कालिदास महोत्सव : ‘कौशिकी’च्या सुरांनी संचारली ऊर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 01:06 AM2018-11-29T01:06:12+5:302018-11-29T01:14:27+5:30

हिवाळ्याचा थंड गारव्याने गार झालेल्या शरीराला सूर्याच्या कोवळ्या किरणांची ऊब मिळावी अगदी तसेच कौशिकी चक्रवर्ती यांचा सूर निनादला आणि स्वरांची उबदार दुलई पांघरल्याची अनुभूती श्रोत्यांना मिळाली. कदाचित नागपूरकर श्रोत्यांनाही त्यांच्या स्वरांची खास प्रतीक्षा असावी. कालिदास महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी अखेरच्या सत्रात कौशिकी यांचे गायन असे उबदार अनुभव देणारे ठरले.

Kalidas Festival: Transmitted energy from 'Kaushiki' singing | कालिदास महोत्सव : ‘कौशिकी’च्या सुरांनी संचारली ऊर्जा

कालिदास महोत्सव : ‘कौशिकी’च्या सुरांनी संचारली ऊर्जा

googlenewsNext
ठळक मुद्देस्वरांची उबदार दुलई पांघरल्याची अनुभूती

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हिवाळ्याचा थंड गारव्याने गार झालेल्या शरीराला सूर्याच्या कोवळ्या किरणांची ऊब मिळावी अगदी तसेच कौशिकी चक्रवर्ती यांचा सूर निनादला आणि स्वरांची उबदार दुलई पांघरल्याची अनुभूती श्रोत्यांना मिळाली. कदाचित नागपूरकर श्रोत्यांनाही त्यांच्या स्वरांची खास प्रतीक्षा असावी. कालिदास महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी अखेरच्या सत्रात कौशिकी यांचे गायन असे उबदार अनुभव देणारे ठरले. 


ख्यातनाम गायक पं. अजेय व चंदना चक्रवर्ती यांची कन्या व शिष्या असलेल्या कौशिकी यांनी सहकलाकारांसह ‘कौशिकी आणि सखी’ या अनोख्या कार्यक्रमाचे सादरीकरण यावेळी केले. गुरू पं. ज्ञानप्रकाश यांच्याकडून घेतलेली पतियाळा घराण्याची रसिली गायकी व पं. बालमूर्तीकृष्ण यांच्याकडून कर्नाटकी संगीताची तालीम मिळालेल्या या गायिकेने दोन्ही परंपरांचे गायन श्रोत्यांसमोर सादर करून आपल्या अलौकिक प्रतिभेचा परिचय दिला. स्वरांमध्ये बंगाली मिठाईचा गोडवा, रसिलेपणा आणि सोबत सहवादक, नर्तिकेची अर्थात सखी कलावंतांची तोलामोलाची साथ मिळाल्याने हे सादरीकरण अनुपमेय ठरले. सुरुवातीला श्रीगणेश वंदना व गुरुवंदनेसह सखींच्या नृत्यांनी श्रोत्यांचे लक्ष वेधले. वैदिकपासून आधुनिक काळापर्यंत स्त्रीजीवनाचे दर्शन घडविणारे हे सादरीकरण समस्त महिलांना मानवंदना दिली. राग शामकल्याणवरील पं. सुरेश तळवळकर स्वरांकित तराणा व नृत्यासह हे सादरीकरण होते. कर्नाटक संगीत रचना ‘अम्मा आनंददायिनी’ व नंतर यमुदा तीरावरील रंगतदार होळी उत्सवावरील ‘होरी’ रचनेसह असलेले हे सादरीकरण श्रोत्यांना प्रसन्न असा आनंद देऊन गेले. कौशिकी स्वरांनी बहरलेल्या कार्यक्रमात सखी भक्ती देशपांडे यांच्या नृत्यासह व्हायोलिनवर नंदिनी शंकर, सतारीवर अनुपमा भागवत, बासरीवर देवप्रिया चटर्जी, तबल्यावर सावनी तळवळकर, पखवाजवर महिमा उपाध्याय या प्रतिभावान महिला कलावंतांनी अद्भूत अनुभूती रसिकांना दिली.
फ्रान्सिसी देवयानीच्या नवरसांची श्रोत्यांना मोहिनी 

