोनासोबतच काढाही ‘रिटर्न्स’; रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याकडे लोकांचा वाढला कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 11:09 AM2021-02-24T11:09:04+5:302021-02-24T11:10:35+5:30
Nagpur News लोकांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी पुन्हा घरगुती उपाय सुरू केले आहेत. यात काढा ‘रिटर्न्स’ झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा प्रभाव आता आणखी वाढू लागला आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील चार दिवसांतच २८१६ नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे प्रशासनाने गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष केंद्रित करून उपाययोजना हाती घेतल्या आहेत. लोकांनीही रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी पुन्हा घरगुती उपाय सुरू केले आहेत. यात काढा ‘रिटर्न्स’ झाला आहे.
नागपूर जिल्ह्यात रुग्णांची संख्या १,४३,८४३ वर गेली आहे. मागील सात दिवसांपासून रोज ५००वर नव्या रुग्णांची भर पडत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा बसण्यासाठी प्रशासनाने शाळा-कॉलेज, आठवडी बाजार ७ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. किराणा वस्तूंचा तुटवडा होईल या भीतीने लोकांनी घरी जास्तीचा किराणा भरणे सुरू केले आहे. परिणामी, दुकानांमध्ये गर्दी वाढली आहे. विशेष म्हणजे, कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात जशी स्थिती निर्माण झाली तेवढी बिकट नसली तरी तसे चित्र दिसून येऊ लागले आहे. दिवसाची सुरुवात काढ्यापासून होत आहे. दालचिनी, तुळस, काळीमिरी, सुंठ आदींचा उपायोग काढा बनविण्यासाठी होऊ लागला आहे. ज्यांना घरगुती काढ्यावर विश्वास नाही ते आयुर्वेदिक डॉक्टरांकडून काढा घेत आहेत. तर काही रेडिमेड काढा विकत घेताना दिसून येत आहे. दरम्यानच्या काळात काढ्यामुळे नानाविध शंका निर्माण झाल्या होत्या. यावर आयुष मंत्रालयाने जेवण तयार करण्याठी उपयोगात येणाऱ्या वस्तूपासून तयार केलेला काढा तयार केल्यास त्याचा कुठलाही दुष्परिणाम होत नसल्याचे म्हटले आहे. परंतु विकत घेऊन आणलेल्या काढ्याचे किंवा त्याच्या अतिसेवनाचे वाईट परिणामही दिसून आले आहे. आता पुन्हा कोरोनाचा वेग वाढल्याने लोकांनी काढा घेणे सुरू केल्याने काढ्याचे परिणाम व दुष्परिणामांवर चर्चा होऊ लागली आहे.
-रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी काढा उत्तमच
स्वयंपाकात वापरण्यात येणाऱ्या पदार्थांपासून तयार करण्यात आलेला काढा, विशेषत: दालचिनी, तुळस, काळी मिरी, सुंठ यांपासून तयार केलेला काढा आरोग्यदायी आहेच. वात, पित्त व कफ नियंत्रणात ठेवण्यासाठी काढा महत्त्वाचा आहे. परंतु तो घेताना प्रकृती व काढा घेण्याचे प्रमाण याकडे लक्ष द्यायला हवे. शक्य झाल्यास काढा तयार करताना आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास फायदाच होतो.
- डॉ. मोहन येंडे
आयुर्वेदिकतज्ज्ञ
-रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक
आपल्याला रोजच्या जेवणातून रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचे घटक मिळतच असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे की क्षीण झाली आहे याचा निर्णय डॉक्टरांना घेऊ द्या. राेगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी चांगला आहार घ्या, व्यायाम करा. काढ्याच्या अतिसेवनामुळे दरम्यानच्या काळात मूळव्याधीचे रुग्ण वाढले होते. आजही होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांना याचा त्रास होत आहे. अशा रुग्णांवर टेलिमेडिसीनद्वारे उपचार केला जात आहे.
-डॉ. नीलेश जुननकर
गुदारोग तज्ज्ञ