काली पलटण ते गोरा बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:07 AM2021-08-01T04:07:18+5:302021-08-01T04:07:18+5:30
कामठी छावणीच्या स्थापनेला २०० वर्षे पूर्ण अस्वस्थ भूतकाळाची साक्षीदार, नागपूरकर भोसले यांच्या भीतीने सैन्यतळ लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ...
कामठी छावणीच्या स्थापनेला २०० वर्षे पूर्ण
अस्वस्थ भूतकाळाची साक्षीदार, नागपूरकर भोसले यांच्या भीतीने सैन्यतळ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानी नागपूरसह विदर्भ, तसेच संपूर्ण मध्य भारत, ओडिशा, बंगालपर्यंतच्या मोठ्या भूभागावरील ब्रिटिश सत्तेच्या विस्ताराची साक्षीदार असणारी कामठी छावणी यंदा स्थापनेची २०० वर्षे पूर्ण करीत आहे. ब्रिटिश साम्राज्याच्या विस्ताराला नागपूरकर भोसले यांच्याकडून अधिक धोका असल्याचे आणि पुण्यात पेशव्यांच्या पराभवानंतरही दुसरे बाजीराव पेशवे हे नागपूरच्या आप्पासाहेब भोसले यांच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मध्य भारतासाठी इंग्रजांनी कामठीतून मोर्चेबांधणी केली.
पुढे १८५७ च्या उठावाची ठिणगी जिथे पडली त्या मीरत येथे इंग्रजांनी १८०३ मध्ये पहिली छावणी उघडली. त्यानंतर देशात जागोजागी सैन्य छावण्या उघडल्या गेल्या. कामठीची छावणी त्या पहिल्या टप्प्यातीलच. स्थापनेची नेमकी तारीख उपलब्ध नसली तरी वर्ष १८२१ आहे.
भोसले व पेशवे एकत्र येऊ नयेत यासाठी ब्रिटिशांनी १८२१ मध्ये १४ हजार सैन्याची पलटण सिकंदराबादहून कामठीला हलविली. कामठीमुळेच १८५७ च्या उठावावेळी मध्य भारतात मोठे बंड झाले नाही. दरम्यान, ते विदर्भातील मोठे व्यापारकेंद्र बनले होते. स्वातंत्र्यानंतर कामठी कॅन्टोन्मेंट सैनिकी प्रशिक्षणाचे मोठे केंद्र म्हणून उदयास आले.
कामठीच्या पहिल्या तुकड्यांमध्ये पायदळ, घोडदळासोबतच उंटांचेही दल होते. बहुतांश सैनिक मद्रासी होते व काळ्या रंगाचे असल्याने ही तुकडी ‘काली पलटण’ म्हणून ओळखली जायची. या पलटणीसाठी जुन्या कामठीलगत कन्हान नदीच्या काठावर टी आकाराची जागा निश्चित करून सैनिकी कॅम्प उभारण्यात आला. त्यावरून या जागेला ‘कॅम्प-टी’असे नाव पडले. सीताबर्डीच्या लढाईत पराभूत झालेल्या भोसले यांनी १८२३ मध्ये तडजोड म्हणून येरखेडा, देसाडा व वाघोली या तीन गावांचे शिवार ब्रिटिशांना दिले. आजनी, वारेगाव परिसरही ताब्यात घेण्यात आला व पूर्ण क्षमतेचे कॅन्टोन्मेंट विकसित झाले. ब्रिटिश सैन्याधिकारी, रेजिमेंट कायमस्वरूपी वास्तव्यास आल्या.
------------------
शंभर वर्षांत लष्करी वैभवाला ओहोटी
- स्थापनेवेळी ही छावणी खूप मोठी होती. १८५८ मध्ये तिचा आकार कमी करण्यात आल्या. तोफखान्याच्या दोन बॅटरीज, ब्रिटिश इन्फन्ट्रीची एक रेजिमेंट, स्थानिक इन्फंट्रीच्या तीन रेजिमेंट व नेटिव्ह कॅव्हेलरीची एक रेजिमेंट, सोबत हत्ती व उंटखाना असे तिचे नवे स्वरूप होते. १८८८ मध्ये छावणी परिसर मद्रास प्रेसिडेन्सी व बॉम्बे आर्मीच्या कमांडर-इन-चीफच्या अखत्यारीत आला.