कालिदास महोत्सवाचा दुसरा दिवस गाजविला तो देवयानी यांच्या भरतनाट्यम् नृत्याने. मूळच्या फ्रान्स येथील रहिवासी अ‍ॅनिक चेमोट्टी यांना स्टेजवरील सादरीकरणासाठी देवयानी हे नाव मिळाले. त्या नावानुरूप असलेले त्यांचे नृत्य कौशल्य नागपूरकरांनी पुन्हा एकदा अनुभवले. स्त्रीशक्तीचे व सौंदर्याचे विविध रस दर्शविणारी भावमुद्रा व त्यांना साजेशा भरतनाट्यमच्या पदलालित्याने त्यांनी श्रोत्यांना संमोहित केले. या वयातही त्यांच्यात असलेले नृत्य कौशल्य श्रोत्यांमध्ये ऊर्जा भरणारेच ठरले.
गायक व वादक कलावंतांद्वारे महागणपती प्रार्थनेनंतर भरतनाट्यमच्या असंयुक्त हस्तमुद्रारूपात मंचावर प्रवेश केला. पायात थोडा संथपणा असला तरी नृत्यात समाविष्ट असलेल्या शैलीनुसार एका हाताचे विलक्षण कौशल्य त्यांनी दर्शविले. सोबतच कटकामुखम, मृगशीर्ष व अलपद््मच्या मुद्रा त्यांनी अप्रतिमपणे टिपल्या व श्रोत्यांनीही टाळ्यांच्या गजराने त्यांचे अभिवादन स्वीकारले. त्यानंतर शिवआराधनेसाठी ओळखले जाणारे ‘नवरस’ नृत्याचे देवयानी यांनी केलेले सादरीकरण मंत्रमुग्ध करणारे ठरले. स्त्रीशक्तीचे व भावनांचे दर्शन घडविणारे शांतरस, कारुण्यरस, वात्सल्यरस, हास्यरस, वीररस, रौद्ररस आणि बीभत्सरसाच्या अलौकिक अशा भावमुद्रा त्यांनी या नृत्याद्वारे व्यक्त केल्या. पुढे नृत्यदेवता म्हणून परिचित भगवान शिवाच्या नटराज रूपाला समर्पित स्वामी दयानंद सरस्वती यांची रचना असलेल्या ‘भो शंभो शिव शंभो स्वयंभो...’ यावर त्यांनी सादरीकरण केले. राग रेवती आणि आदि तालामध्ये असलेल्या या रचनेतील नृत्यसौंदर्याचे दर्शन त्यांच्या सादरीकरणातून दिसले. दक्षिण भारतातील चिदंबरम मंदिराचे प्रसिद्ध असे शिव भक्ती व त्यांच्यावरील प्रेमाला समर्पित ‘नागेंद्रहराय नम: शिवाय...’ या शिवपंचाक्षरी स्तोत्रावरील अद्भूत अशा नृत्याने त्यांनी आपल्या सादरीकरणाची सांगता केली. स्वत:ही शिवआराधनेत तल्लीन होऊन सादरीत या नृत्याला रसिकांनीही मानवंदना दिली. त्यांनी नृत्यशैलीच्या भावमुद्रेतच श्रोत्यांचे अभिवादन स्वीकारले.
‘अरूपा’च्या रूपातील ‘शकुंतले’ची श्रोत्यांवर जादू 
 

‘अभिज्ञान शाकुंतलम्’ हे कवी कालिदासांचे श्रेष्ठ असे महाकाव्य. राजा दुष्यंत आणि अलौकिक सौंदर्यवती शकुंतला यांचे प्रेम, वियोग आणि पुनर्मिलनाची ही कथा. या कथानकाच्या पार्श्वभूमीवरील खऱ्या अर्थाने संमोहित करणारे भरतनाट्यमचे नृत्य दुसऱ्या दिवशी रसिकांनी अनुभवले. सादर केले ते कोलकात्याच्या अरूपा लाहिडी या नृत्यांगनेने. अरूपाच्या रूपातील नायिका शकुंतलेने श्रोत्यांवर अक्षरश: जादू केली आणि प्रत्येक भावमुद्रेवर व पदलालित्यावर श्रोत्यांनी टाळ्यांनी तिला दाद दिली.
कण्व ऋषींची सौंदर्यवती कन्या शकुंतला व राजा दुष्यंत यांच्या प्रथम भेटीतून निर्माण झालेले प्रेम, त्यांची आसक्ती. शकुंतलेच्या या आसक्तीमुळे ओढवलेला दुर्वास ऋषीचा रोष व त्यांच्या शापामुळे दैववश झालेली ताटातूट. पुढे शापमुक्तीनंतर शकुंतला व राजा दुष्यंत यांचे आनंददायी पुनर्मिलनाचे हे महाकाव्य. या पूर्ण कथेतील भावनांचे उत्कट आणि उत्कृष्ट असे दर्शन अरूपा यांनी त्यांच्या नृत्यात केले. भरतनाट्यम्मध्ये भावमुद्रा व त्यानुसार पडणाऱ्या पदलालित्याचा संगम महत्त्वाचा असतो. भावमुद्रांमधून महाकाव्याचे कथानक अधोरेखित करण्याचे कसब त्या नृत्यांगनावर असते. अरूपा यांनी हे सर्व भाव अतिशय प्रभावीपणे दर्शविले आणि हे प्रत्येक श्रोते विस्मयितपणे अनुभवत होते. विजेच्या गतीने बदलणारे विलक्षण असे पदलालित्य, डौलदार पदन्यास आणि चेहऱ्यावर पडणाऱ्या भावमुद्रा कथानकातील शकुं तलेसोबत घडणारा प्रत्येक प्रसंग उलगडत होते. पक्षी, प्राण्यांवर प्रेम करणारी शकुंतला, शिकारीसाठी आलेल्या दुष्यंतसोबत झालेले तारुण्यसुलभ प्रेम, प्रेमाची आसक्ती, गांधर्व विवाह, पुढे शापामुळे आलेले वियोगाचे दु:ख अरूपा यांनी दर्शविले. शृंगाररसाची उत्कटता असलेल्या सादरीकरणात प्रेमासक्त, धीरोदात्त, स्वाभिमानी, वियोगाने कष्टी आणि पुन्हा मिलनाने हर्षित झालेली शकुंतला त्यांनी अप्रतिमपणे उभी केली. रसिकांसाठी त्यांचे आकस्मिक सादरीकरण संमोहक असा अनुभव ठरला.
देवयानी यांच्यासोबत गायक जी. एलक्कोवन, मृदंगमवर आर. केशवम, बासरीवर रजत प्रसन्न आणि कटूअंगमवर अरूपा लाहिडी यांनी साथसंगत केली. संपूर्ण आयोजनाचे निवेदन श्वेता शेलगावकर आणि रेणुका देशकर यांनी केले.

 

Web Title: Kalidas Festival: Transmitted energy from 'Kaushiki' singing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.