कालीदास महोत्सव : अंतर्मनात गुंजले ‘संगीता’च्या व्हायोलिनचे सूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 01:31 AM2018-11-30T01:31:47+5:302018-11-30T01:34:12+5:30
व्हायोलिनमधून निघणाऱ्या हळुवार स्वरांमध्ये सूर, ताल आणि लय सामावलेले आहे. मानवी मनातल्या सगळ्या भावनांची, संवेदनांची सुरेल अशी अभिव्यक्त म्हणजे डॉ. संगीता शंकर यांचे व्हायोलिन वादन. त्यांच्या हातांचा स्पर्श त्या वाद्याला झाला की दैवी सुरातून एक विश्व निर्माण होते. अंतर्मनाच्या खोलवर गुंजणाऱ्या दैवी सुरांची अनुभूती गुरुवारी रसिकांनी अनुभवली. अगदी तल्लीन होऊन हा माधुर्याचा हा ठेवा सुरेश भट सभागृहात उपस्थित रसिकांना सुखद आनंद देऊन गेला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : व्हायोलिनमधून निघणाऱ्या हळुवार स्वरांमध्ये सूर, ताल आणि लय सामावलेले आहे. मानवी मनातल्या सगळ्या भावनांची, संवेदनांची सुरेल अशी अभिव्यक्त म्हणजे डॉ. संगीता शंकर यांचे व्हायोलिन वादन. त्यांच्या हातांचा स्पर्श त्या वाद्याला झाला की दैवी सुरातून एक विश्व निर्माण होते. अंतर्मनाच्या खोलवर गुंजणाऱ्या दैवी सुरांची अनुभूती गुरुवारी रसिकांनी अनुभवली. अगदी तल्लीन होऊन हा माधुर्याचा हा ठेवा सुरेश भट सभागृहात उपस्थित रसिकांना सुखद आनंद देऊन गेला.
सांगता समारोहाच्या सुरुवातीच्या सत्रात त्यांचे व्हायोलिन वादन होते; सोबत त्यांची कन्या उदयोन्मुख व्हायोलिनवादक नंदिनी हीसुद्धा होती. तबल्यावर साथ दिली पंडिता अनुराधा पाल यांनी. सतार, सरोद आणि व्हायोलिन या तंतुवाद्यांचा स्थायीभावच वेगळा आहे. गायनातील शब्द व व त्यांच्या मर्यादित अर्थाच्या बंधनातून पूर्णपणे मोकळी असणारी ही वाद्ये आहेत. एन. राजम यांच्याकडून लाभलेला मधुर वादनाचा वारसा डॉ. संगीता यांनी असाधारण रियाज, चिंतन आणि रागांच्या अभ्यासातून अधिक उंचीवर नेऊन समृद्ध केला. ‘अभिज्ञान शाकुंतलम्’ या संकल्पनेवरील महोत्सवात ‘राग शामकल्याण’सह त्यांनी व्हायोलिन वादनाला सुरुवात केली. ‘रटन लगी शाम नाम की...’ या बंदिशीसह विलंबित एकताल, आडा चारताल यावर वाढवत द्रुत आडा चारतालपर्यंत ही लय शिखर गाठत गेली. बनारस घराण्याच्या शैलीतील हे वादन ४० ते ४५ मिनिटे निनादत होते आणि कुणी संमोहित केल्यासारखी जादू श्रोत्यांवर होती. हळुवार सुरुवात होत वेगवान टोकावर नेऊन ही बंदिश त्यांनी संपविली. लयबद्ध वादन, लयकारीचा अनोखा डौल, स्वरांवरील अचूक पकड व यातून निर्माण झालेले मुलायम स्वरध्वनी रसिकांच्या कानामनातून हृदयापर्यंत तरंगत होते. यानंतर श्रोत्यांच्या खास आग्रहास्तव राग खमाजमधील बनारसी दादरा त्यांनी सादर केला. पुढे ‘नरवर कृष्णा समान...’ या नाट्यपदावरील सादरीकरणाने त्यांनी वादनाचे समापन केले. कलाकार व श्रोते यांना स्वरतालातून शब्दांपलीकडचा अनामिक सुखद आनंद देणाऱ्या या सादरीकरणाला रसिकांनी टाळ्यांच्या गजरात भरभरून दाद दिली.