- १८८९ मध्ये तोफखान्याची बॅटरी, ब्रिटिश पायदळाची एक तुकडी, नेटिव्ह इन्फंट्रीची दीड तुकडी व नेटिव्ह घोडदळाच्या एका तुकडीसह नागपूर जिल्ह्याचा कारभार ब्रिगेडियर जनरलच्या अखत्यारीत होता.
- १८९१ मध्ये छावणीतील स्थानिक घोडदळाची तुकडी काढून टाकण्यात आली व पायदळाची अर्धी बटालियन संबळपूरला हलविण्यात आली.
- जानेवारी १९०५ मध्ये लॉर्ड किचनर यांनी फेररचना केली व कामठीचे मिलिटरी स्टेशन हटविण्यात आले. ते सैन्य रायपूर व संबलपूरला हलविल्याने नागपूरचे ‘सैन्य जिल्हा’ म्हणून महत्त्व कमी झाले.
- याच वर्षी नागपूरचा काही स्टाफ अहमदनगरला वर्ग करण्यात आला. कामठीची जबाबदारी तुलनेने कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे आली.
- १९०७ मध्ये जबलपूरही या ब्रिगेडचा भाग झाले. हळूहळू कामठीचे महत्त्व कमी होत गेले.
- कामठी कॅन्टोनमेंट हे द्वितीय श्रेणीचे कॅन्टोनमेंट आहे. येथील नगरपालिका प्रशासन हे कॅन्टोनमेंट अॅक्ट १९२४ अंतर्गत चालविले जाते. २००६ मध्ये या कायद्यात सुधारणा करण्यात आली. १४ सदस्यांचा समावेश असलेल्या मंडळामार्फत नियम बनविलेले असून त्यातील सात सदस्य जनतेमार्फत मतदानातून निवडलेले असतात.
- १९५१ मध्ये कॅन्टोनमेंटची लोकसंख्या ४८६७ एवढी होती. पण स्वातंत्र्यानंतर १९६१ च्या जनगणनेनुसार नागरी लोकसंख्या ५०९१ आणि सैन्याची ६३७ एवढी संख्या होती.
---------------
कर कमी लागत असल्यामुळे
कामठी बनले व्यापार केंद्र
- मराठा राजवटीच्या तुलनेत कामठी कॅन्टोनमेंटमध्ये कमी कर आकारला जात असल्याने व्यापाऱ्यांनी तिथे बस्तान बसविले. सैन्यासोबतच मोठ्या प्रमाणात व्यावसायिक वस्ती तयार झाली. नागपूर ते कामठी हा परिसर जणू बाजारपेठ होती. पुढे रेल्वेचा विस्तार व नागरिकांचे नागपूरला स्थलांतर यामुळे जिल्ह्याचे मुख्यालयही कामठीहून नागपूरला स्थानांतरित झाले.
----------------
पावणेदोनशे वर्षांचे साक्षीदार ऑल सेंट चर्च
ब्रिटिश सैन्याच्या प्रार्थनेसाठी कॅन्टोन्मेंटच्या प्रवेशद्वारासमोर १८३३ मध्ये सेंट्रल प्रोव्हिन्सचे मुख्य आयुक्त कर्नल एलियॉट यांनी ऑल सेंट चर्चची स्थापना केली. ते आता ‘क्राईस्ट चर्च’ म्हणून ओळखले जाते. त्याचा आराखडा बंगालचे अभियंते कर्नल हार्ले मॅक्सवेल यांनी तयार केला.
----------------
कॉन्सेप्शन चर्च (आरसी चर्च)
फ्रेंच मिशनरीज फादर लॉरेल यांनी मिशनरीज ऑफ सेंट फ्रान्सिस डीसेल्सच्या या चर्चची स्थापना १८४६ मध्ये ॲण्ड कंपनी पायोनियर यांनी केली. गोरा बाजारात परिसरात प्रवेश करताना हे चर्च लागते.
