काेल वॉशरीजने ग्रामस्थांचे जगणे मुश्कील; पारशिवनी तालुक्यातील भीषण वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2022 03:39 PM2022-10-20T15:39:24+5:302022-10-20T15:41:54+5:30

एमपीसीबी अधिकारी घेणार नागरिकांच्या भेटी

Kale washes make life difficult for villagers; | काेल वॉशरीजने ग्रामस्थांचे जगणे मुश्कील; पारशिवनी तालुक्यातील भीषण वास्तव

काेल वॉशरीजने ग्रामस्थांचे जगणे मुश्कील; पारशिवनी तालुक्यातील भीषण वास्तव

Next

नागपूर : विदर्भातील शेतकऱ्यांना एकीकडे नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागताे तर दुसरीकडे औष्णिक वीजकेंद्रातून बाहेर पडणाऱ्या प्रदूषणाचीही समस्या सहन करावी लागते. वीजकेंद्रातून निघणारी राख आणि वॉशरीजमधून निघाऱ्या धुळीने लाेकांचे जगणे मुश्कील केले आहे. पारशिवनी तालुक्यातील वडारा आणि येसंबा या दाेन्ही गावच्या शेतजमिनींची धुळधाण हाेत असताना ग्रामस्थांची ओरड कुणाच्या कानावर पडत नाही.

वडारा आणि येसंबा या गावच्या शेतजमिनीच्या मधाेमध ही काेल वॉशरीज आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, कोळशाची प्रतवारी करण्यात येत असलेली वॉशरीज कोरडी आणि उघडी आहे. येथे २०-२२ फूट उंच ढिगाऱ्यांमध्ये काेळसा साठवला जातो. कोळशाच्या धुळीमुळे आजूबाजूच्या तीन किमी परिसरात प्रचंड प्रदूषण होत आहे. गावांतील सुमारे ५० शेतकरी त्यांच्या शेतजमिनीत भाजीपाला, कापूस, सोयाबीन, कडधान्ये पिकवतात आणि गोड लिंबाच्या बागाही आहेत.

मार्च २०२१ मध्ये कोल वशरीजचे काम सुरू झाले. कोळशाच्या धुळीचा पिकांवर गंभीर परिणाम होत असून जवळजवळ ७५ टक्के उत्पादन कमी झाले आहे. शिवाय शेतकरी आणि ग्रामस्थांच्या आरोग्यावरदेखील परिणाम हाेत असून डोळ्यात जळजळ होणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि घशात वारंवार संसर्ग होण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी)चे प्रादेशिक अधिकारी ए.एम. करे यांच्यानुसार, वशरीज सुरू करण्यासाठी सशर्त परवानगी देण्यात आली होती; पण कोणत्या अटींची पूर्तता करायची होती, हे त्यांनी स्पष्ट केले नाही. वडारा गावाजवळील गोंडेगाव कोल वॉशरीज, ज्याला गुप्ता कोल वॉशरीज म्हणूनही ओळखले जाते, त्यांना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पाच लाख रुपयांची बँक गॅरंटी भरण्यासह प्रदूषण नियंत्रण प्रणालीच्या ऑपरेशन्स आणि देखभालीसाठी पाच लाख रुपयांची बँक हमी सादर करण्यास सांगितले आहे.

कापूस उत्पादक शेतकरी कृष्णा किलेकर यांनी व्यथा मांडली. वॉशरीजच्या धुरामुळे कापूस काळा पडत असल्याने त्याला भाव मिळत नसल्याचे ते म्हणाले. शिवाय वॉशरीजमधून निघणाऱ्या दूषित पाण्यामुळे जमीन काळी पडली असून तिचा पाेत घसरला आहे. संत्री, माेसंबीचेही नुकसान हाेत आहे. एवढेच नाही वॉशरीजचे पाणी कॅनलद्वारे थेट पेंच नदीत पाेहाेचत असून शेतातील विहिरी अत्यंत प्रदूषित झाल्या असल्याची व्यथा त्यांनी मांडली.

आज शेतकऱ्यांच्या भेटी घेणार

दरम्यान, एमपीसीबीचे अधिकारी गुरुवारी शेतकरी आणि काेल वॉशरीज मालकांशी भेट घेऊन या समस्यांवर चर्चा करणार असल्याचे ए.एम. करे यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना सांगितले.

Web Title: Kale washes make life difficult for villagers;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.