सेसच्या विरोधात नागपुरातील कळमना धान्य बाजार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:37 AM2018-11-28T00:37:53+5:302018-11-28T00:39:59+5:30
चेंबर आॅफ असोसिएशन्स आॅफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अॅण्ड ट्रेडने (कॅमिट) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आकारण्यात येणाऱ्या सेसच्या विरोधात पुकारलेल्या व्यापार बंद आंदोलनाचा परिणाम मंगळवारी कळमना मार्केट यार्डमध्ये दिसून आला. या दिवशी कोणताही व्यवसाय झाला नाही. समितीच्या कळमना मार्केट यार्डमधील न्यू ग्रेन मार्केटची दुकाने बंद होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चेंबर आॅफ असोसिएशन्स आॅफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अॅण्ड ट्रेडने (कॅमिट) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आकारण्यात येणाऱ्या सेसच्या विरोधात पुकारलेल्या व्यापार बंद आंदोलनाचा परिणाम मंगळवारी कळमना मार्केट यार्डमध्ये दिसून आला. या दिवशी कोणताही व्यवसाय झाला नाही. समितीच्या कळमना मार्केट यार्डमधील न्यू ग्रेन मार्केटची दुकाने बंद होती.
होलसेल ग्रेन अॅण्ड सीड्स मर्चंट्स असोसिएशनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र आणि मॅसेज पाठवून कळमना मार्केट यार्डमधून सेस त्वरित हटविण्याची मागणी केल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष संतोष कुमार अग्रवाल और सचिव प्रताप मोटवानी यांनी दिली. सेस रद्द न केल्यास व्यापारी तीव्र आंदोलन करतील, अशा इशारा यावेळी देण्यात आला.
मोटवानी म्हणाले, व्यापार बंद आंदोलनादरम्यान बुधवारी कळमना धान्य बाजारात जवळपास सहा ते सात हजार पोते धान्याचा व्यवसाय झाला नाही. त्यामुळे जवळपास तीन कोटी रुपयांचा व्यवसाय ठप्प राहिला. याशिवाय हमालांना रोजगार मिळाला नाही.
अडतिया करणार बेमुदत आंदोलन
कळमना धान्यगंज अडतिया असोसिएशनचे पदाधिकारी अतुल सेनाड यांनी सांगितले की, धान्य व्यापाऱ्यांच्या व्यापार बंद आंदोलनाच्या समर्थनार्थ कळमना अडतियांनी काम बंद ठेवले. केवळ धानाची बोली काढण्यात आली. यादरम्यान बैठक घेऊन पुढील काही दिवसात अडतिया असोसिएशनतर्फे सांकेतिक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सेसच्या विरोधात अडतिया बेमुदत बंद करू शकतात.
एनव्हीसीसीसह विविध संघटनांचे समर्थन
कळमना मार्केटच्या धान्य व्यापाऱ्यांच्या व्यापार बंद आंदोलनाला नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष हेमंत गांधी यांनी समर्थन दिले. ‘कॅमिट’चे अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात राज्यभर झालेल्या व्यापार बंद आंदोलनात कळमना मार्केटमधील नागपूर फ्रूट डीलर्स असोसिएशन, कळमना धान्यगंज अडतिया असोसिएशन, कांदा-बटाटा बाजार अडतिया वेलफेयर असोसिएशनने समर्थन दिले.