कळमना मार्केट आग; जवानांनी झेलला लाल मिरचीचा धूर; तोंडाला बांधला ओला कपडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2022 08:22 PM2022-11-23T20:22:00+5:302022-11-23T20:23:02+5:30
Nagpur News कोट्यवधी रुपयांच्या शेतकऱ्यांच्या मिरच्यांमधून आगीच्या ज्वाळा निघत होत्या. त्यातून निघालेल्या धुरामुळे अग्निशमन पथकाला आग विझविताना प्रचंड त्रास झाला.
नागपूर : कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत पहाटे २ वाजताच्या सुमारास मिरचीच्या गोदामाला आग लागल्याची घटना घडल्यानंतर कंट्रोल रूमला २.१८ मिनिटांनी कॉल आला. लगेच कळमना अग्निशमन केंद्रातून गाडी रवाना झाली. कोट्यवधी रुपयांच्या शेतकऱ्यांच्या मिरच्यांमधून आगीच्या ज्वाळा निघत होत्या. त्यातून निघालेल्या धुरामुळे अग्निशमन पथकाला आग विझविताना प्रचंड त्रास झाला.
अवघ्या काही मिनिटांतच ८ गाड्या कळमण्यात दाखल झाला. आगीच्या धुरामुळे खेस लागत असल्याने, अग्निशमन कर्मचाऱ्यांनी तोंडावर ओला कापड बांधून आग विझविण्याचा प्रयत्न केला. अवघ्या दोन तासांत आगीच्या ज्वाळांवर नियंत्रण मिळविल्यानंतर मिरच्यांच्या ढिगांना जेसीबीने पसरवून आग शांत करण्यात आली. सकाळी ९ पर्यंत हे काम सुरू होते. जवळपास ३० कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचे काम केले. शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे प्रभारी अग्निशमन अधिकारी अनिल गोळे यांनी सांगितले. नुकसानीचा निश्चित आकडा यायचा असल्याचेही ते म्हणाले.