अपंग बांधवांनी केला महायज्ञ
By admin | Published: December 9, 2015 03:38 AM2015-12-09T03:38:10+5:302015-12-09T03:38:10+5:30
आपल्या न्याय्य मागण्यांसाठी राष्ट्रीय विकलांग कल्याण संस्थेतर्फे विधानभवनावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
आंदोलनाची दखल नाही : थंडीत कुडकुडत आंदोलन
नागपूर : आपल्या न्याय्य मागण्यांसाठी राष्ट्रीय विकलांग कल्याण संस्थेतर्फे विधानभवनावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले. दरम्यान सोमवारी काढण्यात आलेल्या मोर्चात अपंग बांधवांचे समाधान न झाल्यामुळे त्यांनी आपला मोर्चा कायम ठेवला होता. मोर्चाच्या दुसऱ्या दिवशी अपंगांच्या समस्यांबाबत निर्णय घेण्याची सद्बुद्धी शासनाला यावी यासाठी अपंग बांधवांनी महायज्ञाचे आयोजन केले.
अनेक वर्षांपासून सातत्याने विधानभवनावर मोर्चा काढूनही काहीच ठोस मागणी पदरात न पडल्यामुळे संतप्त अपंग बांधवांनी राष्ट्रीय विकलांग कल्याण संस्थेच्या नेतृत्वाखाली विधान भवनावर मोर्चा काढला. दरम्यान पोलिसांनी टेकडी रोडवर अपंग बांधवांचा मोर्चा अडवून धरला होता. अपंग बांधवांच्या मागण्यांची दखल न घेतल्यामुळे त्यांनी कडाक्याच्या थंडीत आपला मोर्चा सुरूच ठेवला आहे. शासनाला अपंगांच्या समस्यांची जाणीव नसून त्यांना ही जाणीव व्हावी यासाठी मोर्चाच्या दुसऱ्या दिवशी अपंग बांधवांनी टेकडी रोडवर महायज्ञाचे आयोजन केले. भजन सादर करून अपंग बांधवांनी शांततामय मार्गाने आपले आंदोलन दिवसभर सुरू ठेवले. दरम्यान मागण्यांची दखल शासन घेत नाही, तोपर्यंत आपले आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार मोर्चाचे गिरीधर भजभुजे, दादा मिरे आदींनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)