काल के कपाल पे लिखता मिटाता हुं...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 11:39 PM2018-12-08T23:39:21+5:302018-12-08T23:52:06+5:30
भारतीय राजकारणाच्या इतिहासातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणजे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी. कवी मनाचा कोमल हृदयी नेता म्हणून त्यांची ओळख जनमानसात आहे. मात्र शक्ती, बुद्धी, राजकीय मुत्सद्दीपणा, कृती, वक्तृत्व आणि नेतृत्व याचे अद्भूत मिश्रण म्हणजे श्रद्धेय अटलबिहारी होय. मागील पिढीतून आजच्या काळातील लोकनेता म्हणून त्यांच्याबद्दल माहिती असली तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख अनेकांना नाही. एखादा लोकनेता कसा घडला याची उत्सुकता जशी लोकांना असते तशी त्यांच्याबाबतही आहेच. बाल अटल ते संघाच्या मुशीत घडलेला व राष्ट्रवादाने भारलेला तरुण ते जनसंघाचा नायक, भाजपाचा संस्थापक, पहिल्यांदा संसदेत गेलेला राजकारणी व पंतप्रधान होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अनेक खडतर मार्गाने गेलेला आहे. हा प्रवास उलगडणाऱ्या ‘राष्ट्रपुरुष अटल’ या महानाट्याचा अनुभव प्रेक्षकांनी घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय राजकारणाच्या इतिहासातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणजे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी. कवी मनाचा कोमल हृदयी नेता म्हणून त्यांची ओळख जनमानसात आहे. मात्र शक्ती, बुद्धी, राजकीय मुत्सद्दीपणा, कृती, वक्तृत्व आणि नेतृत्व याचे अद्भूत मिश्रण म्हणजे श्रद्धेय अटलबिहारी होय. मागील पिढीतून आजच्या काळातील लोकनेता म्हणून त्यांच्याबद्दल माहिती असली तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख अनेकांना नाही. एखादा लोकनेता कसा घडला याची उत्सुकता जशी लोकांना असते तशी त्यांच्याबाबतही आहेच. बाल अटल ते संघाच्या मुशीत घडलेला व राष्ट्रवादाने भारलेला तरुण ते जनसंघाचा नायक, भाजपाचा संस्थापक, पहिल्यांदा संसदेत गेलेला राजकारणी व पंतप्रधान होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अनेक खडतर मार्गाने गेलेला आहे. हा प्रवास उलगडणाऱ्या ‘राष्ट्रपुरुष अटल’ या महानाट्याचा अनुभव प्रेक्षकांनी घेतला.
खरंतर नागपूरच्या कलावंतांनी या राष्ट्रनायकाच्या देशभरातील चाहत्यांना दिलेली ही कलात्मक भेटच होय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आयोजित खासदार महोत्सवाच्या निमित्त वाजपेयींच्या जीवनदर्शनाची ही महानाट्यमय भेट प्रथमत: नागपूरकरांनी अनुभवली.
रंजना चितळे यांचे लेखन, प्रियंका शक्ती ठाकूर यांचे दिग्दर्शन, प्रयास बहुउद्देशीय संस्थेतर्फे शक्ती ठाकूर यांची निर्मिती असलेल्या आणि या महोत्सवासाठी महिनाभरात तयार झालेल्या या महानाट्याचा प्रयोग शनिवारी खासदार महोत्सवाच्या निमित्ताने ईश्वर देशमुख क्रीडा महाविद्यालयाच्या पटांगणात झाला. जन्म, बाल शिक्षण, संघाच्या शाखेतील धडे, संघाच्या मुखपत्राचे संपादक म्हणून कार्य, तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या प्रेरणेतून राजकीय प्रवास, विविध आंदोलनातील सहभाग, कवी संमेलन, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट, आणीबाणी, भाजपाची स्थापना, पहिल्यांदा निवडणुकीत विजयानंतर संसदेतील भाषण, जनता