दिव्यांगासाठी वरदान ठरणारा हात ‘कलआर्म’; देशातील पहिला स्वयंचलित हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2023 08:34 PM2023-01-20T20:34:12+5:302023-01-20T20:34:47+5:30

Nagpur News सर्व प्रकारच्या क्रिया करू शकणारा स्वयंचलित हात विकसित करण्यात आला असून मोबाईल ॲपच्या माध्यमातूनदेखील याला संचालित करता येणे शक्य झाले आहे. माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना समर्पित असलेला हा ‘कलआर्म’ देशातील पहिला ‘बायोनिक हॅंड’ ठरला आहे.

Kalarm, a boon for the disabled; First automatic arm in the country | दिव्यांगासाठी वरदान ठरणारा हात ‘कलआर्म’; देशातील पहिला स्वयंचलित हात

दिव्यांगासाठी वरदान ठरणारा हात ‘कलआर्म’; देशातील पहिला स्वयंचलित हात

Next
ठळक मुद्दे मोबाईल ॲपने संचालित करता येणे शक्य

विशाल महाकाळकर

नागपूर : विविध अपघातांमध्ये हात गमाविल्यानंतर किंवा जन्मत:च हात नसलेल्यांसाठी आयुष्य प्रचंड संघर्षमय होते. मात्र वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे यावरदेखील मात करता येणे शक्य झाले आहे. सर्व प्रकारच्या क्रिया करू शकणारा स्वयंचलित हात विकसित करण्यात आला असून मोबाईल ॲपच्या माध्यमातूनदेखील याला संचालित करता येणे शक्य झाले आहे. माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना समर्पित असलेला हा ‘कलआर्म’ देशातील पहिला ‘बायोनिक हॅंड’ ठरला आहे.

हैदराबाद येथील एका कंपनीने याला विकसित केले आहे. वजनाने अतिशय हलका असलेल्या या ‘बायोनिक हॅंड’मध्ये १८ प्रकारच्या ग्रिप्स आहेत. याचा उपयोग करून ८ किलोपर्यंतचे वजन सहजपणे उचलता येणे शक्य आहे. हा हात बॅटरीच्या माध्यमातून चार्ज होतो व एका चार्जिंगमध्ये सहजपणे ८ ते १० तास याचा वापर करता येतो. विशेष म्हणजे याला मोबाईल ॲपच्या माध्यमातून संचालित करता येणे शक्य आहे. ब्लुटूथच्या माध्यमातून याला कनेक्ट केल्यानंतर यातील विविध कंट्रोलदेखील वापरता येतात. यासोबतच यात ऑनलाईन अपडेट्सदेखील देण्यात येत आहेत, अशी माहिती संबंधित कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक विजय बगाडे यांनी दिली.

स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मदत

विदेशात हे तंत्रज्ञान अतिशय महागडे आहे. त्याहून १० ते २० टक्के दरात हा हात भारतात विकसित करण्यात आला आहे. मात्र तरीदेखील अनेक दिव्यांगांना याचा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे शासकीय योजनेमधून गरजूंना याचे वाटप व्हावे यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मदत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सेंसर प्रणालीवर काम

हा ‘बायोनिक हॅंड’ इएमजी (इलेक्ट्रोमायोग्राफी) सेंसर प्रणालीवर काम करतो. यातील सेंसर्स स्नायूंना हलवल्यावर निर्माण होणारे लहान विद्युत सिग्नल मोजतात. जेव्हा एखादा सरासरी माणूस आपले हात हलवण्याचा विचार करतो तेव्हा मेंदूतील मोटर न्यूरॉन्स हात आणि हाताच्या स्नायूंना संदेश पोहोचवतात. त्याचाच उपयोग करून हा हात काम करतो.

Web Title: Kalarm, a boon for the disabled; First automatic arm in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.