कालिदास महोत्सव : आरोग्यज्ञान, श्रवणभानाने अन् पदन्यासाच्या सुरेखतेने गाजली संध्याकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 11:28 PM2020-01-06T23:28:39+5:302020-01-06T23:33:22+5:30

रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात सुरू असलेल्या कालिदास महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आरोग्य जागृतीचे ज्ञान, सतारीच्या मधूर कंपनाचे श्रवणज्ञान आणि लयपूर्ण पदन्यासाची नृत्यजाणिव रसिकांना करता आली.

Kalidas Festival: A beautiful evening of health, hearing and meditation. | कालिदास महोत्सव : आरोग्यज्ञान, श्रवणभानाने अन् पदन्यासाच्या सुरेखतेने गाजली संध्याकाळ

कालिदास महोत्सव : आरोग्यज्ञान, श्रवणभानाने अन् पदन्यासाच्या सुरेखतेने गाजली संध्याकाळ

Next
ठळक मुद्देशर्वरी जमेनिस यांनी नृत्यातून सादर केले ‘अर्धनारिनटेश्वरस्तोत्र’पंचतत्त्वातून वैद्यांनी सांगितली शरीरसृष्टीचे विज्ञानसमन्वय सरकार यांची सतार अन् पिनाकी चक्रवर्ती यांच्या तबलावादनाची चालली जादू

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कालिदास समारोह आयोजन समिती, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि नागपूर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात सुरू असलेल्या कालिदास महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आरोग्य जागृतीचे ज्ञान, सतारीच्या मधूर कंपनाचे श्रवणज्ञान आणि लयपूर्ण पदन्यासाची नृत्यजाणिव रसिकांना करता आली.


सोमवारी सप्तकतर्फे ‘पंचतत्त्व’ या आयुर्वेद ज्ञान, नृत्य अन् संगीताच्या मेजवानीने महोत्सवाची सुरुवात झाली. रेणुका देशकर यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या या कार्यक्रमाचे संगीत नियोजन शैलेश दाणी, २५ नृत्यांगनांच्या चमूचे नृत्य दिग्दर्शन स्वाती भालेराव यांचे होते तर गीत प्रणव पटवारी यांचे होते. संगीत आणि नृत्य दिग्दर्शन विशेषत: याच कार्यक्रमासाठी तयार करण्यात आले होते. वायू, आप, तेज, आकाश आणि पृथ्वी या पाच तत्त्वांचा सखोल अभ्यास करून अनेक सवयी आपल्या दैनंदिन जीवनात अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. या पंचतत्त्वांचे संतुलन, मग ते निसर्गातील असो किंवा मानवी शरीरातील, बिघडल्यास विनाशकारी परिणाम होतात. आज पर्यावरण असंतुलन आणि त्याचे परिणाम हाच धोक्याचा इशारा देत असून, सावध होण्याची हीच खरी वेळ असल्याचा तज्ज्ञांचा सूर या कार्यक्रमात उमटला. या चर्चेत वैद्य मृणाल जामदार, डॉ. संदीप शिरखेडकर व डॉ. योगेश मुरकुटे यांनी सहभाग घेतला आणि त्यांना रेणुका देशकर यांनी बोलते केले. वेदातील ऋचांचा समावेश आणि खास या कार्यक्रमासाठी रचलेले पंचतत्त्व गीत हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. त्यानंतर बंगालचे सुप्रसिद्ध सितारवादक समन्वय सरकार यांच्या सतारवादनाचा कार्यक्रम श्रवणीय ठरला. सतारीची छेडली जाणारी एक एक तार, त्यातून उमटणारे मधूर स्वर आणि त्यातून प्राप्त होणारा चैतन्य अनुपम ठरला. त्यांना तबल्यावर पिनाकी चक्रवर्ती यांनी धमाकेदार संगत केली. 

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात दोघांच्याही जुगलबंदीने रसिक तृप्त झाले. अखेरच्या सत्रात प्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना शर्वरी जमेनिस यांनी आद्य शंकरराचार्य रचित ‘अर्धनारिनटेश्वरस्तोत्र’ नृत्याभिनयातून सादर केला. शरीराची डावी बाजू म्हणजे शक्ती आणि उजवी बाजू म्हणजे शिव. भाव आणि सौंदर्याचा अनुपम जोड सृष्टीशी करणाºया स्तोत्राला सुरेल पदन्यास, नयनकटाक्ष आणि हस्तमुद्रिकेतून त्यांनी सादर केला. त्यांना तबल्यावर त्यांचे पती निखिल फाटक, संवादिनीवर चिन्मय कोल्हटकर, बासरीवर सुनील अवचट यांनी संगत केली. तर पढंत जुई सगदेव यांनी केली. संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन श्वेता शेलगावकर व रेणुका देशकर यांनी केले.

साऊंड सिस्टीम झाली ब्रेक
शर्वरी जमेनिस यांचे नृत्यसादरीकरण होत असताना दरम्यान सभागृहातील ध्वनिव्यवस्था काही काळ खोळंबली होती. त्यामुळे, कार्यक्रमाची लय तुटल्याने प्रेक्षकांसह स्वत: शर्वरी नाराज दिसल्या. नृत्याचा तो बाज टिकवण्यास त्यांना नंतर त्रास झाल्याचे दिसून येत होते.

नागपूरकर रसिक उजवे - शर्वरी जमेनिस
मी अनेक ठिकाणी नृत्यसादरीकरण करते. पुण्याचे रसिक जास्तच चोखंदळ असतात, असे म्हटले जाते. मात्र, मी नागपुरात जेव्हा जेव्हा आली तेव्हा तेव्हा नागपूरकर रसिक जास्त उजवे वाटल्याची दाद शर्वरी जमेनिस यांनी यावेळी दिली.

Web Title: Kalidas Festival: A beautiful evening of health, hearing and meditation.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.