----------------
दीड शतकाचा ठेवा असलेला महादेव घाट
कन्हान नदीच्या काठावर वसलेल्या महादेव घाटाला १५० वर्षांचा इतिहास आहे. छावणीतील हिंदू सैनिक आणि परिसरातील ग्रामस्थांसाठी येथील महादेव मंदिर आध्यात्मिक स्थळ राहिले. दरवर्षी या मंदिरात गणेशोत्सव, दुर्गाउत्सव साजरा केला जात होता.
----------------
कामठी क्लब आणि कस्तुरचंद डागा
लष्करी अधिकाऱ्यांच्या मनोरंजनासाठी १८७७ साली कामठी क्लबची स्थापना करण्यात आली. कामठी क्लब कन्हान नदीच्या काठावर जीएलआरसी नं. २५२ मध्ये ५.४० एकरांत विस्तारलेला आहे.
१९१२ मध्ये कस्तुरचंद डागा यांनी बिल्डिंग क्रमांक ७७ या क्लबसाठी दान केली.
----------------
ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या समाधीचा परिसर
छावणी परिसरातील ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या समाधींचा परिसर रोमन कॅथॉलिक व प्रॉटेस्टंट चर्चच्या सदस्यासांठी दोन भागांत विभागला आहे. ही स्मशानभूमी क्राईस्ट चर्च बिल्डिंगसमोर आहे. पहिल्या जागतिक महायुद्धात मरण पावलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या १०० समाधी या स्मशानभूमीत आजही आहेत.
----------------
इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारा माल रोड
कन्हान नदीच्या प्रवाहाला समांतर जाणारा माल रोड हा कामठी कॅन्टोन्मेंटमधील महत्त्वाचा मार्ग ४.३ किलोमीटर लांबीचा असून त्याच्या दोन्ही बाजूंना ब्रिटिशकालीन बंगल्यांचा दर्शनी भाग पाहावयास मिळतो.
----------------
कन्हानच्या कोंदणात कामठी कॅन्टोन्मेंट
कॅन्टोन्मेंटच्या उत्तर दिशेला चार मैलांपर्यंत कन्हान नदीचा विस्तार आहे. ही कॅन्टोन्मेंटची नैसर्गिक सीमा आहे. कन्हान नदी नागपूर शहर, कामठी कॅन्टोन्मेंट व आसपासच्या गावांसाठी पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत आहे. कॅन्टोन्मेंट एरियामध्ये असलेल्या जलशुद्धिकरण प्रकल्पात याच नदीतून पाणीपुरवठा केला जातो. या नदीमुळे कॅन्टोन्मेंटला नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झाले आहे.
----------------
ब्रिटिशकालीन फाशी यार्ड
कामठी कॅन्टोन्मेंट परिसरात ब्रिटिशांनी सैन्यछावणी उभारल्यानंतर नागपूरचे राज्य ब्रिटिश साम्राज्यात विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. या काळात ब्रिटिशांविरुद्ध बंड करणाऱ्यांना मृत्युदंडाच्या शिक्षेसाठी परिसरात फाशी यार्ड उभारण्यात आले होते. येथे कुणाकुणाला फाशी देण्यात आली, याचे तपशील मात्र उपलब्ध नाहीत.
----------------
ब्रिटिशांची बाजारपेठ गोराबाजार
कामठी कॅन्टोन्मेंट परिसरातील गोरा बाजार ही ब्रिटिशांची मुख्य बाजारपेठ होती. येथील सराफा ओळ त्या काळात प्रसिद्ध होती. नंतरच्या काळात हा सराफा बाजार नागपुरातील इतवारी, मध्यप्रदेशातील छिंदवाडा आणि छत्तीसगडमधील राजनांदगाव येथे स्थलांतरित झाला. छिंदवाडा येथे आजही चुन्नीलाल चंपालाल ज्वेलर्सची ‘कामठीवाले ज्वेलर्स’ म्हणून ही भव्य शोरूम आहे.
