कळमना, वर्धमाननगरात अग्नितांडव; सायकल गोदाम, अगरबत्ती कारखान्याला आग, कोट्यवधींचे नुकसान
By मंगेश व्यवहारे | Published: October 6, 2023 04:43 PM2023-10-06T16:43:17+5:302023-10-06T17:04:04+5:30
अगरबत्ती कारखाना, सायकल आणि फोमच्या गोदामाला आग : दोन कोटीचे नुकसानीचा अंदाज
नागपूर : गुरुवारी मध्यरात्री कळमना आणि वर्धमाननगरात आगीने तांडव घातला. या आगीत अगरबत्तीचा कारखाना, सायकलचे गोदाम, फोमचे गोदाम, एका घराचे किचन आणि एका अपार्टमेंटची कम्पाऊंड वॉल आगीमुळे पडली. यामध्ये दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सुदैवाने कुठलीही जीवितहानी आगीत झाली नाही.
पूर्व वर्धमाननगरातील स्वामी नारायण शाळेजवळ मुकेश ठक्कर यांचे मेसर्स परफेक्ट सायकल ॲण्ड रेक्झिनचे गोदाम आहे. तर त्यातच मीना ठक्कर यांचे फोमचे गोदाम आहे. येथे गुरुवारी मध्यरात्री २.१० वाजता अग्निशमन विभागाला येथे आग लागल्याचा कॉल आला. अग्निशमन विभागाचे पथक येथे पोहचेपर्यंत आगीने उग्ररुप धारण केले होते. एका गोदामात फोम आणि दुसरीकडे फायबर व टायर असल्याने आगीने चांगलाच भडका घेतला. या भडक्यामुळे गोदामाला लागून राहत असलेल्या सुभाष जैन यांच्या घरालाही झळ बसली. त्यांचे किचनमधील साहित्य जळाले. खिडक्यांचे तावदान पिघळले. धुरामुळे घरातील भिंती काळवंडल्या. तर बाजुलाच असलेल्या स्वामी नारायण अपार्टमेंटमधील कम्पाऊंड वॉल आगीमुळे पडली आणि पाण्याचा पंपाचेही नुकसान झाले.
या आगीवर पूर्णत: नियंत्रण मिळविण्यासाठी दुपारी १२.३० वाजले होते. अग्निशमन विभागाने दिलेल्या अंदाजित माहितीनुसार दोन्ही गोदामातील साहित्याचे दीड कोटीचे तर इतर घराला बसलेल्या झळामुळे ५० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाचे ७ बंब घटनास्थळी पोहचले होते. अग्नीशमन विभागाचे केंद्र निरीक्षक अनिल गोळे, सुनील डोकरे, भगवान वाघ, दिलीप चव्हाण, एस.पी. सय्यद, गोविंद बावने, सुरेश आत्राम यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
- अगरबत्ती कारखान्याचे ७ लाखाचे नुकसान
जुनी कामठी रोड कळमना येथे हंसराज अगरबत्तीचा कारखान्याला गुरुवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास आग लागली. हा कारखाना दाऊद बेग यांचा होता. यामध्ये भुसा, अगरबत्तीच्या काड्या, परफ्यूम लिक्विड आणि अगरबत्ती बनविणाऱ्या ३ मशीन, पॅकेजींगचे साहित्य असल्याने आगीने चांगलाच भडका घेतला. या आगीत दोन मोटारसायकल जळून खाक झाल्या. अग्निशमन विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार ७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.