पार्टीच्या सरकारमध्ये विदेशमंत्री म्हणून युनेस्कोमध्ये हिंदीतून भाषण व पुढे पंतप्रधान होईपर्यंतच्या अनेक घटनांना धरून या अतिशय प्रभावी नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे. वेगवान कथानक, कलावंतांचा अभिनय, गीतसंगीताची जोड, राष्ट्रप्रेमाची भावना आणि मुख्य भूमिकेतील विनोद राऊत यांच्याद्वारे अटलबिहारी वाजपेयी यांच्या चिरपरिचित संवादामुळे हे महानाट्य प्रभावीपणे प्रेक्षकांच्या समोर येते. नेपथ्यापासून प्रकाशव्यवस्थेपर्यंत नाटकाची प्रत्येक गोष्ट अतिशय उत्कृष्टतेने सादर करण्यात आल्यामुळे हे महानाट्य लक्ष वेधते आणि प्रेक्षकांना खिळवूनठेवण्यात यशस्वी होते. याशिवाय वाजपेयी वगळता सध्याच्या राजकारणात असलेल्या व लोकांमध्ये परिचित असलेल्या राजकीय व्यक्तींच्या उपस्थितीमुळे हे नाटक अधिकच उत्सुकता वाढविते. वाजपेयी यांचे जीवन माहीत असूनही पुढे काय होईल, ही उत्कंठा वाढविण्यातही दिग्दर्शकाला यश आले आहे. महानाट्यात चिन्मय तेलपांडे (बाल अटल), रोहित कटरे (युवा अटल) यांनी संवादातून प्रभाव पाडला. यांच्यासह अनिल पालकर (गोळवलकर गुरुजी), संजय रंधे (भाऊराव देवरस), नचिकेत म्हैसाळकर (पं. दीनदयाल उपाध्याय), ख्वाजा रब्बानी (लालकृष्ण अडवाणी), ओंकारेश्वर गुरव (मुरलीमनोहर जोशी), घनश्याम मेहता (नरेंद्र मोदी), संजीवनी चौधरी (सुषमा स्वराज), विष्णू श्रीवास्तव (नितीन गडकरी), शक्ती रतन (राजनाथ सिंह), मयूर मेश्राम (एपीजे अब्दुल कलाम), ख्वाजा साजिद रब्बानी (नवाज शरीफ), राकेश खाडे (गंगाधरराव फडणवीस), अंश रंधे (बाल देवेंद्र फडणवीस) आदी कलावंतांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. महानाट्याचे सहनिर्देशक पवन शाहा, ध्वनी व संगीत चारुदत्त जिचकार, प्रकाश योजना किशोर बत्तासे, नेपथ्य नाना मिसाळ व सुनील अमदापुरे, रंगभूषा व केशभूषा लालजी श्रीवास, नृत्य दिग्दर्शन अभिजित तराले यांच्यासह प्रहार मिलिटरी स्कूलचे परेड मार्च, अमित स्कूलचे लेझीम पथक आदींचा यात सहभाग होता. अभिनेते व इतरांसह नागपूरच्या ३५० कलावंतांच्या परिश्रमातून महानाट्याची निर्मिती झाली असल्याने ते अधिकच अभिमानास्पद ठरणारे आहे.
तत्पूर्वी माजी खासदार अजेय संचेती, आमदार सुधाकर देशमुख, माजी खासदार दत्ता मेघे, आमदार डॉ. परिणय फुके, नागो गाणार, प्रा. अनिल सोले, मनमोहन अग्रवाल, प्रकाश दुबे, प्रमोद पेंडके, रमेश मंत्री, उपेंद्र कोठेकर यांच्या उपस्थितीत औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
सैनिकांचा सत्कार
यावेळी नितीन गडकरी यांच्या हस्ते एअर मार्शल (निवृत्त) शिरीष देव, माजी सैनिक सुधाकर मोरे, माजी वायुसैनिक मधुकर भातकुलकर, कर्नल कमांडंट (निवृत्त) जे.एस. भंडारी, माजी सैनिक विलास दवणे, संजय तिवारी, लीना बेलखोडे तसेच स्वातंत्र्य संग्राम सैनिक यादवराव देवगडे व विठ्ठलराव गोडे यांचा सत्कार करण्यात आला.
गडकरी यांच्यासोबतच्या दृश्यावर टाळ्या
अटलबिहारी वाजपेयी अनेकदा नागपूरला आले होते. यातील संघ भूमीला भेट, कस्तूरचंद पार्कवरील त्यांचा निवडणूक सभा आदी दृश्य नाटकात येतात. यात नितीन गडकरी यांच्यासोबतची दिल्ली व नागपुरातील भेट, गंगाधरराव फडणवीस व बाल देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीच्या दृश्यांवर प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.