नागपुरात कालिदास महोत्सव ५ जानेवारीपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 11:51 PM2019-12-23T23:51:47+5:302019-12-23T23:52:53+5:30
नागपूरच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक ठरलेला कालिदास समारोह यंदा ५ ते ७ जानेवारी २०२० या कालावधीत कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीम बाग येथे आयोजित करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक ठरलेला कालिदास समारोह यंदा ५ ते ७ जानेवारी २०२० या कालावधीत कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीम बाग येथे आयोजित करण्यात आला आहे. कवि कुलगुरु कालिदास लिखित ‘विक्रमोर्वशीयं’ या काव्य ग्रंथावर आधारित यावेळचा समारोह राहणार आहे.
कवि कालिदास समारोहाचे उद्घाटन ५ जानेवारी २०२० या रोजी सायंकाळी ६ वाजता कविवर्य सुरेश भट सभागृहात सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तसेच ७ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ६ वाजता केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
५ रोजी स्थानिक कलाकार सुकीर्ती उईके यांचे शास्त्रीय गायन तसेच अरुपा लाहिरी यांचे भरत नाट्यम व सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे यांचे शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ६ जानेवारी रोजी समन्वय सरकार यांचे सीतारवादन, शर्वरी जननी यांचे कथ्थक नृत्य व सप्तक नागपूर प्रस्तृत पंचतत्व हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच ७ जानेवारी २०२० रोजी सुश्री स्वरुप यांचे ओडिसी नृत्य व नुरान सिस्टर्स यांचे सुफी गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कलावंत कालिदास महोत्सवात आपली हजेरी लावून आपला कलाविष्कार सादर करणार आहे. कालिदास महोत्सव नागपूर व रामटेकपर्यंत न राहता महाराष्ट्राची ओळख व्हावी यासाठी या महोत्सवाचे आयोजन भव्य स्वरुपात करण्यात येत आहे. कालिदास सांस्कृतिक कार्यक्रम पूर्णत: नि:शुल्क आहे.