गोरा बाजार येथे ब्रिटिश अधिकारी आणि जवान त्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूची खरेदीही करायचे. ही खरेदी करताना ब्रिटिश अधिकारी या परिसरात घोड्यावर सवारी करायचे, असे कामठी छावणी परिषदेचे माजी उपाध्यक्ष युगचंद छल्लानी यांनी सांगितले.
-------------
नागपूरकर भोसल्यांच्या भीतीनेच आणली इंग्रजांनी कामठीत सैन्यछावणी
प्लासीच्या लढाईत बंगालचा नवाब मीर जाफरचा पराभव, ब्रिटिश सैन्याचा ईस्ट इंडिया कंपनीसाठी पहिल्यांदा वापर, त्यानंतर देशभर ब्रिटिश साम्राज्याचा विस्तार, त्या सत्ताबदलाचा अस्वस्थ भूतकाळ, नागपूरकर भोसल्यांकडून उठावाची भीती, या पार्श्वभूमीवर कामठी येथे दक्षिणेतील सैन्याची जमवाजमव करण्यात आली व त्यातून एकोणिसाव्या शतकातील एक व्यापार केंद्र उभे राहिले.
कामठी छावणीच्या स्थापनेला आधीच्या वीस वर्षांमधील नागपूरकर भोसल्यांच्या प्रभावाची पार्श्वभूमी आहे. १८०० मध्ये सगळ्या मराठा सरदारांपैकी सर्वांत मोठे राज्य नागपूरकर भोसले यांचे होते. त्याआधी दोन वर्षे गव्हर्नर जनरल म्हणून दाखल झालेल्या लॉर्ड वेलस्लीने भारतातील संस्थानिकांना मंडलिक बनविण्याची मोहीम हाती घेतली होती. म्हैसूर, निजाम, इंदूरचे होळकर त्या मोहिमेला बळी पडले. पण, दुसऱ्या रघुजी भोसले यांनी दौलतराव शिंदे यांच्या मदतीने ब्रिटिशांना दाद दिली नाही. उलट आडगाव-शिरसोलीच्या (जि. अकोला) लढाईत वेलस्लीच्या सैन्याची मोठी हानी झाली. गाविलगड, नरनाळा किल्ले हातून गेल्यानंतरही ते लढत राहिले. २२ मार्च १८१६ रोजी त्यांचे निधन झाले. पुढच्या वर्षी सीताबर्डीच्या लढाईत नागपूरकर भोसले यांचा पराभव झाला. किल्लेदान गगनसिंगचा लढाईत मृत्यू झाला व चांदा किल्लाही ब्रिटिशांच्या ताब्यात आला.
या दरम्यान दुसरे बाजीराव पेशवे आप्पासाहेब भोसले यांच्या संपर्कात असल्याचा, गणपतराव सुभेदार यांच्यासमवेत वाशिम, पांढरकवडामार्गे चांदा किल्ल्यावरून ब्रिटिशांवर हल्ल्याची तयारी होत असल्याचा पुरावा इंग्रज अधिकारी एलफिन्स्टनच्या हाती लागला होता. सीताबर्डीची लढाई हरल्यानंतर रेसिडेंट जेनकिन्स यांना शरण गेलेले आप्पासाहेब भोसले यांना सावधगिरी म्हणून प्रयागला हलविण्याचा निर्णय इंग्रजांनी घेतला. पण, वाटेत ते इंग्रजांच्या तावडीतून निसटले. नंतर ते चित्तू पेंढारीच्या मदतीने अशीरगड किल्ल्यावर असताना इंग्रजांनी माळवा, पुणे, नागपूर, हैदराबाद येथील सैन्य धाडले. पण, आप्पासाहेब सुटले व पुढे ग्वाल्हेर, इंदूर, जयपूर, जोधपूर राजांकडे आश्रयासाठी धडपडत राहिले. जोधपूरला त्यांना आश्रय मिळाला, तोवर मध्य भारतावरील ताबा कायम राहावा यासाठी कामठीला सैन्याची छावणी उभी करण्यात आली होती.