भिवापूर तालुक्यात काेसळधार, नद्यांना पूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:07 AM2021-07-09T04:07:33+5:302021-07-09T04:07:33+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : पेरणी पश्चात शेतात अंकुरलेले बियाणे पावसाअभावी ऑक्सिजनवर असताना पाऊस मात्र दडी मारून बसला होता. ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : पेरणी पश्चात शेतात अंकुरलेले बियाणे पावसाअभावी ऑक्सिजनवर असताना पाऊस मात्र दडी मारून बसला होता. अशातच गुरुवारी (दि. ८) सकाळपासून सुरू झालेल्या कोसळधार पावसाने काही भागात दिलासा दिला आहे. चिखलापार व महालगाव भागात हाच पाऊस नुकसानकारक ठरला आहे. कोसळधार पावसामुळे महालगाव, चिखलापार या दोन नद्यांसह वासी ते कारगाव या मार्गावरील तब्बल चार नद्यांना पूर आल्याने काहीशी वाहतूक ठप्प आहे.
उमरेड-हिंगणघाट राज्यमार्गावर महालगाव व चिखलापार ही दोन गावे असून याच मार्गावर दोन नद्या आहे. गुरुवारी (दि. ८) सकाळी ६ वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर १० ते दुपारी २ वाजतापर्यंत हाच पाऊस कोसळधार बरसला. त्यामुळे चिखलापार व महालगाव या दोन्ही नद्यांना पूर आला असून वाहतूक काहीशी ठप्प पडली. दरम्यान, शेतातून घराकडे जात असलेली २५ वर दुभती जनावरे या पुराच्या तावडीत सापडल्याचे वृत्त आहे. यातील काही जनावरे पुराच्या पाण्यातून तरंगत सुखरूप बाहेर पडली असून काही जनावरांचा अद्यापही पत्ता लागलेला नाही. त्यामुळे ती जनावरे वाहून तर गेली नाही ना, अशी भीती व्यक्त होत आहे.
या कोसळधार पावसामुळे नदीनाल्यांसह शेतांना तलावाचे रूप आले आहे. शेतातील पारी फुटून अंकुरलेले बियाणे जमिनीसह खरडून गेले. त्यामुळे शेतांचे मोठे नुकसान झाले आहे, अशी माहिती महालगावचे पोलीस पाटील अमित राऊत यांनी लोकमतला दिली. यासह वासी व कारगाव या मार्गावर चार नद्या आहेत. कोसळधार पावसामुळे या चारही नद्यांना सकाळपासून पूर आला आहे. शेतकऱ्यांना शेतात जाता आले नाही. काही शेतकरी शेतातच अडकून असल्याची माहिती वासी येथील शेतकरी सोनबा मेश्राम यांनी लोकमतला दिली. सायंकाळी ५ वाजतापासून पुलावरील पुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली होती.
...
पाऊस आला धावून, पूल गेला वाहून
वासी ते कारगाव या मार्गावर चार नद्या आहे. या चारही नद्यांना पावसामुळे पूर आला. दरम्यान, वासी गावाला अगदी लागून असलेल्या गावनदीवर आठ ते नऊ पायल्यांचा पूल असून, कोसळधार पावसामुळे आलेल्या पुरात हा पूल वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. नदीवर पाच फुटावर पाणी असल्यामुळे चित्र स्पष्ट झालेले नाही. पुलावरील रपटे वाहून जाताना अनेकांनी बघितले, अशी माहिती शेतकरी सोनबा मेश्राम यांनी लोकमतला दिली.
...
एकीकडे नुकसान, दुसरीकडे दिलासा
गत आठवडाभरापासून पाऊस नसल्यामुळे शेतातील कोवळी पिके ऑक्सिजनवर होती. त्यामुळे शेतकरी चातकपक्ष्याप्रमाणे पावसाच्या प्रतीक्षेत होता. दरम्यान, आज पाऊस आला आणि ‘सळो की पळो’ करून गेला. चिखलापार, महालगाव परिसरात एकीकडे नुकसान असले तरी काही भागात हाच पाऊस शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरला आहे.
...
चिखलापार व महालगाव नद्यांना पूर आला असून, दुपारनंतर पुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली. पुराच्या पाण्यात सापडलेली काही जनावरे बाहेर निघालेली आहे. मंडळ अधिकारी व तलाठी यांना आवश्यक सूचना दिल्या असून सायंकाळपर्यंत अधिकृत माहिती प्राप्त होईल.
- अनिरुद्ध कांबळे,
तहसीलदार, भिवापूर.