कळमना मार्केट बनतेय ‘हॉटस्पॉट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 08:22 PM2020-08-27T20:22:24+5:302020-08-27T20:24:46+5:30
नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता कोरोनाचा शिरकाव कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीतील मार्केट परिसरात झाला असून १०० पेक्षा जास्त लोक संक्रमित झाल्याची माहिती आहे. संक्रमण दिवसेंदिवस वाढतच आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता कोरोनाचा शिरकाव कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीतील मार्केट परिसरात झाला असून १०० पेक्षा जास्त लोक संक्रमित झाल्याची माहिती आहे. संक्रमण दिवसेंदिवस वाढतच आहे. यामध्ये व्यापारी, अडतिये, हमाल आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी कांदे-बटाटे बाजारात पाच जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती आहे. कोरोना वेगाने पसरत असतानाही समितीचे प्रशासन काहीही उपाययोजना करीत नसून संक्रमणावर प्रतिबंध आणण्यास अपयशी ठरल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी लोकमतशी बोलताना केला. प्रशासनाने कठोर उपाययोजना न केल्यास कळमन्यातील बाजारपेठा बंद कराव्या लागतील, अशी भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सहा बाजारपेठा आहेत. या बाजारात दररोज १४ ते १५ हजार लोक खरेदीसाठी येतात. एवढ्या लोकांमधून ‘कोरोना’ संसर्ग कुणाला झाला आहे वा नाही, याची शहानिशा करणे कठीण आहे. बाजार एकत्रित असल्याने खरेदी करणाऱ्यांची नेहमीच गर्दी असते. प्रशासनाने अनेकदा गर्दीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्वी प्रत्येक बाजार आठवड्यातून तीन दिवस सुरू ठेवला होता. माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कळमना भाजीबाजार बंद ठेवून शहरात १६ ठिकाणी बाजार सुरू केला होता. त्यालाही व्यापाऱ्यांनाही विरोध केला होता. व्यापाऱ्यांच्या मागणीनंतर पुन्हा बाजार आठवडाभर सुरू झाला. भाजीबाजारात अजूनही २५० पैकी दरदिवशी १०० अडतियांना व्यवसायाची परवानगी देण्यात आली आहे.
भाजीबाजारात दरदिवशी लहानमोठे २०० पेक्षा जास्त ट्रक येतात. यातील अर्ध्यापेक्षा जास्त गाड्या अन्य राज्ये आणि जिल्ह्यातील असतात. पहाटे ४ ते सकाळी ९ पर्यंत हजारो किरकोळ विक्रेत्यांची खरेदीसाठी गर्दी असते. वारंवार सूचना देऊनही व्यापारी व अडतिये ऐकत नसल्याची तक्रार प्रशासनाची आहे. बाजार काही दिवस बंद करणे वा शहरात इतरत्र: सुरू करणे, हाच यावर उपाय असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
याशिवाय फळबाजारात आठवड्यातून तीन दिवस लिलाव असतो. लिलावादरम्यान व्यापारी आणि ग्राहकांची एकच गर्दी असते. शेतकरीही गर्दीत उभे राहतात. त्यामुळे संक्रमणाची भीती असते. कुणीही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत नाहीत. फू्रट मार्केट अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष आनंद डोंगरे म्हणाले, अन्य राज्ये व जिल्हे आणि स्थानिकांच्या गर्दीमुळे बाजारात कोरोना संक्रमण वाढत आहे. सध्या कोरोना संसर्गाची भीती कुणामध्येही दिसून येत नाही. कांदे-बटाटे बाजारातील पाच व्यापाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाजारात भीतीचे वातावरण आहे. फळबाजार काही दिवस बंद ठेवण्यासाठी असोसिएशनतर्फे प्रशासक राजेश भुसारी यांना गुरुवारी निवेदन दिले आहे. त्यावर ते काय निर्णय घेतात, याची प्रतीक्षा आहे.
संसर्गाची स्पष्ट माहिती मिळाल्यास परिसर सील करू
कळमन्यात कोरोना संक्रमण वाढले आहे, ही बाब खरी आहे. पण या संदर्भात स्पष्ट माहिती नसल्याने कारवाई करता येत नाही. समितीच्या आवारात नागपूरचा बाजार एकवटला आहे. संसर्गानंतरही शेतकरी माल विक्रीसाठी बाजारात गर्दी करतात. गर्दीला आवर कसा घालणार, हा गंभीर प्रश्न आहे. संसर्गाची स्पष्ट माहिती मिळाल्यास परिसर सील करू. यापूर्वी लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे. परिसर वारंवार सॅनिटाईझ्ड करण्यात येत आहे.
राजेश भुसारी, प्रशासक, कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती.